पुस्तक परिचय - वनव्यातून स्त्री जन्माच्या

 

हळूवार, तरल भावनांचा आविष्कार -- वनव्यातून स्त्री जन्माच्या  कवयित्री- सौ. स्मिता शिंदे- साळुंखे

Marathi-Book-reviews, marathi-poetry, poem
स्मिता शिंदे - साळुंखे

 'कवि मनाच्या कल्पनेचा व वास्तवतेचा अर्थ हुंकार म्हणजे कविता होय'.जी कविता मनात फुलते , अंतकरणात बहरते, काळजात रुतते, हृदयात पाझरते, वेदनेत झिरपते अशी कविता वाचकांच्या मनात कवीच्या कवित्वाचा आदरभाव निर्माण करते . या आशयाची नवनिर्माणाची क्षमता घेऊन वनव्यातून स्त्री जन्माच्या हा स्मिता शिंदे - साळुंखे यांचा कवितासंग्रह वाचकांच्या समोर आलेला आहे.

स्त्री अनेक रूपातून प्रकट होते . गोजिरवाणी, लोभस, मायाळू, दयाळू ,यशवंत ,कीर्तिवंत, ज्ञानवंत ,गुणवंत , स्त्री विधात्याचे वैभव , मांगल्याचा मान, औदार्याचा  संघटन, कोमलतेचा कळस ,,प्रेमाचा सागर, भक्तीचा आगर , सरीतेचं अलिंगन, मर्दानी ढाल , सह्याद्रीची शाल, ज्ञानाची ज्योत , सावित्रीची लेक अशी कितीतरी स्त्रीत्वाचे अनंत रूपे वाचकांच्या समोर मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न या कवितासंग्रहाच्या माध्यमातून कवयित्रीने केलेला आहे.

' लगीन झालं तुझं पोरी म्हणून माझी पाठवणी केली
 जेव्हा ध्यानात आलं सारं नवरा तिथं मुळी नव्हताच कोणी '

स्त्री मनाचं काळीज पिळवटून टाकणारी वेदना वेश्या या कवितेतून व्यक्त होते.

' उठा नव्याने पुन्हा सोडा खंत मनीची
बोल हे आठवा माझे हाक ही वेड्या कळीची'

 स्त्रीभ्रूणहत्या या कवितेतून स्त्रीच्या जगण्याची उमेद व आशावाद प्रखरपणे मांडला आहे.

 'मावळतीचा सूर्य उगवतीला चंद्र असेल
आरशात बघ सखे तुला तुझं खरं रूप दिसेल '

मुल आणि चूल असं उंबऱ्याच्या आत अडकून पडलेली स्त्री , आज परिवर्तनवादी असलेली पाहायला मिळते ; म्हणून या जुन्या रूढी परंपरेतून तिला बाहेर पडण्याचा सल्ला *खरं रूप दिसेल* या कवितेतून कवयित्री देत आहे .

' मंदधुंद रसाळ प्रसंगी बोचरी
 भावविभोर अशी बेधुंद असते कविता '

सुखदुःख , व्यथा-वेदना, प्रेम, विरह ,त्याग , माया-ममता, सर्व रूपे कवितेतून प्रकट होतात. हे बेधुंद कविता यातून व्यक्त केलेले आहे.

 'पण नाही गरज सगळी त्याची अन
त्यालाच आहे समानता बोलण्यात
 अन दाखवण्यात आहे अस्सल
 आयुष्यात स्त्री अजूनही दुय्यमच'

 बोलण्यातून नुसती समानता नको आहे ,तर वागण्यात जाणवले पाहिजे. हे परखड भाष्य या कवितेतून व्यक्त होते.

 थोड्या काळापुरतं या कवितेमधून
'मग तुझ्यावर हुकूम सोडावं म्हणते
 सर्व मर्यादांना तोडावं म्हणते
 थोड्या काळापुरता का होईना
 घोड्याचा लगाम ओढावा म्हणते'

 आजची स्त्री शिक्षित आहे. पुढारलेली आहे. नव्या विचारांना स्वीकारणारी आहे. म्हणून तिच्या जगण्याचा हक्क ती मागते आहे. कालचा काळ वेगळा होता ; परंतु आज परिस्थिती सर्वत्र बदललेली पाहायला मिळते . माणसांची नातीही प्रेमावर विश्वासावर चालतात; म्हणून अग्निपरीक्षा या कवितेत कवयित्री म्हणते,

'विश्वासावर चालतो रे संसार
 आता पुन्हा सीता कधीही अग्नीपरीक्षा देणार नाही'

 या कविता संग्रहामध्ये पासष्ट कवितातून वेगवेगळे विषय हाताळलेले आहेत. स्त्री, शेती, माती, सासर, माहेर, दुष्काळ, गुलामी , स्वातंत्र्य , प्रेम , जिव्हाळा , आपुलकी , संसार अशा आशयाच्या कविता वाचत असताना;  काही कविता आनंद प्रेरणा देऊन जातात . तर काही कवितांमधून आकांत ,आक्रोश, भावनांचा कल्लोळ, उद्रेक पाहायला मिळतो.
Marathi-sahitya, marathi-poetry, Hind-poem

 स्त्री म्हणजे विश्वकर्त्यांने आपल्या पहिल्या साखर झोपेच्या वेळी टाकलेला हळूवार निश्वास. त्यामध्ये पुरुषाच्या जळणाऱ्या मनाला, शांत करण्याची प्रचंड शक्ती असते . स्त्रीच्या प्रेमळ सहवासात माणूस जगाचं क्रौर्य विसरू शकतो. अपमानाचे कडू घोट धीरानं पचवू शकतो. नव्या पराक्रमाचे पर्वत उभा करू शकतो. एवढं कमालीच सामर्थ्य स्त्रीमध्ये असतं.

 आपल्या कवितासंग्रहातील प्रत्येक कविता वाचकाला
अंतर्मुख करायला लावणारी आहे. वास्तवातल्या अंतर आत्म्याच्या हृदयाचा ठाव घेणारी आहे . आपली चिकित्सक अभ्यासवृत्ती , नैतिक जबाबदारपणा , तीक्ष्ण निरीक्षणशक्ती, हळवा स्वभाव यातून सौ. स्मिता शिंदे साळुंखे यांच्या लेखन शैलीचे सामर्थ्य दिसून येते .

    पुढील काळात बहुमोल कवयित्री म्हणून उजळावी ही अपेक्षा! इथून पुढच्या लेखन प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा!!!

लेखन
प्रा. दत्तात्रय चव्हाण
शेटफळ ता. मोहोळ
मो. 8668826030


Post a Comment

1 Comments

 1. पुस्तक परिचय - वनव्यातून स्त्री जन्माच्या
  Yacha yellow colour change Kara
  N
  Yellow colour vaparu naka ajibat disat Nahi
  Tras Hoto

  ReplyDelete

आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय, आणि सुचनांचे स्वागत आहे .
सोबतच्या 'सदस्य व्हा' या रकान्यात इमेल भरून आपण साहित्य भारती चे विनामुल्य सदस्य होऊ शकता.