पुस्तक परिचय - भेट (कवितासंग्रह)


सुवासिक शब्द सुमनांची आकर्षक भेट - भेट (कवितासंग्रह)
marathi-books-poetry-poem, marathi-sahityik-raj-randhir
भेट (कवितासंग्रह)

कवितासंग्रह :- भेट
कवी :- डॉ. राज रणधीर, जालना
संपर्क :- 9922614471
प्रकाशक :- ओंकार प्रकाशन,जालना

डॉ. राज रणधीर सर हे जालना शहरातील एक प्रथितयश डॉक्टर आहेत आणि एक उत्कृष्ठ कवी अन गझलकार देखील.  सरांचा नोव्हेंबर २०१७ ला भेट हा पहिलाच कवितासंग्रह प्रकाशित झाला. मला तो वाचायला मिळाला. वाचत असतांना त्यांचे अनेक शब्द असे आहेत, अनेक कविता अशा आहेत कि, ज्या  वाचकांना प्रेरित करतात, भारावून टाकतात. सुबक अशी मांडणी या संग्रहाची झाली आहे. मी छोटेखानी वेध घेतोय भेट या कवितासंग्रहाचा.
पुस्तकाच्या सुरुवातीलाच *भेट* ही माझी प्रथम साहित्यकृती माझे प्रेरणास्थान  आई....श्रीमती शोभा दत्तात्रय रणधीर यांनाच आदरपूर्वक त्यांनी समर्पित केलेली आहे.  येथेच त्यांची आईबद्दलची समर्पणाची भावना आपल्याला समजून येऊ शकते.  आणि या संग्रहातील पहिली कविता ही *आई* म्हणूनच आहे.  या कवितेमध्ये डॉक्टर लिहितात कि,
“ आई तुझ्या कृपेने मी पाहिले जगाला
सांगू कसे तुला गे बघतो तुझ्यात जग मी.”

याच कवितेतील आणखी खालील दोन ओळी आहेत.  आणि आपण मन लावून जर त्या वाचल्या तर त्याच्या मागची मार्मिकता आपल्याला सहज समजून येईल,

“ शेंदूर लावलेल्या देवास का पूजावे,
आईच देव माझा सेवा तिची घडावी ”

आज अगदी उलटं चित्र आपण बघतो. दगडच्या देवाला वा आणखी एखाद्या प्रतिमेला पूजलं जातय. आणि दुसरी कडे आई जे वात्सल्यरूप आहे. तिची सेवा करणं सोडून कुठतरी माणूस दुसरीकडेच देव शोधत फिरतोय. याला खूप चांगल्या प्रकारे सरांनी आपल्या या आई कवितेत मांडले आहे. अर्थातच समाजातील वास्तविक व्यथेला त्यांनी वाचा फोडली आहे. आज अनेकांची आई मुलं असतांना, सर्व काही असतांना वृद्धाश्रमामध्ये राहते. आता आईचे उपकार एवढे आहेत कि आपण त्यांची मांडणी ही करू शकत नाही. त्यांना मोजू शकत नाही. तरी त्याच आईला आज वृद्धाश्रमाच्या चार भिंतीमध्ये रहावं लागतंय. त्यालाच सरांनी खूप चांगल्या प्रकारे भावबद्ध केलं आहे. जे नक्की कुठतरी प्रबोधनात्मक ठरेल. अनेक मुलांपर्यंत हा संदेश जाईल. कि आई ही घराची शोभा आहे तिला असं वृद्धाश्रमाच्या बंदिस्त खोलीत ठेवता कामा नये. त्या ओळी बघा,
marathi-sahityik-raj-randhir, marathi-poetry-books
डॉ. राज रणधीर
“ का आश्रमात आई तुज सोडले मुलांनी
उपकार तव ऋणांचे का फेडले न त्यांनी ”

    त्यानंतर सर स्वत: डॉक्टर आहेत. रोज अनेक रुग्णांचा उपचार आपल्या इंजेक्शन आणि गळ्यातील स्टेथोस्कोप लावून करतात. त्यांना आतल्या रोगाची आणि बाहेरच्या आजाराची जाणीव होते. आणि काही आजार हे मनाचे असतात. तेथे ते स्टेथोस्कोप बाजूला ठेवून लेखणीने ईलाज करतात. आणि जगायचे असेल तर या त्यांच्या कवितेमध्ये त्यांनी खूप चांगला इलाज आपल्या सर्वांसाठी सांगितला आहे. आणि यावर त्यांचा एक मिसरा खूप काही सांगून जातो. आणि मला वाटतं जीवनाचं तत्वज्ञान सांगायला त्यांचा हा एकच मिसरा खूप प्रभावी ठरावा असाच आहे. डॉक्टर लिहितात कि,
“ जगायचे असेल तर हसायचे शिकून घे,
तुझ्याच आसवात तू भिजायचे शिकून घे ”
मला वाटतं जीवनात आलेल्या अनेक दु:खांवर खरा उपचार जर काही असेल तर त्या दु:खांचे हसून स्वागत करणे.  आणि खूप मोठी शिकवण आहे ही कारण की दु:ख आल्यानंतर आपण जर रडत बसू तर त्यात भरच पडते. त्यापेक्षा आपण त्यांचे हसून स्वागत केले तर आपलं हे जीवन खूप सुंदर बनणार आहे. म्हणून रडण्यापेक्षा हसण्याकडे आपण आपला कल ठेवला पाहिजे आपली वृत्ती ठेवली पाहिजे. हेच जणू सरांचा हा एक मिसरा आपल्याला सूचित करतोय. आपल्याला लाभलेले हे जीवन खूप थोडे आहे. क्षणभंगुर आहे. मग तुम्ही राव असा रंक असा वा सिकंदर असा शेवटी आपल्याला रितेच जावे लागते हेच आपल्या आयुष्याचे कटू सत्य आहे. जीवन या कवितेच्या शेवटी ते लिहितात,
“ अर्थ जीवना कळून घे रे क्षणभंगूरच जीवन
राव रंकही रितेच गेले हेच पुरावे आता !! ”
पण जीवन क्षणभंगूर असले म्हणून काय झाले ती एक मोठी परीक्षा असल्याचे सांगतात या दोन ओळी
“ आयुष्य एक परीक्षा आहे
ती तुला द्यावीच लागेल ”
खरे तर माणूस आपले जीवन जगत असतांना का कुणास ठावूक जाती - धर्माचा विचार करून जास्त जगतो आणि त्यातून जातीय विषमता, भेदभाव घडून समाजाचे आरोग्य बिघडते. त्यावर डॉक्टर दाखला देतात पावसाचा आणि काय लिहितात बघा,
“ पावसालाही जर जात असती ना,
तर साऱ्या विश्वाला त्यानं
गुलाम बनवलं असतं
पण मनसोक्त कोसळतांना
त्यानं काही जातीयवाद केला नाही ”
पण हाच पाऊस मात्र जीव घेतो बळीराजाचा. जेव्हा पाहिजे तेंव्हा येत नाही आणि नको तेव्हा गारपीट, वादळ घेऊन येतो. आणि दोन्ही स्थितीत उध्वस्त होतो तो कास्तकार,
“ कोठे अवकाळी
कोठे कोरडा दुष्काळ
विव्हळतो श्रावणबाळ शेतकऱ्यांचा ”
दिवसा तर दिवसा पण रात्रपाळी करून या जगाची खळगी भरणारा मात्र त्याची होत असलेल्या अवहेलने मुळे उपाशी झोपतो याला मार्मिक शब्दांची जोड देत त्याची हार मांडणाऱ्या या दोन ओळी पण लक्षवेधी झाल्या आहेत,
“ शेतात राबणारा का झोपतो उपाशी
साऱ्या जगात पुन्हा त्याचीच हार झाली ”
 त्याचबरोबर आज आपल्या समाजातील एक ज्वलंत प्रश्न म्हणजे मुलींच्या होणाऱ्या भृणहत्या. अनेक कवी, लेखक आपली सामाजिक बांधिलकी, कर्तव्य या नात्याने भृणहत्या होऊ नये यासाठी काव्य संदेश देत राहतात. आणि मुली वाचल्या तर उद्धार होईल हे लोकांच्या मनात बिंबवत असतात. डॉ. राज सरांनी सुद्धा आपल्या मुलगी या कवितेतून मुलीला दीप म्हणत तिचा सन्मान केला आहे,
“ मुलगीच दीप आहे माझ्या घरात मित्रा
विझवायची कशाला ही दीप वात मित्रा
आनंद आज होतो पाहून खेळतांना
या अंगणात माझी मुलगी प्रभात मित्रा ”
पण आजची परिस्थिती अगदी हाता बाहेर गेली आहे.  राजरोसपणे मुलींवर अत्याचार होत आहेत.  कित्येक निर्भया बलात्काराची शिकार होतात. याबद्दल डॉ. राजजी विद्रोही भूमिका घेत 'कसले स्वातंत्र्य' या कवितेच्या प्रस्तूत ओळीतून आलेले प्रश्नचिन्हे कवीचा आक्रोश मांडत आहेत. उपहासाने So Called स्वातंत्र्य भोगा म्हणत.
“ मेणबत्त्या घेऊन मोर्चा काढणे
कोणाची शांती आणि कशासाठी
अरे !!
मशाली पेटवायची वेळ आली आहे
आणि तुम्ही चक्क षढासारखे
मेणबत्त्या घेऊन फिरताय
आणि म्हणता देश स्वातंत्र्य झाला !!
कोणता देश, कोणाचा देश ?
आणि कोणा साठी झाला ?

कविता, गझल, मुक्तछंद असे विविध प्रकार त्यांनी हाताळले आहेत. प्रेम विद्रोह, पर्यावरण यांना देखील काव्यस्पर्श केला आहे. ओंकार प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या भेट कवितासंग्रहात एकूण ६८ कवितांचा समावेश. मनमोहक मुखपृष्ठ आणि पुस्तकाची सुबक मांडणी दर्जेदार झाली आहे. त्यांच्या डॉक्टर मित्रांचे अभिप्राय
अब्दुल हकीम (अंबड )
आणि श्रीमती आशा नरेंद्र त्रिवेदी यांची प्रस्तावना बोलकी आहे. भेट या काव्यसंग्रहातून वाचकांना काव्यसुमनांची उत्कृष्ठ भेट देणाऱ्या डॉ. राज रणधीर सर यांचे मी खूप खूप अभिनंदन करतो. आणि भविष्यातील दर्जेदार साहित्य निर्मितीच्या प्रवासाला हार्दिक - हार्दिक शुभेच्छा देतो. थांबतो.
धन्यवाद.
अब्दुल हकीम (अंबड )

9273602397

Post a Comment

2 Comments

  1. धन्यवाद सर
    माझ्या काव्यसंग्रहाचे परीक्षण आपल्या पेजवर post केल्याबद्दल

    ReplyDelete

आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय, आणि सुचनांचे स्वागत आहे .
सोबतच्या 'सदस्य व्हा' या रकान्यात इमेल भरून आपण साहित्य भारती चे विनामुल्य सदस्य होऊ शकता.