पुस्तक परिचय - तुझ्या विरहात जळताना - कवी - अनिल राऊत

प्रेम आणि विरह भावनांचा संतुलित अविष्कार - तुझ्या विरहात जळताना 

tuzya virhat jaltana poetry book, anil raut, sahitya bharati
 तुझ्या विरहात जळताना - कवी - अनिल राऊत

कवि मनाच्या कल्पनेचा व वास्तवतेचा आर्त  हुंकार म्हणजे कविता होय, सृजनशीलतेचा अंतविष्कार म्हणजे कविता होय, जी कविता मनात फुलते, अंतःकरणात बहरते, काळजात रुतते, हृदयात पाझरते, वेदनेत झिरपते, अशी कविता वाचणाऱ्याच्या  मनात कवीच्या कवित्वाचा आदरभाव निर्माण करते.  या आशयाची नवनिर्माणाची क्षमता घेऊन, "तुझ्या विरहात जळताना" हा, अनिल राऊत यांचा काव्यसंग्रह वाचकांसमोर आला आहे.  आयुष्याच्या एका वळणावर जीवन जगत असताना, म्हणजेच तारुण्याच्या उंबरठ्यावर, कुणीतरी आपली भावना समजून घेणारं  असावं  व आपल्या विचारांना दुजोरा देणारा असावा, स्वच्छ, निखळ, निरपेक्ष, मैत्रीतून प्रेम फुलवणार असावं असं कवीला वाटतं.  कारण प्रेम जीवनाची प्रेरणा असते, प्रेम जीवनाचे बळ असते, प्रेम पराक्रमाची ही प्रेरणा असते, प्रेम सर्व काही सहन करण्याचे सामर्थ्य सुद्धा असते.  म्हणूनच तारुण्यातल्या प्रेमामुळे जीवनाला एक उभारी येते, व प्रेमाविना जीवन अधुरे वाटते.  हेच या कविता संग्रहातून व्यक्त होत आहे . प्रेमकवितातील दुःख, विरह, नैराश्य, वाचकांच्या मनाला चटका लावून जाणारे आहे.  या कवितासंग्रहातील सर्व कविता वाचत असताना आकांत, आक्रोश, आणि भावनांचा कल्लोळ व्यक्त होतो.  त्याचबरोबर असह्य अशी वाटणारी
tuzya virhat jaltana poetry book, anil raut, sahitya bharati
 तुझ्या विरहात जळताना

वेदनाही व्यक्त होते.
कधी फुलातून चाललो
कधी काट्यातून
पण ....
फुले पायाखाली चिरडून गेली
स्वतः रक्तबंबाळ होत
मात्र......
काट्यांनीच साथ दिली
अखेरपर्यंत
चिघळणार या जखमांच्या रूपाने.

प्रत्येकाच्या जीवनात प्रेम सफल होईलच, असे सांगता येत नाही व प्रेमविफलते मुळे प्रेमिक आपले आयुष्य आणि मिळालेले दुःख, व्यथा यावरच जगतो.
जेव्हा मला
तुझी आठवण येते
मी प्रत्येक पक्षाला
अंगणात बोलून घेतो
एखादा तरी 'जटायु'
त्यात मला भेटेलच
अन्
तुझा ठाव ठिकाणा सांगेल
या आशेने......
आपली प्रेयसी दूर असल्याने मनाची होणारी तगमग, होरपळ या कवितेतून जाणवते.  तरीसुद्धा कवीचा आशावाद संपत नाही.  आज ना उद्या ती येईल या आशेने कवी म्हणतो,
tuzya virhat jaltana poetry book, anil raut, sahitya bharati
 कवी - अनिल राऊत

"त्या फुलांना मी अजूनही
जिवंत ठेवलंय
माझ्या समाधीवर
त्या फुलांच्या आशेने तरी
तू पुन्हा पुन्हा माझ्याजवळ
यावीस म्हणून"
व्यक्ती प्रेम वेड्या संकल्पनेत जीवन जगत असताना, बळ खचू देत नाही.  शेवटच्या क्षणापर्यंत तो आपल्या प्रियाची वाट पाहतो.
एकंदरीत या संग्रहातील सर्वच कविता मनाला स्पर्शून जाणारी आहेत.  यामध्ये एक मात्र नक्की, की प्रेयसीने कितीही छळले, जाळले, तरी कवी विद्रोही होऊन तिच्यावर कोणतेही संकट उभा करीत नाही, कारण प्रेम समर्पण करायला शिकवते, ॲसिड फेकायला नव्हे, याची पुरेशी जाणीव कवीला आहे.  भुंगा लाकूड पोखरतो, पण पाकळी कापण्याचे धाडस कधीच करत नाही.  कारण पाकळीवर भुंग्याचे प्रेम असते , म्हणून स्वतःच्या वाट्याला कितीही दुःख, विरह आला तरी, आपल्या प्रियेला त्रास न देता, आपण आपलं आयुष्य जगायचं, हा अनमोल संदेश कवी घालून देत असल्याचे जाणवते.
माणसाच्या आयुष्यामध्ये अपुर्‍या राहिलेल्या घटनांना, कल्पनेच्या पातळीवर का होईना कुठे तरी पूर्णत्व देणं, हेच कवितेच काम आहे.  कारण माणसे बोलू लागली, की विचार वाढू लागतो, विचार वाढला की हिणकस टाकून सकस सांभाळले जाते, आणि हेच आत्मभान वाचकांसमोर, "तुझ्या विरहात जळताना" या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून वाचकांसमोर येत राहते.
" तुझ्या विरहात जळताना " या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून कवी अनिल राऊत  यांचं एक पाऊल या साहित्य विश्वात पडत असताना, आदर्श नीतिमूल्यांची जपणूक, दीर्घ विचारांची खोली, हळवा स्वभाव, एक नैतिक आत्मभान, अभ्यासू वृत्ती, तीक्ष्ण निरीक्षण शक्ती, आणि यातून निर्माण झालेल्या लेखन शैली चे सामर्थ्य दिसून येते
कवी अनिल राऊत यांच्याकडून भविष्यात असेच छान साहित्य निर्माण व्हावे यासाठी शुभेच्छा
tuzya virhat jaltana poetry book, anil raut, sahitya bharati
दत्तात्रय सुभाष चव्हाण

पुस्तकाचे नाव -
तुझ्या विरहात जळताना
कवी -
अनिल राऊत
पुस्तक परिचय लेखन -
दत्तात्रय सुभाष चव्हाण

-- माध्यमांवर भेटूया --

Post a Comment

2 Comments

  1. क्या बात है चव्हाण सर..जोर का झटका धीरे से...असेच झाले आज.काहीही ध्यानीमनी नसताना 'तुझ्या विरहात जळताना..' वर आपण केलेले भाष्य मधूर मधासम भासते आहे.खूप सुंदर परिक्षण केले आहे आपण...त्याबद्दल आपले हृदयपुर्वक आभार!!!!

    ReplyDelete
  2. खूप छान सर खूप छान वाटलं वाचून

    ReplyDelete

आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय, आणि सुचनांचे स्वागत आहे .
सोबतच्या 'सदस्य व्हा' या रकान्यात इमेल भरून आपण साहित्य भारती चे विनामुल्य सदस्य होऊ शकता.