पुस्तक परिचय - (‘आत्मनाद’ कथासंग्रह)

marathi-books-sahityik-asha-patil, marathi-story-book
 ‘आत्मनाद’  कथासंग्रह
सौ. आशा पाटील यांचा ‘आत्मनाद’  कथासंग्रह पार्टनर पब्लिकेशन, विरार (प.) यांनी प्रकाशित केला आहे. मुखपृष्ठ विशाल धाडवे यांनी साकारले आहे. या कथासंग्रहात एकूण सत्तावीस कथांचा समावेश आहे.
‘शंतनू’ या कथेत शिक्षिकेला आपला माजी विद्यार्थी ‘शंतनू’ अचानक भेटतो. चरणस्पर्श करतो.  ओळख सांगितल्यावर शिक्षिकेला आश्‍चर्य वाटते. पुढे कॉलेजात त्याला बारावीत चांगले गुण मिळून वैद्यकीय शाखेत प्रवेशही मिळाल्याचे तो सांगतो. परंतु तो आपल्या शिक्षिकेचे ऋण विसरत नाही. ‘आपला विद्यार्थी कर्तबगार निघणे, यासारखा शिक्षकाला पुरस्कार नाही’ असे लेखिकेला वाटते. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत तो शिकत असतो. त्याचे आई-बाबा तो लहान असतानाच एका अपघातात निवर्तले असतात. आजी-आजोबांनी त्याचा सांभाळ केलेला असतो. असा हा ‘शंतनू’ तापाच्या आजारातून निधन पावल्याची वार्ता एके दिवशी त्याच्या चुलत भावाकडून शिक्षिकेला कळते. त्यावेळी शिक्षिकेला प्रचंड धक्काच बसतो. ही हळहळ लेखिकेने ‘शंतनू’ या कथेतून मांडली आहे. नियतीच्या या अन्यायापुढे वाचकाचे मन अस्वस्थ झाल्याशिवाय राहत नाही.
marathi-sahityik-asha-patil, marathi-story-book
सौ. आशा पाटील
‘निर्णय’ या कथेत एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाची व्यथा मांडली आहे. शांताराम हा ऑफिसमध्ये काम करणारा कर्मचारी. पत्नी व आपल्या मुलांसमवेत आनंदाने राहत असतो. परंतु एके दिवशी विपरीत घडते. ऑफिसमध्ये बॉसने पलटी मारल्यामुळे त्याच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप होतो. त्यास कामावरून कमी केले जाते. नातेवाईक व समाजाकडून त्याची निंदानालस्ती व उपेक्षा केली जाते. हा कलंक घेऊन जगणे त्याला शक्य नसते. आत्महत्या करण्यासाठी तो नदीच्या पुलावर जाण्यास निघतो. तेथे गेल्यावर समोर त्याला वाळूतून पैसे शोधणारी दोन मुले दिसतात. सहज चौकशी केली असता मुले त्यांच्याशी सहज संवाद साधतात. ती मनमोकळेपणाने बोलू लागतात. चौकशीअंती समजते की, त्यांचे आई-वडील अपंग आहेत. ते मंदिरासमोर पूजेच्या वस्तू विक्री करतात. ही दोन्ही मुले शाळा करून फावल्या वेळेत पैसे शोधून आपल्या आई-वडिलांना हातभार लावतात. त्यांची इच्छाशक्ती मोठी असते. एकाला इन्स्पेक्टर व एकाला शिक्षक व्हायचे असते. या त्यांच्या इच्छाशक्तीकडे पाहून शांतारामचा आत्महत्येचा निर्णय क्षणात बदलतो. ज्यांना धड घर नाही, दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे, अशी मुले उच्च स्वप्ने उराशी घेऊन जगतात, तर आपण का उगीचच जीव द्यायचा?  येणार्‍या संकटांशी दोन हात करून जगायचे असा निश्‍चय तो करतो.
      ‘दुरावलेली माणसं’ मध्ये लेखिकेने मोबाईल चोरीला गेल्यावर त्याचे शोधकार्य चित्रित केले आहे. ‘अट्टहास’ या कथेत सुरेशचे स्त्री-भ्रूणहत्येच्या विचारांपासून परावृत्त झाल्याने ही कथा स्त्री-भ्रूणहत्येचे परिणाम सांगते. ‘आधार’ या कथेत अनाथाश्रमातील मुलांचे दु:ख मांडले आहे. ‘शेवंताबाई विरुद्ध आवडाबाई’ या कथेत दोघींतील क्रिकेटची मॅच विनोदी पद्धतीने मांडली आहे.
‘आत्मनाद’ मधील कथा या मध्यमवर्गीय समाजाची दु:खे, व्यंगे मांडताना दिसतात. त्यांच्या लेखनात मुलांची शिकण्याविषयी तळमळ, हुशार मुलांचे कौतुक, गरिबीविषयी कळवळा आहे. परिस्थितीशी हतबल झालेली
marathi-sahityik-asha-patil, marathi-story-book
राजेंद्र भोसले
माणसे परिस्थितीला सामोरे जाताना दिसतात. आधुनिक काळातील मोबाईल, दुचाकी गाडी, फोन, दवाखाना, ऑफिस अशा  शहरातील आधुनिक वातावरणाभोवती त्यांच्या कथा फिरताना दिसतात. ‘मेसेज’, ‘सुगरण’, ‘एकटी’, ‘प्रतीक’, ‘उणीव’ याही कथा उल्लेखनीय झाल्या आहेत.
रोजच्या व्यवहारातील शब्द, साधी व सरळ भाषा यामुळे कथा वाचकांच्या मनाचा ठाव घेतात. ‘संस्कारक्षम कथा’ म्हणून या कथा फारच उपयोगी आहेत.  
पुस्तक परिचय लेखन - राजेंद्र भोसले

Post a Comment

1 Comments

आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय, आणि सुचनांचे स्वागत आहे .
सोबतच्या 'सदस्य व्हा' या रकान्यात इमेल भरून आपण साहित्य भारती चे विनामुल्य सदस्य होऊ शकता.