पुस्तक परिचय - नाते मनाशी मनाचे - कवी रमेश जाधव

मनाचा मनाशी होणार सहज संवाद - नाते मनाशी मनाचे..

marathi-book-poetry, sahitya-bharati, ramesh-jadhav
नाते मनाशी मनाचे
दर्जेदार प्रकाशनासाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्याच्या चपराक प्रकाशनाने प्रकाशित केलेला कवी रमेश जाधव यांचा ' नाते मनाशी मनाचे ' हा काव्यसंग्रह वाचनात आला. 'कवितेत व्याकरणाइतकंच अंतःकरण महत्वाचं असत ' हे मानणाऱ्या अत्यंत संवेदनाशील कवीचा हा दुसरा काव्यसंग्रह. काव्यसंग्रहाच्या शीर्षकावरूनच कवीच्या काव्यलेखनाची अंत:सूत्रे लक्षात येतात.मानवी मन आणि नातेसंबंध हे कवितेतून व्यक्तिगत स्तरांवर व्यक्त होत असले तरी प्रत्येक वाचकाला कवितेतून येणारा अनुभव हे स्वतःचेच असल्याचे जाणवतात.अगदी सर्वसामान्य माणसालाही कवितेचा अर्थ लक्षात येईल इतक्या साधेपणाने व्यक्त होतात.प्रतिमा, रूपक, अलंकार आदी कोणत्याच साजश्रुंगाराचा मोह नसलेल्या या कविता मात्र प्रत्येक वाचकाशी आपले नाते जोडत असतात.
     आजूबाजूच्या सगळ्या नकारात्मक गोष्टींनी हवालदिल झालेल्या कवीच्या मनामध्ये एक वेगळीच लढाई सुरु असते. कवीच्याच शब्दांत सांगायचे झाले तर,
sahityik-ramesh-jadhav, sahitya- bharati, marathi-book
कवी रमेश जाधव 

'असाच आहे मी
नदीच्या प्रवाहासारखा शांत
आतून मात्र खदखदलेला
पुरता विस्कटलेला '

     हे अंतस्थ  ज्वालामुखी आतल्या आत तसेच दाबून ठेवत शांतपणे जगताना मात्र कवितेच्या माध्यमातून प्रत्येक कवी मन रितं रितं होत जातं.हे पेटतं रितेपण सहन करण्याची ताकद फक्त नि  फक्त कवितेमध्येच असते हे निश्चित.
      सर्वसामान्य माणसाला येणाऱ्या सगळ्याच दैनंदिन अडचणींबद्दल कवी कवितेतून व्यक्त होतो.अडचणीने त्रस्त झालेल्या स्वतःलाच समजावताना कवी म्हणतो..

'आता मनाचे पंख पसरून, स्वप्नांचे क्षितिज पार करायचे... '

स्त्रियांच्या, शेतकऱ्यांच्या, वृद्धांच्या व्यथा वेगवेगळ्या कवितांमधून येतात.विस्कटलेल्या नात्यांचा शोधही कवीने घेतला आहे. 'आभाळ ' या कवितेत काही सुंदर ओळी येतात.
'मला फक्त माझंच आभाळ
नव्हतं पसरावयाचं
मला कळतं दुसऱ्याचंही
आभाळ शिवायचं


एकूण 71 कविता असलेल्या या संग्रहात आयुष्यातील चढ-उताराचा, सुख -दुःखाचा पाठशिवणीचा खेळ साध्या सरळ शब्दांत मुक्तछंदीय शैलीतून आलेला आहे.मृत्यू या विषयाचा मोह प्रत्येक कवीमनाला प्रचंड असतो. प्रत्येक जण आपापल्या परीने हा मोह कवितेतून शब्दबद्ध करत असतो. या संग्रहातील 'मोकळी फ्रेम ' या कवितेतून कवी म्हणतो -
'वर्षश्राद्धाला फ्रेमवरील जळमट काढतील,
जुना काढून नवा हार घालतील '
सुख-दुःखाचा हा खेळ शेवटी मृत्युरूपी निकालाने संपतो. कवी रमेश जाधव या संग्रहातून अत्यंत नितळपणे सहज व्यक्त होत जातात.आपले अनुभवविश्व वाचकांसमोर तेवढ्याच सहजतेने ठेवत जातात. त्यांचा आणि वाचकांचा  होणारा हा सहज संवादच  या कवितांचा मानबिंदू ठरतो. वाचक थेटपणे कवितांशी जोडला जातो. मनाचे माते मनाशी जोडले जाते. कवितांतून काही बोध देण्याचा किंवा शिकवण्याचा कवीचा उद्देशच नसल्याने या सहजपणे वाचकांच्या मनात रेंगाळत राहतात.
   पुस्तकाचे मुखपृष्ठ कवितांना साजेसे झाले असून कविता वाचकांना भावणाऱ्या आहेत.
marathi-sahityik-jyoti-kadam, sahitya-bharati, marathi-kavita
ज्योती कदम

नाते - मनाशी मनाचे
कवी - रमेश जाधव
प्रकाशक - चपराक प्रकाशन
पृष्ठे - 80
मूल्य - 80 /- रुपये

पुस्तक परिचय -ज्योती कदम

Post a Comment

2 Comments

  1. छान अर्थ उलगडून दिला कवितेचा

    ReplyDelete
  2. खूप छान पुस्तक परीक्षण

    ReplyDelete

आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय, आणि सुचनांचे स्वागत आहे .
सोबतच्या 'सदस्य व्हा' या रकान्यात इमेल भरून आपण साहित्य भारती चे विनामुल्य सदस्य होऊ शकता.