पुस्तक परिचय - हळवे पाषाण- काव्यसंग्रह- डाॅ.सुनिता चव्हाण


मी डाॅ.सुनिता चव्हाण, बोरिवली (मुंबई) येथे प्रॅक्टिस करते. माझा पन्नासावा वाढदिवस साजरा करताना रिटर्न गिफ्ट द्यायच्या निमित्ताने हा माझा काव्यसंग्रह हळवे पाषाण (21 सप्टेंबर 2018) जन्माला आला.
   
marathi-poetry-book-halave-pashan, dr. sunita-chavan, sahityabharati
हळवे पाषाण कविता संग्रह प्रकाशन

 हळवे पाषाण... प्रत्येक व्यक्तीच्या मनात एक हळवा कोपरा असतो,तो व्यक्ती मृदू स्वभावाचा असेल तर तो प्रत्येक वेळी व्यक्त होत राहतो पण कडक स्वभावाचा असेल किंवा अबोल असेल तर त्याचा हा हळवा कोपरा तसाच अंतर्मनात पहुडलेला असतो...कधीकधी कोणी शब्दांतून व्यक्त होतो तर कधी अव्यक्त..अशा व्यक्त झालेल्या भावनांचा हा ताटवा!   
          मैत्री सागरात जेव्हा सर्वजण यथेच्छ डुंबत असतात तेव्हा शिक्षण पूर्ण झाल्यावर मित्र जे त्या गावी स्थायिक असतात ते तिथे नेहमीच  एकमेकांना भेटत राहतात पण मैत्रिणी...त्या तर  वेगवेगळ्या ठिकाणी लग्न होऊन निघून जातात...तो मैत्रीचा विरह या काव्यसंग्रहात आहे. काही कविता मित्रांसाठी आणि बऱ्याचशा मैत्रिणींसाठी आहेत.काही कविता आजूबाजूच्या मैत्र जीवनाच्या वेगवेगळ्या  संमिश्र भावनांना भारावून लिहिल्या आहेत.ह्या कविता प्रकाशनासाठी कधीच लिहिल्या  नव्हत्या त्यामुळे त्या सहज आणि सोप्या भाषेत आपोआपच साकारल्या गेल्या.

marathi-poetry-book-halave-pashan, dr. sunita-chavan, sahityabharati
डाॅ.सुनिता चव्हाण

दूरवर जाणाऱ्या मैत्रिणीला...
"रित्या नयनात माझ्या तुझा चंद्र सूर्य होता
तू प्रेम केलंस म्हणून हा जीव जगत होता"
असा निरोप असो वा....

शब्दा शब्दांचे वाद सुरू झाले मनी
 काव्यपंक्ती रचून गेल्या खूप काही
अशी भांडणानंतरची व्याकूळता असो..

सखी : व्यथित मन,प्रेम खुलवणारी
          ताटव्यातील एक कळी जशी
          तेव्हाही...आताही...
 लग्नानंतर सखीच्या विरहात लिहिलेली कविता असो...अशा मैत्री संबंधावर लिहिलेल्या या कवितांचा आस्वाद तुम्ही माझ्या *हळवे पाषाण* या काव्यसंग्रहात घेऊ शकता.
        "कुणासाठी" "ग्रीष्माची चाहूल" "निशेचा नजारा" अशा सृष्टीचा आनंद देणाऱ्या काही कविता...प्रेयसी प्रियकराच्या नात्यातील हळवेपणा दाखवणाऱ्या कविताही या संग्रहात आहेत.
     माझ्या या काव्यसंग्रहाला प्रख्यात नाटककार,दिग्दर्शक, लेखक,अभिनेता श्री अशोक समेळ यांची प्रस्तावना लाभली आहे. त्या प्रस्तावनेत ते म्हणतात...या घडीला मी  या डाॅक्टर,कवियत्री  कशा दिसतात,कशा बोलतात हे पाहिलं नाही पण त्यांचा हा कवितासंग्रह मी त्यांच्या मनाच्या आरशातून वाचला आणि तो केवळ अप्रतिम आहे.
     एक काळ असा होता की कविता कानावाटे मनात शिरायची त्यामुळे त्याचे भाव पटकन ह्रदयात भिडायचे, पण आज वाचूनच कविता मनात ठसवावी लागते.जी कविता वाचून मनात ठसते ती खरी कविता..हे माझं मत आहे; यातही या काव्यलेखनात एक विलक्षण सर्जनशीलता आहे, पण तेच जर काव्य एखाद्या डॉक्टर पेशातला माणूस करत असेल तर त्याच्या डॉक्टर ज्ञानाला आणि डोळ्यांना प्रत्येक माणसाचा सापळा(स्केलेटन) दिसतो आणि त्या काव्याची शस्त्रक्रिया तो "शल्यविशारद" ज्या बारकाईने, नजाकतीने कोरून काढतो ते काव्य, ते साहित्य खऱ्या अर्थाने तुमच्या काळजाला भिडतं.
    प्रथम त्यांच्या "गझल" प्रकाराकडे वळू.. थोर साहित्यसम्राट पु.ल.देशपांडे म्हणतात की "गझल हे केवळ वृत्त नसून ती एक वृत्ती आहे आणि तिच्यात एक सूक्ष्म आणि सुंदर निवृत्तीही आहे.स्वार्थाच्या बाजारात धडपडण्याला आपण चुकीनं प्रवृत्ती मानत आलो आहोत पण निवृत्त मनाने जगाकडे पाहता आल्या शिवाय खऱ्या प्रवृत्तीची गोडीच कळत नाही.जीवनात नुसताच उंदीर उड्या मारीत धावत सुटणे म्हणजे प्रवृत्त जीवन जगणे नव्हे.भाई उर्फ थोर पु.ल.देशपांडे यांच्या शब्दांची प्रचिती मात्र डॉक्टर सुनिता चव्हाण यांच्या पहिल्याच गझलामधून आली...
marathi-poetry-book-halave-pashan, dr. sunita-chavan, sahityabharati
हळवे पाषाण- काव्यसंग्रह 

  निश्चित जागेवर जायचं आहे
   पण तो रस्ता माझा नाहीये

पुढे कवीला साथही हवी,प्रोत्साहनही हवं, मिळकतही हवी,जगणंही हवं पण ते काहीच त्यांच नाही मग शेवटी डॉक्टर सुनीता सर्वाचा DNA काढत म्हणतात...

कुठंतरी दफन करायचं आहे
पण हाय रे दैवा..
ती जागाही माझी नाही...

व्वा!डाॅक्टर....क्या बात है !!
क्या बात है...म्हणण्यासारख्याच यातल्या सा-या गझल आहेत.

 आठवणीतल्या किती श्रृंखला मागे पडल्या
तरीही कवडसा प्रेमाचा का येऊन बिलगला किंवा

मृत्यूची बातमी माझी समजली तर
तिलांजली देताना अश्रू तू ढाळू नको

यातील प्रत्येक गझल अगदी सहज मनाला भिडते.अगदी आरपार आणि सहज ओठी येते.अगदी तशाच त्यांच्या कविताही! गोडीही विलक्षण आहे. कविता ही सोपी हवी,तशीच सर्वदूर हवी, ती कवीपुरती मर्यादित नसावी.डाॅ.सुनितांच्या कविताही तशाच आहेत...त्यात एक गेयता आहे.प्रत्येक कवितेचे एक उत्तम गीत होईल एवढ्या सहज,सोप्या,सुंदर आहेत...

कुठतरी जायचं जायचं असत
कुठतरी पोहोचायचं असतं
लपलेल्या आडवाटेतुन
आपला मार्ग शोधायचा असतो

 त्यांच काव्य प्रचंड जिवंत झ-यासारखं आहे,विलक्षण झुळझुळ वाहणाऱ्या झ-यासारखं!त्याला किनारा नाही कारण त्या काव्याला कवीनं फक्त वहायला शिकवलं आहे, थांबायला नाही !आजूबाजूला बघायलाही नाही.डॉक्टर आपल्या या दुहेरी सर्जनशीलतेचा असंच वाहू द्या त्यातच तुमचं सामर्थ्य लपलं आहे मात्र सतत लिहित रहा झ-यासारखं वाहत राहा,आई सरस्वती ते बळ आपल्याला नक्कीच देईल.
        -- अशोक समेळ.
तसेच या काव्यसंग्रहासाठी डॉ. तात्याराव लहाने( सहसंचालक वैद्यकीय शिक्षण व संशोधन) यांनी शुभ संदेश पाठवला होता तो असा.. सर्वसामान्य यांच्या मते डॉक्टर मंडळींना भावना नसतात पण हळवे पाषाण वाचून हा भ्रम दूर झाला, त्यांच्या या संग्रहातील गझल कविता मन हेलावणा-या आहेत.कल्पनेतून जरी साकारल्या गेल्या असल्या तरी वास्तवाच्या अधिक जवळ नेणा-या आहेत.अगदी समर्पक शब्दांत फार गहिरे अर्थ वाचकांपर्यंत पोहोचवण्यास डॉक्टरांचे कसब खरोखर सुरेख आहे. कविता करणं ही त्यांची कला फारच चांगली आणि प्रशंसनीय आहे.
  असे मोठ्या मोठ्या लोकांचे शुभाशीर्वाद घेऊन माझा हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. डिंपल प्रकाशन या नामांकित पब्लिकेशनचे श्री अशोक मुळे सर यांनी अगदी थोड्या वेळात आम्हाला हा काव्यसंग्रह प्रकाशित करून दिला. त्यांच्या व्यक्तिमत्वाने आम्ही खरंच भारावून गेलो.
    सर्जनशीलता घेऊन जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनातील भावना या काव्यसंग्रहात आहेत;त्या तुम्हाला नक्कीच आवडतील.तुम्ही नक्की वाचा.डिंपल पब्लिकेशन मध्ये तुम्हाला हा काव्यसंग्रह हळवे पाषाण नक्की मिळेल.त्यांच्याशी संपर्क करावा.
       रसिक प्रेक्षकांचे वाचन आणि त्यांना मिळणारा आनंद हेच आमच्या लेखणीचे मोठे समाधान  ते अनमोल आहे.हल्ली वाचन संस्कृती मागे पडली आहे.हातात पुस्तक घेऊन वाचताना,पान उलटताना होणारा तो सुक्ष्म आवाज,वाचून मध्ये थांबताना दुमडलेला तो कोपरा आणि पुन्हा नव्याने वाचताना हळूवार स्पर्श करून तो सरळ करताना त्या निर्जीव पुस्तकालाही प्रेमाचा साक्षात्कार होतो.  पुस्तक हातात घेऊन जितकं आत्मीयतेने वाचू तितकेच आपण त्याच्याशी बांधले जातो..त्यातून  कितीतरी प्रतिसादात्मक भावना म्हणा,जीवन जगण्याचा दृष्टीकोन देणारे विचार,तो आपलेपणा.. सारं काही आपल्याला देतात ही पुस्तके. हातात घेऊन वाचताना जो आनंद तुम्हाला मिळेल तो इ मोबाईलवर वाचताना नाही मिळणाऱ.आपली वाचन संस्कृती.. पुस्तके लिहिणाऱ्या लेखणीला पण किती आनंद देईल.. तेव्हा तुम्ही पुस्तकं विकत घ्या आणि तो आनंद काय असतो तो त्याचा अनुभव तुम्ही नक्की घ्या.
marathi-poetry-book-halave-pashan, dr. sunita-chavan, sahityabharati
हळवे पाषाण- काव्यसंग्रह 

हळवे पाषाण- काव्यसंग्रह
डाॅ.सुनिता चव्हाण
प्रकाशक : सौ नम्रता मुळे
डिंपल पब्लिकेशन,
आनंद नगर,नवघर,
वसई रोड (पश्चिम)
दूरध्वनी क्रमांक :
0250 2335203
मुंबई कार्यालय : गिरगाव.
दूरध्वनी क्रमांक: 23803012
मुद्रक : प्रमोद घोसाळकर
अक्षर जुळणी : युनिक सिस्टिम
मुखपृष्ठ : सरदार जाधव
मूल्य : ₹ 100.

Post a Comment

आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय, आणि सुचनांचे स्वागत आहे .
सोबतच्या 'सदस्य व्हा' या रकान्यात इमेल भरून आपण साहित्य भारती चे विनामुल्य सदस्य होऊ शकता.

Previous Post Next Post