पुस्तक परिचय - अवकाळी विळखा - सचिन पाटीलMarathi-book-review, Marathi-sahityik
अवकाळी विळखा

‘अवकाळी विळखा’ हा सचिन वसंत पाटील यांचा ग्रामीण कथासंग्रह गवळी प्रकाशन, इस्लामपूर यांनी प्रकाशित केलेला आहे. समर्पक मुखपृष्ठ सत्यजित वरेकर यांनी साकारले आहे. मलपृष्ठ मजकूर रंगराव बापू पाटील यांचा लाभलेला आहे.

     सचिन वसंत पाटील हे ग्रामीण कथाकार म्हणून ओळखले जातात. अनेक नामवंत दिवाळी अंकांतून त्यांच्या कथा प्रकाशित झाल्या आहेत. महाराष्ट्रातील अनेक मानाचे पुरस्कारही त्यांना प्राप्त झालेले आहेत. आकाशवाणीवरून सतत कथाकथन चालू असते. वर्तमानपत्रांतून सतत त्यांच्या साहित्याची चर्चा होत असते. ‘सांगावा’ हा ग्रामीण कथासंग्रह, ‘येरे येरे पैसा’, ‘पाय आणि वाटा’ हे त्यांचे लेखसंग्रह प्रकाशित आहेत.  शेतातून चारा आणताना बैलगाडी पलटली. या अपघाताचा सचिनच्या मज्जातंतूंना जोराचा धक्का बसला. त्यांचे दोन्ही पाय जाऊन कायमचे अपंगत्व आले. सर्व प्रकारचे उपचार झाले. परंतु यश आले नाही. रात्रंदिवस बेडवर पडण्याशिवाय गत्यंतर नव्हते. अशाही अवस्थेत सचिनने जिद्द सोडली नाही. पुस्तकांची अगोदरची मैत्री घट्ट केली. आपल्या अपंगत्वावर मात करून त्याने साहित्यनिर्मिती करण्यासाठी लक्ष एकवटले. सुरुवातीच्या काळात बेडवर पडून राहून एका अंगाने तो लिहू लागला. नंतर नंतर वॉकरच्या साहाय्याने चालू लागला. हा निसर्गाचा चमत्कारच म्हटला पाहिजे. ग्रामीण भागातील अनेक प्रश्‍नांची उकल लेखकाच्या कथासंग्रहातून अनुभवावयास मिळते.

   
Marathi-book-review, Marathi-sahityik
सचिन पाटील
मो. 82753 77049
 ‘टांगती तलवार’ या कथेत लेखकाने नामा या शेतकर्‍याची व्यथा चित्रित केली आहे. नामाचं दीड एकरातलं सोयाबीन काढून तयार असतं. परंतु त्याची मळणी होणे आवश्यक असतं. ‘केव्हा पाऊस येईल व ते सारे पीक भिजवून काढेल’ ही टांगती तलवार त्याच्यावर असते. रात्रंदिेेवस त्याची झोप उडालेली असते. ‘केव्हा एकदा पीक निघते व बाजारपेठ गाठतो...’ असे त्याला वाटत होते. कारण चालू वर्षी सोयाबीनला चांगला भाव आलेला असतो. अस्थिर मनोवृत्तीच्या नामाला बायकोने दिलेला चहादेखील कडू लागतो.

     बाळूभाऊच्या मशीनला अगोदरच दोघा-तिघांनी बोलून ठेवले होते. शिवाय त्या दिवशी राबण्यासाठी गडीही मिळत नाहीत. जाधवाच्या टपरीवर जाऊन गड्यांसाठी धांडोळा घेतो. नेहमी काम करणारे मन्सूर, धोंड्या, जगू यांना इतर कामामुळे सवड होत नाही. जादा पैशाचे आमिष दाखवल्यावर श्यामा व राजा कसेतरी तयार होतात. गड्यांना तयार केले. तर इकडे बाळूभाऊचा मळणी मशीनचा ड्रायव्हर रजेवर. त्याचा मुलगा आजारी असतो. बाळूभाऊला धुळीची ऍलर्जी असते. गडी ठरवले पण आता मशीन नाही. नामाच्या पायाखालची जमीन सरकते. रात्रीचे जेवण जात नाही. पावसाची भीती तर क्षणोक्षणी असतेच. बायकोच्या विचाराने तोच मशीन चालवायचे ठरवतो. बाळूभाऊ मशीन रानात आणून देतो. आपली बायको, मुले, गडी यांच्या साहाय्याने मळणीचे काम पूर्ण होते. तोच आकाशात ढग दाटून येतात. शेवटच्या टप्प्यात मळणी आल्यावरही नामाच्या जिवात जीव नसतो. येथेच लेखकाने कथेचा शेवट केला आहे. या कथेत ग्रामजीवनाचे समस्त चित्रण येते. वर्षभर कष्ट करून आलेले पीक, निसर्ग केव्हा घास काढून घेईल याची खात्री शेतकर्‍याला नसते. याशिवाय मशीन, वेळेवर गडी न मिळणे, बाजारभाव याची चिंता असतेच.

‘वाट’ या कथेत पांडबाची व्यथा चित्रित केलेली आहे. त्याच्या दीड एकर रानात ‘ऐंशी-एकराचा’ ऊस पूर्ण वाढ झालेला. परंतु कारखान्याचे लोक नेण्यासाठी येत नाहीत. मुलीचे लग्न तर जवळ आलेले. उसाच्या पट्टीवर लग्न करण्याचा त्याचा विचार. ऑफिसला जाऊन चौकशी करतो. तेथेही ऊस- तोडणीसाठी लोक थांबलेले असतात. आबा, तुकाराम चव्हाण अशी मंडळी. प्रत्येकालाच उसाची काळजी. आणखी काही काळ थांबले तर ऊस कुजणार. वर्षभर जोपासलेला ऊस जाणार. ऊसतोडणीसाठी वाटही आवश्यक असते. शेजारच्या सुभान पाटलाला तो वाट देण्याविषयी विनवणी करतो. परंतु पाटीलही त्यासाठी एकरी हजार रुपयाची मागणी करतो. तेही रोख. उसने-पासने करून पाटलाला पैसे दिले जातात. मग पांडबा मुकादमाची मनधरणी करतो. तोही एकरी पंधराशे रुपयाची मागणी करतो. अनेक अटी त्याला घालतो व कसाबसा रानात येतो.

     पाला गोळा करायचा त्रास होतो म्हणून उसाला प्रथम आग लावण्यास मुकादम सांगतो. वर्षभर तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या उसाला आग लावण्याचे धाडस पांडबाला होत नाही. परंतु मुकादमाच्या दबावापुढे त्याचे काही चालत नाही. काळजावर दगड ठेवून तो आपल्या उसाला आग लावतो. पेटलेला ऊस त्याला पाहवत नाही. पाल्याबरोबर आपल्या उसाच्या कांड्याही जळू लागलेल्या लक्षात येताच तो वेड्यासारखा सैरभैर धावत सुटतो, कारण उसाची पार ‘वाट’ लागलेली असते. मनाला अस्वस्थ करणारी ही कथा केवळ पांडबाचीच व्यथा नसून प्रत्येक अल्पभूधारक ऊस-बागायतदाराची आहे. कारखानदारीकडून शेतकर्‍याची चाललेली लूट दर्शविणारी आहे. जाणून-बुजून ऊस उचलायचा नाही. शेतकर्‍याला हातघाईला आणायचे व त्याची अडवणूक करून त्याला लुटायचे, ही प्रवृत्ती बळावत आहे. म्हणूनच याच कथेतील तानाजी म्हणतो, ‘जेनं उठावं तेनं शेतकर्‍याला लुटावं...आरं हाय काय ह्या ऊस शेतीतऽ’ त्याला तुकारामही उत्तर देतो, ‘हायकी! कारखानदाराला साकरंची पोती नि शेतकर्‍याला मातुर त्वॉंड भरून माती...!’ या दोघांच्या संवादातच कारखानदार व शेतकर्‍यांचे संबंध स्पष्ट होतात. ‘केवळ पाला उचलावा लागेल’ या किरकोळ सबबीतून मुकादम अख्खा ऊस पेटवून देण्याचे आदेश देतो. ऊस पेटवून देताना ‘केवळ पालाच नाहीतर ऊसही पेटू शकतो’ हे त्याला ठाऊक असूनही तो निर्दयपणे हे कृत्य पांडबाला करावयास भाग पाडतो. यावरून ग्रामीण शेतकरी किती हतबल झाला आहे, हे दिसून येते. गड्यासाठी, वाटेसाठी, कारखान्यासाठी, ट्रॅक्टरसाठी, बैलगाड्यांसाठी, मुकादमासाठी त्याला अनेक जणांपुढे गयावया करावे लागते. पावलोपावली लाचार व्हावे लागते. ही हतबलता लेखकाने अतिशय समर्पकपणे टिपली आहे. त्यांच्या कथालेखनाला दाद दिलीच पाहिजे.

     ‘मैत्री’ या कथेत लेखकाने खेड्यात बदललेल्या मानसिकतेचे अचूक चित्रण केलेले आहे. पूर्वीचे शेतकरी कष्ट करायचे. ढोर-मेहनत करायचे. सकाळी सूर्योदयापूर्वी उठून शेतात जायचे. शेरडा-म्हसरांची बूज राखायचे. पण अलीकडे खेड्यातील वातावरणही गढूळ झाले आहे. नवीन पिढी उदयास आली आहे ती आळस घेऊनच. ती शिकली. अंगाला माती लागू देईनाशी झाली. परीट-घडीचे कपडे, कोंबडा भांग, किमान दुचाकी गाडी, भारी मोबाइल व गॉगल घालून फिरू लागली. शेतावरील देखरेख म्हणजे-उंटावरून शेळ्या राखणे. एखाद्या पुढार्‍याच्या दावणीला बांधून स्वत:ला धन्य समजू लागली. कमी कष्ट, जास्त पैसा या आमिषापोटी ऐतखाऊपणा वाढला. चैन वाढली. व्यसने वाढली. बिनकष्टाचे व झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग शोधू लागली. याच मानसिकतेचा फायदा घेत मुंबई, बेंगलोर, कलकत्ता येथील काही कंपन्या गावात दाखल होतात. साखळी मेंबर करायचे, प्रमोशन द्यायचे. पैसे दामदुप्पट करायचे. एकवीस नख्यांचे कासव मिळवून पैसे मिळवायचे. ‘एखादे चंदनाचे किंवा आंब्याचे झाड लावले आहे. ते मोठे झाल्यावर फळे तुमची’ म्हणून पैसे उकळायचे. नंतर झाडही तिकडेच, पैसेही तिकडेच. गावात मटक्याच्या बुक्कीने कहर केलेला. ‘एका रुपयाच्या बदल्यात एकशे-दहा रुपये’ म्हटल्यावर अनेक तरुण पोरे आकडेमोड करून पैसे मिळू लागतात. एखाद-दुसरा लागतोही. पण नाद लागलेला सुटत नाही. हळूहळू किती पैसा जातो हे समजत नाही. ‘स्लो-पॉयझन’ प्रमाणे तरुण पैसे घालवू लागतो. क्षणिक आनंदाच्या मोहात गुरफटतो. हळूहळू बरबाद होतो. अशी व्यसनाधीन झालेली व नादावलेली पिढी भविष्यात काय करू शकणार? याची चिंता वाहणारी ही कथा आहे. या कथेत नामदेव व सुधाकर दोघे मित्र. नामदेवने जुन्या व दुर्मीळ नाणी-नोटांचा संग्रह केलेला असतो. त्या संग्रहात पाच हरणे असलेली नोट एक पाहुणा चार लाख रुपयाला मागतो. परंतु आपला अवयव तोडून दिल्यासारखे वाटल्याने नामदेव त्या चार लाख रकमेवर पाणी सोडतो. त्याचा मित्र सुधाकर काहीतरी खोटी सबब सांगून काही वेळेसाठी म्हणून नामदेवला भावनाविवश करून त्याच्याकडून ती पाच हरणांची नोट घेतो व त्याला नंतर देत नाही. मित्राने दिलेला दगा नामदेवच्या जिव्हारी लागतो. केवळ पुस्तके व साहित्य त्याला या धक्क्यातून सावरतात.

     ‘अवकाळी विळखा’ या कथेत अवकाळी पावसाने शेतकर्‍यांना काढणीसाठी उसंत मिळत नाही, याचे चित्रण येते. अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे शेतकर्‍यांची पिके धोक्यात आली. काढणी, मळणीला सवड न मिळाल्याने शेतकरी चिंतित होतो. ऊस, हळद, द्राक्षे, केळी या पिकांची काढणी होईल व त्याने चार पैसे हातात मिळावेत, देणेकरी भागावेत, नव्या दमानं नव्या पिकाची पेरणी व्हावी असं त्यांना वाटत होतं. पण तसे होत  नाही.  काढून टाकलेल्या रानातल्या भाताच्या सोयाबीनच्या कडप्या उलथून-पालथून काव आला होता. हाता-तोंडात आलेली अशी पिके पावसात कुजताना पाहताना शेतकर्‍यांना अन्न गोड लागेना. धड झोप येईना. ओल्या दुष्काळाने ग्रासलेल्या शेतकर्‍यांची ही कथा वाचून मन विषण्ण होते. कोरडा दुष्काळ असो अथवा ओला दुष्काळ मरण शेतकर्‍याचेच. ज्येष्ठ साहित्यिक सदानंद देशमुख यांचे एक वाक्य लेखकाने आवर्जून नमूद केले आहे. ‘पाणीवाल्यांची पाण्यानं खरडपट्टी होते अन् कोरडवाहू वाल्यांची बिनपाण्यानं होते एवढाच फरक...’

सरकारही दुष्काळ-सदृशासाठी अनेक घोषणा करते; पण त्या हवेत विरणार्‍या असतात. दोन-दोन वर्षांपूर्वीच्या नुकसान-भरपाया अजून मिळाल्या नव्हत्या. त्यामुळे शासनाकडून तर शेतकर्‍यांची अपेक्षा नव्हती. सुमारे पंधरा दिवस हा अवकाळी पाऊस कोसळतो व पुढचे तीन आठवडे राना-रानात चिखल साठलेला असतो. पंचायतीच्या कट्ट्यावर बसून श्रीपती, हणमा, आंधळा तुकाराम, महादेवबापू, राज्या, रावसो खोत, महादेव चौगुले, श्रीपती पाटील, हणमा, सुभानराव पाटील, महादेव माने या समस्येची चर्चा करतात. निष्कर्ष निघतो - प्रगतीच्या नावाखाली, सुधारणांच्या नावाखाली माणसानं जंगलावर अतिक्रमणे केली, झाडे तोडली. प्रचंड प्रमाणात वृक्षतोड झाली. स्वातंत्र्यापूर्वी अडतीस टक्के जंगल होते ते आता सतरा टक्क्यावर आलंय. रासायनिक खतांच्या बेसुमार वापरानं जमिनीचा पोत खराब होत आहे. वृक्ष-तोडीमुळे निसर्गचक्र बिघडत आहे. प्रत्येकाने यापुढे वृक्ष-लागवड केली पाहिजे. रासायनिक खतांऐवजी सेंद्रीय खतांचा वापर केला पाहिजे. तरच पुढच्या पिढीला अशा समस्यांपासून सुटका आहे.

देखणे हे दुःख आहे या पुस्तकाविषयी जाणून घ्या
     याशिवाय त्यांच्या ‘उद्रेक’, ‘बुजगावणं, ‘सांभाळ रे’ या कथाही उल्लेखनीय आहेत. एकंदर सचिन वसंत पाटील यांचा शेतीविषयक दृष्टिकोन व निरीक्षण बारकाईचे आहे. भाषा सहज व ओघवती आहे. ती वाचकांच्या मनाची पकड घेते. प्रत्येक कथेत ते त्यांच्या वर्णनावरून दिसून येते. प्रत्येक विचार शेतकर्‍यांची चिंता वाहतात. ग्रामसंस्कृतीचे रक्षण करू पाहतात. भाषाशैली प्रवाही असून संवाद खटकेबाज आहेत. ग्रामभाषेत वापरल्या जाणारे अनेक संवाद त्यांच्या कथेत येतात उदा.- ‘पोराचं बोल ऐकून पोटात खड्डा पडला’, ‘तोंडातला घास गिळवेना’, ‘पण कधी कधी शेळपट मनात एक विचार मुंगीच्या पावलाने शिरतो.’, ‘कडूइक च्या पिऊन तो मळणीला गडी माणसं हुडकायला म्हणून बाहेर पडला’, ‘पाण्याविना पिकं वाळून निघालेत पण पावसाला दया नाही.’, ‘...पण ह्यो मिरगीचा किडा एवढ्या उशिराने कसा काय आला म्हणायचा?’, ‘आता सावज जाळ्यात आलंय तर दोर खेचायला पाहिजे.’, ‘पोरगा गेला आसंल गावभर उकिरडं फुकायला.’ अशी ग्रामीण भाषेतील अनेक वाक्ये सचिनच्या कथेत सहज येताना दिसतात. कथेतील सर्व पात्रे ही सहज भावनेनं वावरतात. कधी आक्राळस्तेपणा करतात तर कधी संयमीपणाही दाखवतात, मानवी जीवनमूल्यांची जिवापाड जपणूक करताना दिसतात.


Marathi-sahityik, marathi-books
राजेंद्र भोसले
मो. 98817 86466
समीक्षण - राजेंद्र भोसले, सोलापूर

टीप :‘बळीराजा डॉट कॉम’ या वेबसाइटने घेतलेल्या
‘विश्वस्तरीय लेखन स्पर्धा-२०१६’ मध्ये
या पुस्तक समीक्षणास द्वितीय क्रमांक प्राप्त

Post a Comment

1 Comments

  1. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व

    ReplyDelete

आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय, आणि सुचनांचे स्वागत आहे .
सोबतच्या 'सदस्य व्हा' या रकान्यात इमेल भरून आपण साहित्य भारती चे विनामुल्य सदस्य होऊ शकता.