गझल - सुधाकर इनामदार |
दारापुढती बाभळ आहे स्वप्नामध्ये मखमल आहे
अंधाराच्या फांदीवरती एकांताची कलकल आहे
कुणा वाटतो उपयोगाचा कुणा वाटतो उपभोगाचा
मला वाटतो देह खरे तर आत्म्यावरचे टरफल आहे
लोभस निर्मळ अपार सुंदर असे दिसाया कमळ तरी ही
सत्य हेच की बुडात त्याच्या नको तेवढी दलदल आहे
तरी परंतू खोल आतुनी स्थितप्रज्ञता चंचल आहे
मेघाच्या फुटक्या डोळ्याचा पाझर भिजवे आकाशाला
युगायुगांनी मात्र धरेचा ठाक कोरडा करतल आहे
नख्या वाढल्या सुळे वाढले कळेन कसले श्वापद झालो
कळेन कसले माझ्याभवती निबिड दाटले जंगल आहे
सापळ्यात कोणत्या अडकलो आहे आता आपण सगळे
कुठल्या भयगंडाने आपण झालो इतके हतबल आहे
भरकटलेले शेर हजारो माझ्या हातुन लिहले गेले
ओठावरती तुझ्या उखाणा दरवेळेला चपखल आहे
---------------------------------
सुधाकर इनामदार
![]() |
![]() |
![]() |
0 Comments
आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय, आणि सुचनांचे स्वागत आहे .
सोबतच्या 'सदस्य व्हा' या रकान्यात इमेल भरून आपण साहित्य भारती चे विनामुल्य सदस्य होऊ शकता.