वाचनीय असा "अभिजात कथांचा, 'मन धागा धागा'
![]() |
मन धागा धागा - कथा संग्रह |
अभिजात कथांचं एक वैशिष्ट्य असतं. ह्यात मनोरंजन असतं. जीवनातला संघर्ष असतो. भाव रम्यता शब्दनाद असतो. शब्दांची चपखलता असते आणि त्यात जीवनाचं एक असं काही मार्मिक तत्वज्ञान असतं की, लेखकाच्या शैलीला एक विशिष्ट साहित्याच्या परिभाषेत मानवीय सौंदर्याच्या परिपूर्णतेचा एक गोडवा प्रदान करतात.
मन धागा धागा.. असाच एक कथासंग्रह नवोदित साहित्यिक श्री राजेंद्रकुमार घाग यांचा डिंपल प्रकाशन, गिरगाव मुंबई यांनी प्रकाशित केला आहे. यात एकूण एकवीस कथा आहेत. सुप्रसिद्ध कवी डॉ. महेश केळुस्कर यांनी स्वानुभवावर आधारित रोचक कथा म्हणून प्रस्तावना लिहिली आहे. ते म्हणतात,"या लघुकथा स्वानुभवावर आधारित असल्याने त्यात एक नैसर्गिक सहजपणा आहे.या कथा आपण वाचत आहोत, असं न वाटता प्रत्येक गोष्ट आपण ऐकत आहोत असा वाचकाला प्रत्यय देण्यात राजेंद्रकुमार घाग यशस्वी होतात. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यात पुष्कळ काळ त्यांचा रहिवास झालेला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये बोलली जाणारी बोली भाषा तिथले लोकजीवन, सामान्य माणसांचे राग, लोभ, हर्ष, विमर्ष, त्यांचे आपापसातले नातेसंबंध, त्यांचा मोठेपणा, बेरकीपणा, कोकणचा निसर्ग आणि त्याची विविध रूपे कथाकाराच्या मनात लपलेली आहेत. या सगळ्या सामुग्रीचा यथार्थ उपयोग करण्याचे कौशल्य या लेखकाशी आहे."
![]() |
राजेंद्रकुमार घाग 7840972682 |
माझ्या मते हा सहजपणा या सर्व एकवीस कथांचा बाज जपतो.जागोजागी केलेली बोलीभाषेची पसरण साहित्याच्या अवीट गोडीला या सर्व कथांमध्ये पोषकच ठरले आहे. 'लमाण्याची भाकरी' ही कथा(पान क्र.६०)ती म्हणाली, 'ये सायबा काय बघतोस माझ्या जेवर कडे?' आणि ती हसली... इथे एक वेगळ्याच अर्थी गुड रम्यता वाढते.
मी म्हणालो, 'मला तुमची भाषा कळतच नाही. यावर मात्र टेकाबाई थोडी गंभीर झाली आणि म्हणाली, 'तुला काय बी कळत नाय सायबा, तू उद्या इथं भाकरी खायला येव नग...' कथा इथुन एका वेगळ्याच वळणाकडे झेप घेते. वाचकांनी इथे कथा पूर्ण वाचावी. शेवटाकडे वळताना कथा 'शाश्वत जीवन मूल्यांचा ' वेध घेते. त्यासाठी ही काही वाक्ये मी आवर्जून येथे देत आहे.
' टच्चकन टेकाबाईच्या डोळ्यात पाणीआलं.' मला म्हणाली, 'ए सायबा, माझा पोरगा गावाकडं हाई.. बारावी शिकतु.. तुझ्याकडं बघिटलं की तेची याद येते नई का? माझा मालक बी मला थेच म्हटला की, आम्ही दोगा बिगारी असलो तरी आमच्या सिद्धापाला ओरशियर करणार माई.(म्हणजे इंजिनीयर) लेखक म्हणतात, 'तिच्या घाऱ्या डोळ्यात एक जीवन स्वप्न तरळत होतं. दूर परराज्यात असलेल्या मुलाला ती माझ्यात पहात होती. त्याक्षणी मला माझ्या आईची आठवण झाली. कथा पुढे सरकताना श्री. घाग या कथा लेखकाने एक अत्यंत मार्मिक टिप्पणी केली आहे. जगातले एक हे वास्तव सत्य आहे. माझ्या मुक्तपुरुष या कथासंग्रहातही माझ्या 'आई' या कथेत असाच पैलू पाडला आहे. किंबहुना जगाच्या पाठीवर अशा सर्वच कथा अभिजात मूल्यांचा गौरव करतात. कारण ते एक जीवनातील शाश्वत सत्य आहे.
लेखक म्हणतो, 'टेकाबाई रोज देशील मला भाकरी?' 'का नई... देणार की...' आईचं वात्सल्य, तिचं मुलांविषयी प्रेम, याला जात-पात नसते, भाषेचं बंधन नसतं. जगाच्या पाठीवरची कोणतीही आई शरीराने बाई असली, तरी मनाने आईच असते. कथा पुढे सरकते.
मला एक गोष्ट या कथासंग्रहातील खूप आवडली. ती म्हणजे, कथा या प्रकारात नेमके पात्र, नेमकी घटना, नेमके वर्णन आणि नेमके शब्द याला फार महत्व असते. कथा तेव्हाच प्रवाही आणि प्रभावी ठरते. वाचनाचा आनंद देते. या सर्व एकवीस कथांमध्ये ही कथेची वैशिष्ट्ये ठासून भरलेली आहेत. कथा कुठेही भरकटलेल्या नाहीत.
![]() |
मन धागा धागा - कथा संग्रह |
बऱ्याचशा कथा, उदाहरणार्थ अनु मावशी, बापू नावाचा मित्र, काझी मामा, सुखी भिकारी, दळवी काका, अश्वत्थाची सळसळ ह्या व्यक्ती चित्रातून पुढे सरकतात. पण ती व्यक्तीचित्रे ठरत नाहीत. तर ते सर्व कथेचा बाज घेऊन पुढे येतात. इथे लेखकाच्या कथा कथन आणि वर्णन याला दाद द्यावीच द्यावी. उदा. अनु मावशी ही पहिलीच कथा. मावशीचं चित्रण, 'मावशीने बोळक्या तोंडाने चहा घेतला. पेल्याच्या तापलेल्या कडे मुळे मावशी चे ओठ भाजले. चेहऱ्यावरच्या सुरकुत्या एकदम ताणून पुन्हा झटकन जवळ आल्या. तिने ओठ आत बाहेर करत चहाचा घोट गिळण्यासाठी सुसह्य केला. 'इथे लेखक म्हणून ते आपल्या निरीक्षण आणि निष्कर्ष यांचं मनोवेधक विश्लेषण पेश करतात. 'मला उगीच वाटलं, अनु मावशीने आयुष्यातील दुःख सुद्धा अशीच सहज गिळली असतील?'
कथा ही मालवणी मुलखातली पुढे पुढे सरकते.पुन्हा शेवट जवळ येताना कथेच्या संग्रहाला शीर्षक आहे, तिथे कथा संपते. एका कवीच्या समर्पक ओळीची ते भुलावण करतात, 'धागा धागा जोडते नवा, मन धागा धागा रेशमी दुवा...!'
सहजता, सुगमता आणि सुमधुरता हे जेव्हा भाषाशैलीला स्पर्श करतात, कथेचा घनपदार्थ म्हणजे मी त्याला साध्या भाषेत कन्टेन्ट म्हणेन, हे जेव्हा एकत्रित येतात, जेव्हा कथा मानवीय स्वभाव सौंदर्याचा पैलू दर्शवितात तेव्हा त्या कथा अभिजात ठरतात. अनु मावशी (पृष्ठ क्र.११), जळो पण पिको (पृष्ठ क्र.२१), लमाण्याची भाकरी (पृष्ठ क्र.६०), बापू नावाचा मित्र (पुष्ठ क्र.३३),त्याचे स्वप्न (पृष्ठ क्र.८१), भेट (पृष्ठ क्र.१०३), ह्या कथा या दृष्टी कोनातून वाचकाला त्याच्या शैलीची जाणिव करून देतात. इथे नवोदित पणाचा कुठेही अंश जाणवत नाही. कारण मी आज पर्यंत साधारणपणे ऐंशी च्या आसपास पुस्तक परीक्षणे लिहिली आहेत. त्यामुळे मी हे ठामपणे या कथासंग्रहाच्या बाबतीत म्हणू शकतो. किंबहुना योग्य हातात पडले तर कदाचित हे पुस्तक अभ्यासकांना एक मार्गदर्शक मैलाचा दगड ठरेल. उदा. पृष्ठ क्र.२१ वरील कथा, 'जळै पण पिको..' एक रूपक कथा. प्रत्येक्षात सांगितली जाते. घडते. त्याची कथा प्रवेशिका म्हणजेच अंतरंगात शिरतानांची प्रस्तावना... बघू या, "निसर्गाची एक गंमत आहे.तो सर्व प्रणीमात्रास, विशेषतः माणसाला त्याच्या चक्रात अडकवून ठेवतो. माणसाने कितीही शोध लावले तरी निसर्गावर तो मात करू शकला नाही." आणि कथा पुढे सरकते.
पृष्ठ क्र. १०८ वरील अश्वथ्याची सळसळ कथेचा गूढरम्य भाव आपल्याला रत्नाकर मतकरींच्या कथांची आठवण करून देतात. कदाचित त्याच कथेतून प्रस्तुत लेखकाला 'रात्रीस खेळ चाले-२' या झी मराठी वाहिनीवरील वरील सिरियल ची संकल्पना स्फुरली असेल.
गेट-टुगेदर साठी सर्व जमतात. आठवणीत सर्व रमतात. कथेचा संघर्ष बिंदू येतो. 'मित्रांनो, अत्यंत वाईट बातमी आहे. आपल्या दहावीच्या बॅचचा आपला एक मित्र....' 'पिंपळाच्या पारावरून तो सगळं हे ऐकत होता. आपल्या नावाचा उल्लेख ऐकून तो सावध झाला...'
पुस्तकाचे मुखपृष्ठ, 'सरदार जाधव' यांचे कथासंग्रहाला साजेसे ठरले आहे. उत्कृष्ट मुद्रण आणि अश्वत्थाची सळसळ या कथेतील एखादी अक्षराची मुद्रित चुक सोडल्यास पुस्तक खूपच आकर्षकरीत्या सादर केले आहे. प्रकाशकांना दाद द्यायलाच हवी. एक उत्कृष्ट कथासंग्रह म्हणून हे पुस्तक अवश्य वाचावे. शाश्वत मूल्यांची जपणूक म्हणून संग्रही ठेवावे, पुस्तकाचे स्वागत...!
पुस्तकाचे नाव:-मन धागा धागा..
लेखक:- राजेंद्रकुमार घाग
प्रस्तावना:- डॉ. महेश केळुसकर
प्रकाशक:- सौ नम्रता मुळे,
डिंम्पल पब्लिकेशन, मुंबई
मुद्रक:-प्रमोद घोसाळकर, प्रतिक आॅफसेट, मुंबई
अक्षरजुळणी:-युनिक सिस्टीम,दादर, मुंबई
एकूण पाने:-११२
मूल्य:-₹१५०/- मात्र
![]() |
डाॅ.दिलीप पाखरे |
डाॅ.दिलीप पाखरे
१०२७, 'उत्तम लक्ष्मी', सौभाग्यनगर,
नाचणे, रत्नागिरी - ४१५६३९
भ्रमणध्वनी क्र.९९७०२०२०४९
-- माध्यमांवर भेटूया --
![]() |
|||
![]() |
![]() |
![]() |
![]() |
Tags:
पुस्तक परिचय