पुस्तक परिचय - बेलवडी ची विरराणी मल्लंमा - डॉ. भीमराव पाटील

बेलवडीची  वीरराणी मल्लम्मा
Book review - belvadichi virrani mallama, dr. Bhimrao Patil, sahitya Bharati
वीरराणी मल्लम्मा
बेलवडीची वीरराणी मल्लम्मा यांच्या जीवन कार्यावरील मराठी भाषेतील एकमेव प्रथम पुस्तक.
बेलवडीची वीरराणी मल्लम्मा या पुस्तकात प्रा भीमराव पाटील सरांनी मल्लम्मा उर्फ सावित्रीबाई देसाई यांच्या कार्यावर प्रकाश टाकला आहे. या पुस्तकातील पहिल्या प्रकरणात मल्लम्माच्या इतिहासाच्या साधनांचा सविस्तर उल्लेख आला आहे. बेलवडीचे भौगोलिक स्थाननिर्देश, संस्थानाची आणि राजघराण्याची निर्मिती, राजवंशावळ यांची माहिती मिळते.
 भीमप्पागौड व पार्वतीम्मा या शूर व कर्तबगार प्रजाहितदक्ष राजदांपत्यांनी बेलवडी संस्थानाची स्थापना केली. भीमप्पागौड यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी, मुलगी, जावई यांनी राज्यकारभार सांभाळला. ईश्वरप्पाशी मल्लम्माचा विवाह झाल्यावर ईश्वरप्पाने राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली. या पुस्तकात बेलवडीच्या इतिहासाबरोबर सोंधीचा ओझरता इतिहास वाचायला मिळतो. सोंधी राजघराणे सुखी, समृद्ध आणि ऐश्वर्यसंपन्न होते.
तसेच सोंधीच्या पूर्व इतिहास,  मल्लम्माचे व्यक्तिमत्त्व, तिचा स्वभाव व तिच्या स्वयंवराची माहिती विस्ताराने वाचायला मिळते. मल्लम्माची इतिहासाने घेतलेली दखल आणि तिची ऐतिहासिक नावे, तिच्या इतिहासाची साधने, राजघराण्यांची माहिती ही या पहिल्या प्रकरणाचे आकर्षण आहे.
या पुस्तकाच्या दुसऱ्या प्रकरणात मल्लम्मांच्या आदर्श राज्यकारभाराचे चित्रण लेखकांनी केले आहे. राणी मल्लम्मा आणि इशप्रभु यांनी आदर्श प्रजाहितदक्ष राज्यकारभार केला याचे विस्तृत वर्णन या प्रकरणात आहे. मल्लम्माने प्रजेचे सुखदुःख समजून घेतले त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरक्षिततेसाठी अनेक  योजना केल्या. तिने दरोडेखोर, चोर, लुटारूचे मनपरिवर्तन कसे केले, याचे वर्णन प्रेरणादायी आहे. सुखी राजा सुखी प्रजा असा राज्यकारभार मल्लम्माने केला. नागभूषण हा तिचा पुत्र होता.
दक्षिण दिग्विजय या प्रकरणात छ शहाजीराजे यांच्या राजकीय कार्याचा धावता आढावा घेतला आहे. दीड वर्ष चाललेल्या दक्षिण दिग्विजयाची आटोपशीर पण महत्वाची माहिती या प्रकरणात आहे. बीदनूरची स्वारी व केळदी आणि बेलवडी या राजघराण्याशी असणारे त्यांचे मित्रत्वाचे आणि सहकार्याचे संबंध यांचे विस्तृत वर्णन आहे.
बेलवडीची लढाई हे प्रकरण या पुस्तकाचे हृदय आहे. वीरराणी मल्लम्मा आणि सेनापती सकूजी गायकवाड यांच्यात झालेल्या युद्धाची कारणमीमांसा या प्रकरणात केली आहे. त्यांचा परिपूर्ण इतिहास आणि संदर्भ या पुस्तकात वाचण्याजोगे आहेत. शूर राजा ईशप्रभू निकराने सकूजी गायकवाड सोबत लढा दिला. या युध्दात जखमी झाल्याने ईशप्रभुचा मृत्यू झाला.  ईशप्रभूच्या मृत्यूनंतर मल्लम्माने रडत न बसता शस्त्र हातात घेतले. २७ दिवस मराठे सैन्याशी युद्ध केले. शेवटी कपटनीतीने तिला जेरबंद करण्यात आले. सकूजीने तिचा अवमान केला शिवरायांनी मल्लम्मा अभय देऊन तिचे राज्य परत केले. मल्लम्माने  शिवरायांना भाऊ आणि शिवरायांनी मल्लम्माला बहीण मानले. मल्लम्माने शिवरायांचे असंख्य शिल्प तयार केले. त्यापैकी यादवाड येथील एक. ५०० युवतींना प्रशिक्षण देऊन त्यांचे स्वतंत्र सैन्यदल उभे करणारी आणि पतीनिधनानंतर तलवार हातात घेऊन लढणारी मल्लम्मा रणरागिणी आहे, असा अभिप्राय लेखक नोंदवतात.
शेवटच्या प्रकरणात बेलवडीतील ऐतिहासिक स्थळे, शिलालेख, मंदिरे, मूर्ती, राजवाडा, राजवटी, बेलवडीच्या नावाचा इतिहास, लोकमाणसातील राणी मल्लम्माचे स्थान याची माहिती तर आहेच याशिवाय यादवाड येथील शिल्पाचे ऐतिहासिक वर्णन आणि इतिहासकार इंद्रजित सावंत यांची ऐतिहासिक नोंद या प्रकरणात आहे. जरूर वाचावे आणि वाचत राहावे, असे हे पुस्तक आहे.
लेखक: प्रा डॉ भीमराव पाटील, लातूर.
प्रकाशक: शरण साहित्य मंडळ , लातूर.
वितरण मूल्य: ३० रु

परिचय लेखन - अभिषेक देशमाने
 म 972677461.


-- माध्यमांवर भेटूया --

Post a Comment

1 Comments

आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय, आणि सुचनांचे स्वागत आहे .
सोबतच्या 'सदस्य व्हा' या रकान्यात इमेल भरून आपण साहित्य भारती चे विनामुल्य सदस्य होऊ शकता.