पानगळ - ललित - सचिन कुलकर्णी

पानगळ 

पानगळ  - सचिन कुलकर्णी 

पाना - फुलांनी बहरलेल्या झाडावरच्या प्रत्येक पानाला वाटायचे की ,
" आमच्या अस्तित्वामुळेच शोभा आहे या झाडाला " आणि
पाने वाऱ्याबरोबर आपल्या तुकतुकीत हिरव्या रंगाचे कौतुक
करीत स्वतावरच खुश होऊन थिरकत राहायची . जन्मदात्या
झाडाच्या ओबड-धोबड सुरकुतलेल्या खोडा ; फांद्याचा तिरस्कार
करीत कुजबुजत राहायची आपल्याच मस्तीत .पाना-पानांच्या
बेचक्यात पक्षांनी नव्यानेच विणलेली घरटी पाहून पानांना वाटायचे,
की आम्हीच आहोत आधार या पाखरांचे आणि गर्वाने पाने नुसती फुलून जायची .
झाड मात्र शांत,स्तब्ध असायचे . मूकपणे आपल्या नादान लेकरांच्या
या दर्पोक्तीकडे वडीलकीने दुर्लक्ष करायचे . त्यांचा उनाडपणा कौतुकाने पहायचे.
अधून-मधून झाड आपल्या पानांना समजवायचे '' कि बाळानो माझ्या
मजबूत फांद्यांच्या आधाराने सुखरूप रहा ". पाने मात्र आपल्याच धुंदीत होती,
म्हणायची " आम्ही नसल्यावर काय किंमत आहे या झाडाला ,
आमच्यामुळेच हे सुंदर दिसते ,आणि याची घनदाट गार सावलीही आमच्यामुळेच आहे ,
आमच्या शिवाय या झाडाचे आयुष्य एखाद्या रित्या भांड्यासारखेच आहे ''.
पानांच्या या उथळ बोलण्याने झाड खूप दु:खी व्हायचे ,पण क्षणभरच.
कारण झाडाला धीम्या पावलांनी येत असलेली पानगळ दिसत होती.

lalit sahitya - pangal, sahitya bharati, marathi sahityik, sahitya,
पानगळ  - सचिन कुलकर्णी 
शेवटी गाठलेच पानगळीने झाडाला आणि ऐन तारुण्यातील पानांनी
पानगळीच्या सोबतीने झाडाच्याच विरोधात बंड पुकारले ,
ध्येयहीन उलथा-पालथ सुरु झाली झाडावर .
एकेक पान झाडाचा हात सोडू लागले आणि भिरभिरू लागले बंधमुक्त.
वाऱ्यावर झोके घेत , हेलकावत पाने जमिनीवर उतरू लागली आणि
उपरोधिक हसू लागली झाडाकडे पाहून .
झाड आता उघडे-बोडके ,निष्पर्ण होऊन , हतबलपणे पहात होते स्वकीयांचीच लुच्चेगिरी .
जमिनीवर येताच पानांना वाऱ्याची मर्जी सांभाळण्या शिवाय गत्यंतरच उरले नव्हते .
आणि तो नेईल तिकडे वहात जात होती इच्छा नसतानाही .
पांथस्तांच्या पायदळी बेगडी स्वातंत्र्याचा चुराडा होत होता ;
असहाय झाली होती पाने झाडाचा हात सोडून .

lalit sahitya - pangal, sahitya bharati, marathi sahityik, sahitya,
पानगळ  - सचिन कुलकर्णी 

झाड मात्र समाधिस्त योग्या प्रमाणे उभे होते, आहे तिथेच , वर्षानुवर्षे .
झाडाला अनुभवाने हेही माहित होते कि पानगळीमागूनच येणार आहे
नव-संजीवन वसंत अन स्वकीयांनी केलेल्या जखमा निघणार आहेत भरून .
झाडाने डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेतला आणि पुन्हा नवी स्वप्ने
मनात साठवून ते वसंताची वाट पाहू लागले . चाहूल लागलीच शेवटी झाडाला
वसंताच्या आगमनाची आणि त्याच्या रंध्रात हळू-हळू कोवळी हालचाल जाणवू लागली .
तांबूस लुसलुसित कोंब डोकावू लागले ,त्यांच्या निरागस हास्यात झाड मोहरून उठले ,
तांबूस- हिरव्या शहाऱ्यांनी त्याचं अंगांग भरून गेले आणि
कोरड्या ठणठणीत मनात पुन्हा नव्या प्रेमाचा झरा पाझरू लागला .
पानगळीच्या तिरस्काराने वठलेले झाड वसंताच्या प्रेमळ आपुलकीने
पाहता-पाहता हिरवे डेरेदार झाले आणि कोकिळेच्या सुरात सूर मिसळून गाऊ लागले वसंत गाणी .

lalit sahitya - pangal, sahitya bharati, marathi sahityik, sahitya,
पानगळ  - सचिन कुलकर्णी 
तान्ही पानेही आपल्या इवल्या-इवल्या हातांनी व कोवळ्या सळसळीने
त्याच्याबरोबर ताल धरू लागली . झाड पूर्ण बुडून गेले होते
नवसृजनाच्या चैतन्याच्या आनंदात .
झाडाला सोडून जमिनीवर आलेली पाने मात्र
शुष्क डोळ्यांनी हा आनंद सोहळा पहात होती ,आणि
पश्चातापाच्या आगीत होरपळून आक्रंदत होती .
तारुण्याच्या उन्मादात आपल्या-परक्याचा भेद न
ओळखल्याबद्दल खंत करत होती आणि आपल्या स्वताच्याच
जीर्ण जाळीदार शरीरावर अश्रू ढाळीत होती , वेळ निघून गेल्यावर
तारुण्यात नादानपणेच वागली होती झाडाची पानेही ............ माणसांप्रमाणेच
lalit sahitya - pangal, sahitya bharati, marathi sahityik, sahitya,
सचिन कुलकर्णी 


लेखक - सचिन कुलकर्णी , पंढरपूर
संपर्क - ९०९६२५१२११Post a Comment

3 Comments

आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय, आणि सुचनांचे स्वागत आहे .
सोबतच्या 'सदस्य व्हा' या रकान्यात इमेल भरून आपण साहित्य भारती चे विनामुल्य सदस्य होऊ शकता.