पुस्तक परिचय - भूमिका ( कथा संग्रह ) विद्या कुलकर्णी

 ‘भूमिका’ हा सौ. विद्या कुलकर्णी यांचा कथासंग्रह शिवप्रज्ञा प्रकाशन, सोलापूर यांनी प्रकाशित

marathi- story book
 भूमिका ( कथा संग्रह )
केलेला आहे. मुखपृष्ठ शिरीष घाटे यांनी साकारले असून मुद्रितशोधन पुरुषोत्तम नगरकर यांनी केले आहे. या  कथासंग्रहास सोलापूर विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. इरेश स्वामी यांची प्रस्तावना लाभलेली आहे.
      सौ. विद्या कुलकर्णी या कवयित्री म्हणून वाचकांना ज्ञात आहेत. त्यांचे ‘रे मना’, ‘गीतांजली’ हे काव्यसंग्रह  प्रसिद्ध आहेत.‘भूमिका’ कथासंग्रहाच्या माध्यमातून त्यांच्या कथा रसिकांसमोर येत आहेत.
      स्त्रीशिक्षणाने स्त्रीच्या जीवनात आमूलाग्र बदल झाले. शिकल्यानंतर नोकरी करून संसाराची अर्धी आर्थिक  बाजू स्त्री सांभाळू लागली. त्यामुळे ती पुरुषांची खर्‍या अर्थाने ‘अर्धांगिनी’ झाली. विद्या कुलकर्णी यांच्या कथांत बहुतांशी, नोकरी करणार्‍या स्त्रियांच्या वाट्याला आलेली दु:खे चित्रित झाली आहेत.
       स्त्रीचं जीवन हे दोन टप्प्यांत विभागलेलं असतं. सुरुवातीचा काळ आई-वडिलांच्या घरचा. तिथे तिचा जन्म, पालन-पोषण होते. दुसरा टप्पा म्हणजे लग्नानंतरचा. आई-वडील, बहीण, भाऊ अशी नाती दुरावून तिला  पतीच्या घरी सासू, सासरा, दीर, नणंद अशी कितीतरी नवी नाती निर्माण होतात. ती जोपासावी लागतात. तिला ती आपलीशी करावी लागतात. नोकरी करणार्‍या स्त्रियांची समस्या आणखी निराळी. मातृत्व प्राप्त झाल्यानंतर मुलाचे पालनपोषण व संगोपन करण्याची जबाबदारी तिच्यावर येऊन पडते. नोकरी करणार्‍या स्त्रियांना घरच्या इतर सदस्यांची साथ लाभतेच असे नाही. बर्‍याच वेळा आपल्या काळजाच्या तुकड्याला पाळणाघरात ठेवून तिला नोकरीच्या ठिकाणी जाणे भाग असते. निम्मे लक्ष कामात व निम्मे लक्ष आपल्या मुलावर अशी तिची द्विधा अवस्था झाल्याशिवाय राहात नाही.
      ‘तू दूर दूर तेथे’ या कथेत लेखिकेने आपल्या प्रिय व्यक्तीविषयीची प्रेमभावना चित्रित केलेली आहे. आपला प्रियकर दूर असल्यानंतर तिच्या मनात विरहाची भावना निर्माण होते. त्याच्या आठवणी, त्याचे बोलणे-चालणे, त्याच्या  सवयी, लकबी तिला आठवू लागतात. अत्यंत समर्पक व कोमल शब्दांत त्यांनी स्त्रीमनाच्या हळुवार वेदना चित्रित  केलेल्या आहेत.
‘भाग्यश्री’ या कथेत लेखिकेने सतत मुलीच होत असलेल्या स्त्रीची समस्या मांडली आहे. भाग्यश्रीला 
marathi sahityik vidya kulkarni
विद्या कुलकर्णी
9764218225 
एकापाठोपाठ मुलीच होतात. तिची इच्छा नसता तिचा वारंवार गर्भपात केला जातो. खाष्ट सासू व तिच्या ऐकण्यात असलेला निष्क्रिय पती यापुढे तिचे काहीएक चालत नाही. तिला स्वतंत्र विचार करण्याची सोय नसते. ती शिकलेली, पदवीधर असून व नोकरी करत असूनही तिचे विचारस्वातंत्र्य एकत्र कुटुंबव्यवस्थेत कोंडले जाते. सासू अशिक्षित असूनही तिच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर वारंवार गदा आणते. कायदे हे स्त्रियांच्या बाजूने असले तरी या
कुटुंबव्यवस्थेमुळे कोणतीही स्त्री पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करू शकत  नाही. कारण ही समाजव्यवस्थाच इतकी भक्कम असते की परित्यक्ता स्त्रीला पुन्हा या समाजाशी संघर्ष करावा लागतो. अखेर असह्य होऊन भाग्यश्री स्त्रीभ्रूणहत्येची वार्ता पोलीस स्टेशनला देते. हॉस्पिटलमध्ये सर्व डॉक्टरांची धरपकड होते. या प्रकरणाला प्रचंड प्रसिद्धी मिळते. सासूबाई दुसर्‍या लेकाकडे निघून जातात. इन्स्पेक्टर साने या प्रकरणाकडे वैयक्तिक लक्ष देतात. पतिराजही हतबल होतात. अखेर भाग्यश्री आपल्या मुलीला जन्म देते. तिच्या या कृत्यामुळे तिचा बँकेत सत्कार होतो. धैर्याने ओतप्रोत भरलेली ही कथा नक्कीच आजच्या स्त्रियांमध्ये प्रेरणा व धाडस निर्माण करणारी आहे.
     ‘रबडी’ या कथेत लेखिकेने पाण्याच्या समस्येशी निगडित असलेली स्त्रीसमस्या मांडली आहे. रबडी ही गरीब घरची मुलगी. नळाला पाणी येत नसल्याने तिला सार्वजनिक ठिकाणी पाण्यासाठी दूरवर जावे लागते. पाण्यासाठी वणवण भटकताना ती हमरस्त्यावर येते. तेथे ती एक पाण्याचं भांडे घेऊन रस्ता ओलांडत असताना तिला एक कार येऊन धडकते. त्यात ती जखमी होते. तिच्या कडेवरचे भांडेही पडते. गाडीतला मुजोर माणूस शांतपणे सिगारेट ओढत
ओढत म्हणतो, ‘ये लोग दोन बोतल पानी के लिए कितना मरते है यार!’ शहरातील विपुल पाणी असलेल्या ठिकाणी वास्तव्य असलेल्या व बिसलेरीचे महागडे पाणी
सतत पिणार्‍या या व्यक्तीला पाणीटंचाई असलेल्या भागातील भीषण वास्तव आणि पाण्याचे महत्त्व काय माहीत असणार? ‘क्यों झंजट मोल ले रहे हो यार! बस्तीवाले लोग आ जायेंगे तो बहुत बडी किमत चुकानी पडेगी| उपरसे पुलीस केस हो जायेगी और यहॉं सुखेमे बारबार आना पडेगा’ असे म्हणून रबडीला आहे त्याच अवस्थेत टाकून परागंदा होतात. या अपघातात तिचा डावा हात कायमचा लुळा होतो व ती भविष्यात छोटीशी कळशीही उचलू शकत नाही. हा
मानवी जीवनाचा विकृत पैलू लेखिकेने अत्यंत समर्पक शब्दांत टिपला आहे.
‘द लायन वुमन’ ही कथा बालकांना खूपच आवडेल. लायन वुमन ही स्पायडरमॅन किंवा सुपरमॅनप्रमाणे असणारे काल्पनिक पात्र रेखाटताना लेखिकेने अनेक गंमतीदार प्रसंग उभे केले आहेत. गुन्हेगारी विश्‍वाशी संबंधित असणारी लायन वुमन शाळेच्या विश्‍वात किती हाहाकार माजवते हे कथा वाचल्याशिवाय लक्षात येणार नाही.
marathi sahityik rajendra bhosale
राजेंद्र भोसले
एकंदरीत, लेखिका या सिद्धहस्त कवयित्री असल्याने त्यांची लेखनशैलीही तरल आहे. मनातील तरल भावना त्या अत्यंत साध्या शब्दांत अभिव्यक्त करतात. एखादा कथाभाग वाचताना तो वाचकांच्या डोळ्यांसमोर तो प्रसंग उभा राहतो. 


     राजेंद्र भोसले, सोलापूर
     9881786466

1 Comments

आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय, आणि सुचनांचे स्वागत आहे .
सोबतच्या 'सदस्य व्हा' या रकान्यात इमेल भरून आपण साहित्य भारती चे विनामुल्य सदस्य होऊ शकता.

Previous Post Next Post