आनंदयात्री बालकवी - दुर्गेश सोनार


काही वाचलेले... काही भावलेले...  आनंदयात्री बालकवी  

- दुर्गेश सोनार

आनंदयात्री बालकवी  - दुर्गेश सोनार
बालकवी
अगदी लहानपणापासून जसं वाचनाचं वेड लागलं, तसं बालकवींच्या कवितांचं गारुड मनावर भिनत गेलं. अत्यंत तोकडं आयुष्य जगलेल्या बालकवींच्या कवितांमधली तरलता, गेयता आणि नादमाधुर्य मनात खोलवर रुजलं गेलं. 'आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहिकडे...' असं म्हणत आनंदाचं गाणं गायला लावणारे बालकवी माझ्या अगदी नकळत्या वयात कधी आपलेसे होऊन गेले हे कळलेही नाही. त्यानंतरच्या काळात कवितांचा छंद जडला आणि बालकवी हे माझं दैवतच बनलं. बालकवींचं निसर्गप्रेम आणि निसर्गातल्या प्रतिमांची उत्कटता माझं कायमच प्रेरणास्थान ठरलं आहे.


सध्याच्या शहरीकरणाच्या बदलत्या जीवनशैलीत खरंतर निसर्गातला निखळ आनंद मिळणं हे दुरापास्तच आहे. त्यामुळेच शहरातल्या आजच्या पिढीला बालकवींच्या कवितांमधला हा निसर्ग म्हणजे निव्वळ कवीकल्पना वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, अत्यंत अस्वस्थ करणाऱ्या सध्याच्या वातावरणात निवांत एकांती डोळे गच्च मिटून बालकवींच्या कविता गुणगुणायला लागलो की, त्यांच्या कवितांमधला निसर्ग आपल्यावर आनंदाची चौफेर उधळण करत असल्याचा अनुभव नक्कीच येऊ शकतो.वरती खाली मोद भरे, वायूसंगे मोद फिरे
नभांत भरला, दिशांत फिरला, जगांत उरला
मोद विहरतो चोहिकडे... आनंदी आनंद गडे...
नोकरी धंद्याच्या निमित्ताने आज खेडेगावातल्या कित्येक पिढ्या शहरांमध्ये स्थायिक झालेल्या आहेत. या प्रत्येकाच्या मनात आपलं गाव कुठेतरी घर करून बसलेलं असतं. शहरात असलो तरी गावाशी जुळलेली नाळ इतकी सहजासहजी तुटत नाही. त्यामुळेच मुंबईसारख्या मायानगरी महानगरांत लोकलच्या गर्दीतून लटकत, लोंबकळत प्रवास करत असतानाही गावाकडचा तो औदुंबर आपल्याला साद घालत राहतो.


बालकवी
ऐलतटावर पैलतटावर हिरवाळी घेउन
निळासावळा झरा वाहतो बेटांबेटांतुन
चार घरांचे गांव चिमुकले पैल टेकडीकडे;
शेतमळ्याची दाट लागली हिरवी गर्दी पुढे


पायवाट पांढरी तयांतुनि अडवीतिडवी पडे;
हिरव्या कुरणांमधुन चालली काळ्या डोहाकडे
झाकळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर;
पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर


आता बालकवींनी वर्णन केलेल्या या औदुंबर कवितेतलं गावाकडचं चित्र शहरात पाहायला मिळणं हे अजिबात शक्य नाही. बालकवींना शेतमळ्यातल्या पिकांची हिरवी गर्दी दिसते आणि आपल्याला मात्र अवतीभवती दिसत राहते, ती रोजच्या रोजीरोटीसाठी घड्याळाच्या काट्यावर धावपळ करत असलेली चाकरमान्यांची भाऊगर्दी...! शेताभोवतीच्या तळ्यात मस्त पाय पसरून बसलेला औदुंबर हे बालकवींनी रेखाटलेलं चित्र एकीकडे आणि रसायनमिश्रीत काळ्याशार पाण्यानं ओसंडणारे नाले आणि त्याच्या दुर्गंधीच्या साथीत भवतालच्या झोपडपट्टींमधून फोफावणारं शहरी वास्तव दुसरीकडे... घड्याळाच्या काट्यावर तोलून मापून आयुष्य जगणाऱ्या आजकालच्या महानगरी संवेदनांमध्ये बालकवींच्या कवितांमधली इतकी तरल संवेदना सापडणं महाकठीण...

कलावंताचं जगणं आणि त्याचं बहरणं यात सगळ्यात महत्त्वाची ठरते ती त्याच्या अंतर्मनात असलेली अस्वस्थता... ही अस्वस्थता जितकी पराकोटीची तितकाच त्यातून व्यक्त होणारा कलाविष्कारही उच्चकोटीचा ठरू शकतो. अस्वस्थतेतून येणारी उदासीनता आणखीनच अस्वस्थ करत जाते. नेमकी हीच भावावस्था बालकवींनीही अनुभवली होती. याच भावावस्थेतून बालकवी लिहितात...


कोठुनि येते मला कळेना
उदासीनता ही हृदयाला
काय बोचतें तें समजेना
हृदयाच्या अंतर्हृदयाला...

या अस्वस्थतेला उपाय तो काय शोधायचा, अत्यंत वेदना देणाऱ्या, हृदयाला बोच लावणाऱ्या या उदासीनतेवर तोडगा तो काय काढायचा, असा प्रश्न बालकवींना पडला आणि त्यातूनच ते पुढे लिहितात...
मुक्या मनाचे मुके बोल हे
घरें पाडिती पण हृदयाला
तीव्र वेदना करिती, परि ती
दिव्य औषधी कसली त्याला ?


उदासीनता घालवणाऱ्या दिव्य औषधीच्या शोधात बालकवी असले तरी अशी दिव्य औषधी बालकवींच्याच प्रतिभाशक्तीत होती. त्यामुळेच...
'गर्द सभोंतीं रान साजणी तूं तर चाफेकळी !
काय हरवलें सांग शोधिसी या यमुनेच्या जळीं?'
इतकी निरागस, निर्व्याज कविता बालकवी लिहू शकले, निसर्गाला आतून साद घालू शकले. त्यामुळेच शहरांतून हद्दपार झालेल्या निसर्गाची सय आली की आपसूकच मन बालकवींच्या कवितांकडे वळतं. भुलभुलैय्याच्या शहरी वास्तवातून मनावर आलेलं उदासीनतेचं मळभ दूर करायचं असेल तर बालकवींच्या कवितांच्या कुशीत स्वतःला छानपैकी झोकून द्यावं आणि हिरव्या हिरव्या गार गालिचांचा मस्त अनुभव घ्यावा...


दुर्गेश सोनार,
- दुर्गेश सोनार,
नवी मुंबई
फोन नं. ९९२०७०४११३

आमच्याशी जोडले जा 
 शेअर करा

Post a Comment

0 Comments