पुस्तक परिचय - 'सांगावा - सचिन पाटील

 गाव-खेड्यातील गोतावळा - 'सांगावा'
marathi-story-book, sahitya-bharati, sangava, sachin-patil
'सांगावा' कथासंग्रह

भारतीय मानवी जीवन हे प्रामुख्याने कृषीसंस्कृतीशी निगडित आहे. कृषीसंस्कृती आणि मानवी जीवन यांचा ऐकमेकांशी घनिष्ठ असा संबंध आहे. प्राचीन काळापासून चालत आलेला अतुट असा हा घनिष्ठ ऋणानुबंध, जिवापाड रुजलेला जिव्हाळा पण अलीकडे हे समिकरण बदलताना दिसते. ही नाळ आधुनिक माणूस तोडू पाहात आहे. पण त्याचे दुष्परिणामही आपण आज पाहात आहोत.

सचिन पाटील यांच्या 'सांगावा' या कथासंग्रहात आपणास भेटणारे खेडेगावातील शेतकरी, ग्रामस्थ, स्त्रिया, मुले, लहानमोठे प्राणी, पशुपक्षी, झाडझाडोरा, किडामुंगी आणि माणसे यांचा गोतावळा त्यांच्या गुणवैशिष्ट्यांचा, स्वभाव वैशिष्ट्यांचा, वर्तनांचा यातील कथानकाशी अगदी सहजासहजी संबध आला आहे. या वैशिष्ट्यपूर्ण वर्तनांचा उपमा, प्रतिमा, प्रतिके, दाखले यातून प्रत्ययकारी उल्लेख लेखकाने ग्रामीण शैलीत नादमधुर शब्दांत मोठ्या खुबीने केला आहे. आणि हे मांडताना कथानक सहजपणे प्रवाहित झाले आहे. हे संबंध इतके बेमालूमपणे आले आहेत, व्यक्त झाले आहेत, की ते दाखवण्यासाठी कुठल्याही प्रकारचा आटापिटा, ओढाताण झालेली जाणवत नाही. कथानकातील घटकांच्या प्रत्येक कृती, उक्ती, संवाद, देहबोलीतून प्रत्येक ठिकाणी काही ना काही जगण्यातले मर्म सांगणारा शाश्वत 'सांगावा' भेटतो. हा 'सांगावा' चराचरातील निरंतर नातेसंबंधांवर, वाटचालींवर लिलया प्रकाशझोत टाकत, अधिकच गडद होत अंतर्मनाला अंतर्मुख करायला भाग पाडतो. जिवा-शिवाशी दृढ नाते जोडतो. हे 'सांगावा' या संग्रहाचे मला जाणवलेले विशेष वैशिष्ट्य आहे.
marathi-story-book, sahitya-bharati, sangava, sachin-patil
सचिन पाटील


'भूल' या कथेत हणमाने मळ्यात लावलेला वांग्याचा फड उफाड्याने वाढतो. दृष्ट लागावी अशी जोमदार वाढ म्हणजेच रानाला पडलेली 'भूल' बघून जनमानसांत बऱ्याच अंशी अाढळणारी शंकेची पाल पाहणाऱ्यांच्या मनात चुकचुकायला लागते. आणि एके दिवशी शेतमालक हणमाच्या कानावरही ही शंका वेगवेगळ्या उदाहरणांसह ऐकवली जाते. त्या बोलण्यावरून रानाला पडलेली ही भूल हणमाचं काळीज विविध भाव-भावनांच्या विचारांनी पोखरून काढू लागते. रानाला अशी 'भूल' पडली म्हणजे घरच्या कर्त्या माणसाचा बळी जातो. हे ऐकून खंबीर हणमाचं काळीज 'घरच्यांचं आपल्या पश्चात काय होईल? त्यांची काय अवस्था होईल?' या विचाराने सशाच्या काळजागत मलूल होते. आणि तो हातातोंडाशी आलेला वांग्याचा फड स्वतःच्या हातांनी उद्ध्वस्त करतो. पर्यायाने स्वतःच उद्ध्वस्त होताना त्याची जी त्यावेळी मानसिक घुसमट होते, मनात भावभावनांचा जो कल्लोळ माजतो तो शब्दांत पकडण्यात कथालेखक यशस्वी झाला आहे.

दुसऱ्या कथेतला मातीला सर्वस्व मानणारा, शेती-मातीत लहानाचा मोठा होत उभी हयात शेतीत घालवलेला वृद्धावस्थेतला सच्चा भुमिपूत्र शामुअण्णा आत्ताची परिस्थिती बघून हतबल होतो. मुलगा सदूच्या शेतीकडील दुर्लक्षित वर्तनाने व्यथित होतो. आणि त्यातच 'सेझ' प्रकल्पात आपलं रान जाणार हे ऐकून, आणि त्याला सदूचीही सहमती पाहून मनातून उन्मळून पडतो. जमीन म्हणजे शेतकऱ्याचे काळीज! आणि तेच कुणीतरी चोर हिसकावून घेऊन जातोय. या अवस्थेत तो हतबलतेने वेडापिसा होतो. एका बोधकथेत प्रेयसीच्या हट्टापायी आईचं काळीज घेऊन धावणारा मुलगा ठेचकाळून पडतो; तेव्हा 'बाळा, तुला लागलं काय रे..?' असा त्या मातेच्या जमीनीवर पडलेल्या काळजातून आवाज येतो. असं मायाळू हृदय मातेचं असतं. अशीच साद काळी आई आपल्याला देते आहे, असा शामुअण्णाला वारंवार भास होत असल्याचे ही कथा वाचताना जाणवते. अखेर पोटच्या पोराच्या इच्छेखातर तो आगतिकतेने सेझला सहमती दर्शवतो. मानवी जीवनाचा कणा असलेली वैभवसंपन्न शेती आज निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या अतिरेकी विळख्यात गुरफटून विपन्नावस्थेत घुसमटते आहे याचे प्रभावी प्रत्यंतर 'काळीज' ही कथा वाचताना येते.

'पावना' ही कथा वरून हलकीफुलकी, विनोदी अंगाने जाणारी वाटत असली तरी माणसांच्या स्वभावाबद्दल बरंच काही सूचवून जाणारी आहे. घर, संसार, घरातील वस्तू, पाळीव जनावरे इत्यादींचा लळा आणि त्यांच्या रक्षणाची जबाबदारी याविषयी सुचविताना सावळ्या बैलाला किंवा एखादे शेती औजार अपरात्री वास्तव्यास आलेला पाहुणा चोरून नेइल की काय? या काळजीने घरमालक तातोबा शिंदे चिंताग्रस्त होतो. तो व त्याची पत्नी रात्रभर जागून त्या पाहुण्यावर पाळत ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण सारेच व्यर्थ ठरते; कारण असे काहीच घडत नाही. वास्तव्यास आलेला पाहुणा पहाटेच निघून गेलेला असतो! 'मन चिंती ते वैरी न चिंती' याचा अनुभव अधोरेखित करणारी ही कथा खिळवून ठेवत आत्मपरीक्षण करायला  लावणारी आहे.

'मांडवझळ' मधल्या लाली कुत्रीची हेळसांड बघून मन चुकचुकल्याशिवाय रहात नाही. लाली कुत्री एक मुका जीव! घरच्यांवर अत्यंतिक लळा असलेला. सुखदुःखात सोबत राहिलेली, प्रामाणिकपणे इमानदारीत राखण करणारी. पण माणूस मात्र आनंदाच्या क्षणी या नात्याकडे दुर्लक्ष करीत, हा स्नेह विसरून आपल्याच डौलात मश्गूल रहातो. लालीकडून भुकेलेल्या पोटासाठी आगतिकता घडते तेव्हा त्याच माणसांकडून प्राणघातक हल्लाही होतो. बाहेरही 'बळी तो कान पिळी' हीच अवस्था. इमानेइतबारे जीवन खर्चूनही एखाद्याच्या नशीबातली लाचारी, आशाळभूतपणाचं दैवलिखीत किती विदारक, भयानक असते याची प्रचिती देणारे लालीच्या जगण्यातील प्रसंग, जीवन संघर्षाची जाणीव करून देतात. 'माझं माझं म्हणीत होतो मलाच त्यांनी टाळलं' या गाण्याची प्रकर्षाने आठवण होत जीवनातल्या कंगोऱ्यांची टोचणी मन विषण्ण करून जाते.

माणूसच माणसाची कशी वाटमारी करतो. जाणूनबुजून खिंडीत गाठून कशी अडवणूक करतो. या शोकांतिकेत गुरफटून आगतिक झालेला 'वाट' कथेतला पांडबा डोळ्यासमोर सारखा तरळतो. मानवी वर्तनाचा यक्षप्रश्न उभा करतो. स्वतःला मातीत मिसळून घेत जीवापाड जपलेला ऊस हातातोंडाशी आल्यावर तो कारखान्याला घालवण्यासाठी पांडबाची जी ससेहोलपट होते, लुबाडणूक होते ती पाहून मन खिन्न होते. निराशेचे मळभ मनात जमा होतात. पोटच्या मुलागत वाढवलेला ऊस स्वतःच्या हातांनी पेटवण्यास भाग पडणे, पेटलेल्या उसातून 'काड् काड्' असा येणारा आर्त स्वर, ऊस कारखान्याला घालवण्यासाठी शेळी, तिची करडं एकेक करत खाटकाच्या दावणीला बांधावी लागणे इत्यादी प्रसंगातून कथानकाने वेगळीच उंची गाठली आहे.

इस्त्रीच्या दुकानात काम करणारा संभा गडी एक मजूर. जगण्याचं तत्वज्ञान जाणून वेगवेगळ्या पिळवणूकीत पिळून निघाला तरी ते ढोरकष्ट, अपमान तसेच सहन करत संसाराचा गाडा ओढण्याचा आटापिटा करणारा एक सामान्य माणूस. त्याच्या चांगुलपणाचा, नडलेपणाचा, सौजन्याचा गैरफायदा घेणारे समाजातील काही मग्रूर घटक, त्यांची हृदयशून्य आरेरावी ही समाजस्थिती 'धग' कथेतून व्यक्त होते. मे महिन्यातील उन्हाची धग, इस्त्रीची धग आणि या दोन्हींचा मिलाफ घेऊन तो जिथे काम करतो. त्या पत्र्याच्या दुकानात पत्र्यांनी आणखीनच वाढवलेली धग या रखरखत्या वातावरणाने परिस्थितीची नेमकी जाणीव करून देत, संसाराच्या होरपळीत तावूनसुलाखून निघणारा सामान्य माणूस, अर्थात लेखकाने आपल्या भेटीस आणलेला, इमानेइतबारे राबणारा संभा मनात घर करून रहातो.

"आरं अंधार किती पडलाय बाळा.. शाना नव्हंका तू?... मग खुळ्यागत असं का करतुयास बरं..." हा संवाद आहे 'सय' कथेतल्या रावबा आणि त्याचा छोटा मुलगा सतु या बापलेकामधला. शेतकरी कुटुंबातील निर्व्याज लहान मूल आणि वडील यांच्यामधला लळा, जिव्हाळा अतिशय उत्कटतेने साकारणारी ही कथा लघुकथेचा एक उत्कृष्ट नमुना ठरावी अशी आहे. रात्री शेतात जाणाऱ्या रावबाच्या मागे हट्टाने येणारा सतु वाटेत चुकतो, तेव्हा त्याला शोधतानाची दिड्मुढ करायला लावणारी वातावरण निर्मिती वाचकांचा जीव टांगणीला लावते. पण शेवटी कथा अशी काही कलाटणी घेते, की मनावरचा ताण एकदम उतरतो आणि चेहऱ्यावर स्मित लहर उमटल्याशिवाय रहात नाही. सारे थ्रील अनुभवण्यासाठी ही कथा प्रत्यक्ष वाचायलाच पाहिजे.

'मरणकळा' कथेतला संसारी जीवनात मोठ्या घरची लेक असलेल्या असमंजस पत्नीच्या वर्तनाने वैफल्यग्रस्त झालेला पितृभक्त शिक्षक इंद्रजीत वाघमारे. लहानपणीच मातृसुख हरवले. बाबांनी हाताचा पाळणा करून वाढविले. शिकवून रेघेरुपाला लावले. वृद्धापकाळी वडिलांची सेवा करण्याची इच्छा असूनही नोकरी, संसाराची ओढाताण, असमंजस पत्नी इत्यादींच्या भोवऱ्यात वेढल्याने वडिलांसाठी पुरेसा वेळ देऊ न शकल्याच्या वेदना पर्यायाने स्वतःच 'मरणकळा' सोसणारा हा मास्तर वाचकांच्या मनाला चटका लावतो.

'चकवा' कथेतल्या बज्याच्या तारुण्यसुलभ भावना आणि माधुरीरुपातला चकवा हा आपलाच वाटत मनातल्या मनात गुदगुल्या करतो. तर 'ओझं' कथेतून चाळीसहून अधिक वर्षांपूर्वीचा गावगाडा, लोकजीवन, बारा बलुतेदार, गावचे कर्ते पाटील, कुलकर्णी, पंच, त्यांचा दरारा, गोरगरिबांचा पापभिरू स्वभाव, केलेल्या चुकांची कबुली देण्याची निरागसता, नेहमीची चाकोरी सोडून घडलेल्या एखाद्या घटनेने या सामान्य माणसांची उडालेली तारांबळ तेव्हाच्या वातावरणात खिळवून ठेवते. या जिव्हाळ्यात वाढलेला निराधार रंजीत काकडे शिकून सवरुन मोठा साहेब होतो. पण तो खाल्लेल्या मिठाला विसरून न जाता, कृतज्ञता जपतो हे वाचताना मन समाधानाने भरून येते. याउलट 'बळी' कथा वाचली की माणुसकीचाच बळी देणाऱ्या माणसातल्या वासनांध नराधमांच्या संतापजनक कृत्त्याने अंतःकरण उद्विग्न होते.

मातृहृदय हे सर्वात मोठे जिव्हाळ्याचे प्रतिक ! 'सांगावा' कथेतल्या वृद्ध आईच्या आपल्या उसतोडीसाठी गेलेल्या मुलाच्या काळजीने जी तडफड होते, मनाची विविध विचारांनी जी घालमेल होते ती पाहून आपल्याही काळजात कालवाकालव होते. विचार करायला भाग पाडते. ही कथा वाचताना 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी' या उक्तीची वारंवार प्रचिती येते.

विवेचक अशी प्रा. डॉ. शहाजी पाटील यांची मुद्देसूद प्रस्तावना आणि अर्थपूर्ण मुखपृष्ठ असलेला सचिन पाटील यांचा गावपांढरीचे ऋणानुबंध, तेथील लोकांचं जीवन, त्यांचं जगणं, त्यांचे स्वभाव, त्यांच्या अडचणी, तेथील परिसर, प्राणीजीवन, लळा, जिव्हाळा, शेती, माती, शिवार या साऱ्यांच्या गोतावळ्याचा सुंदर मिलाफ असलेला हा कथासंग्रह खेड्यातल्या रम्य आठवणींची अनुभुती देणारा असून तो आपणासही वाचायला नक्कीच आवडेल हे प्रांजळपणे नमूद करावेसे वाटते.

कथासंग्रह : सांगावा (चौथी आवृत्ती)
लेखक : सचिन वसंत पाटील
प्रकाशन : तेजश्री प्रकाशन, इचलकरंजी
पृष्ठे : १४४ मूल्य : ₹ २००/-
marathi-story-book, sahitya-bharati, sangava, sachin-patil, mahadev-burute
महादेव बी. बुरुटे


पुस्तक परिचय लेखन
महादेव बी. बुरुटे
 शेगाव ता. जत
 मो. 9765374805Post a Comment

आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय, आणि सुचनांचे स्वागत आहे .
सोबतच्या 'सदस्य व्हा' या रकान्यात इमेल भरून आपण साहित्य भारती चे विनामुल्य सदस्य होऊ शकता.

Previous Post Next Post