मराठी साहित्यातील सोनेरी पान - बहिणाबाई चौधरी
मराठी साहित्यातील एक सोनेरी पान म्हणजे बहिणाबाई चौधरी . बहिणाबाई चौधरी यांची कविता शेतीमातीची कविता आहे, आणि माणसाच्या दैनंदिन जीवनाचे चित्रण त्या कवितेत आपल्याला पाहायला मिळते. आसपास घडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींच्या सूक्ष्म आणि संवेदनशील निरीक्षणातून त्यांची कविता जन्म घेत असल्याने सामान्य मासोळ्या ती कविता आपली वाटते .
sahitya bharati - bahinabai choudhari |
बहिणाबाई चौधरी - कौटुंबिक पार्श्वभूमी
बहिणाबाई चौधरी यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील असोदे गावी , ११ ऑगस्ट १८८० रोजी महाजनांच्या घरी झाला. त्यांच्या आईचे नाव भिमाई व वडिलांचे नाव उखाजी महाजन होते. हे गाव खानदेशातील जळगावापासून अंदाजे ६ कि.मी. अंतरावर आहे. त्यांना तीन भाऊ - घमा, गना आणि घना, तीन बहिणी - अहिल्या, सीता आणि तुळसा. बहिणाबाईंचा विवाह तत्कालीन रिवाजानुसार लहानपणीच म्हणजे वयाच्या तेराव्या वर्षीच जळगावचे नथुजी चौधरी यांच्याशी झाला झाला . नथुजी आणि बहिणाबाईंना तीन अपत्ये - ओंकार, सोपान आणि काशी झाली. वयाच्या तिसाव्या वर्षी बहिणाबाईंना वैधव्य आले. परंतु त्यांनी अतिशय खडतर आणि प्रतिकूल परिस्थितीतही वाट्याला आलेल्या दुःखाचा सामना खंबीरपणे केला . आणि उमेदीने संसाराचा गाडा ओढत राहिल्या . त्यात त्यांची कविता कायम त्यांच्या सोबत होतीच
बहिणाबाई चौधरी - प्रतिभा
![]() |
bahinabai choudhari - sahitya bharati |
बहिणाबाई चौधरी यांची निरीक्षण शक्ती आणि प्रतिभा दोन्ही अलौकिक होती . कोणत्याही बाबीचा त्या सारासार विचार करू शकत आणि त्याच्या स्वतःचे एक मत बनवत आणि मग त्यावर कविता त्यांना सुचत जाई . कविता लिहिण्याच्या या प्रतिभेला त्या देवाचे देणे मनात असत .
माझी माय सरसोती मले शिकविते बोली
या कवितेत त्यांनी असे मत व्यक्त केले आहे
त्याकाळी मुलीना सहसा शिक्षण घेता येत नसे त्यामुळे बहिणाबाईंना लिहिता वाचता येत नव्हते, परिणामी त्यांनी केलेल्या अनेक कविता कुणी लिहून न ठेवल्यामुळे काळाच्या ओघात नष्ट झाल्या. काही रचना पुत्र सोपानदेव चौधरी यांनी आणि काही त्यांच्या मावसभावाने टिपून ठेवल्या. त्यांच्या जितक्या रचना उपलब्ध आहेत त्यापेक्षा खूप जास्त कविता त्यांनी लिहिल्या असणार . उपलब्ध असलेल्या कवितांची संख्या कमी असली तरी त्या कविता मात्र माणसाच्या जगण्याचे वेद ठरावेत अश्या आहेत . मानवी जीवनातील सुख-दुःखाला कवितेचे रूप देताना त्या म्हणतात
अरे संसार संसार , जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके , तेव्हा मिळते भाकर
कष्ट सोसल्याशिवाय सुख प्राप्त होणार नाही हे केवढे मोठे तत्वज्ञान बहिणाबाईंनी दोनच ओळीत , सोप्या शब्दात आणि सध्या उदाहरणातून सांगितले.
माणसाने निसर्गाकडून खूप काही शिकण्यासारखे आहे . निसर्गातील झाडे शेती पाने फुले प्राणी पक्षी या साऱ्याकडूनच सतत काही तरी आपल्याला शिकता येते . सुगरण पक्षी जेव्हा पिलांसाठी खूप विणतो तो तर आपण सर्वानीच पहिला असेल . त्याविषयी लिहिताना बहिणाबाई त्या खोप्याला झुल्याची उपमा देतात
अरे खोप्यामधी खूप सुगरणीचा चांगला
देखा पिलांसाठी तिनं झोका झाडाला टांगला
![]() |
bahinabai choudhari |
सहाज सुंदर कवितेचे उदाहरण असलेल्या याच कवितेत त्या माणसाला पाखराची कलाकारी पाहण्यास तर सांगतातच पण प्रतिकूलतेतून सकारात्मकता शोधत त्या म्हणतात ,
तिची उलूशीच चोच तेच दात तेच ओठ
तुला देले रे देवान दोन हात दहा बोटं
बहिणाबाई चौधरी यांच्याकडे जिवंत काव्यरचनेची निसर्गदत्त प्रतिभा होती. शेतकाम आणि घरकाम करता करता उत्स्फूर्तपणे ओव्या व कविता रचून गात असत. त्यांच्या अशा अनेक कविता आहेत ज्या वाचताना आपल्याला जगण्याचा एक नवीन अर्थ सापडत जातो.
बहिणाबाई चौधरी - कवितांचे विषय
बहिणाबाईंच्य कवितांचे विषय माहेर, संसार; शेतीची साधने, कापणी, मळणी इ. कृषिजीवनातील विविध प्रसंग; अक्षय्य तृतीया, पोळा, पाडवा इत्यादी सणसोहळे; काही परिचित व्यक्ती, असे आहेत.
बहिणाबाई चौधरी - काव्य रचनेची खासियत
लेवा गणबोली (खानदेशी) भाषेतून; अतिशय सोप्या शब्दांत जीवनाचे तत्त्वज्ञान व्यक्त करणारे हे काव्य आहे. खानदेशातील परिसर, तिथे बोलली जाणारी खानदेशी बोलीभाषा त्यांच्या काव्यातून जिवंत होते. त्या स्वतः शेतकरी जीवन जगत असल्याने शेती, जमीन, शेतकऱ्यांची सुख-दु:खे, त्यातले चढउतार, झाडे, प्राणी, निसर्ग - या साऱ्यांबद्दल त्यांच्या मनात विलक्षण आत्मीयता होती असे त्यांच्या काव्यातून दिसून येते.तल्लख स्मरणशक्ती, सूक्ष्म निरीक्षण, उपजत विनोदबुद्धी, जीवनातील सुखदुःखांकडे समभावाने पाहू शकणारे शहाणपण आणि जगण्यातून कळलेले तत्त्वज्ञान ही त्यांच्या कवित्वाची वैशिष्ट्ये होत.
‘आला सास, गेला सास, जीवा तुझं रे तंतर,
अरे जगनं-मरनं एका सासाचं अंतर!’
किंवा
‘लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते’
अशा किमान शब्दात अर्थाची कमाल गाठणारे शब्द,
‘देव कुठे देव कुठे - आभायाच्या आरपार
देव कुठे देव कुठे - तुझ्या बुबुयामझार’.
एखाद्या मोठ्या ग्रंथाचा विषय असणारे जीवनाचे तत्त्वज्ञान त्या साध्या, सोप्या, (आणि कमी) शब्दांत सहजपणे सांगून गेल्या आहेत. वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी ३ डिसेंबर १९५१ रोजी बहिणाबाईंचा मृत्यू झाला.
बहिणाबाई चौधरी - महाराष्ट्राची सुंदर प्रतिमा
बहिणाबाईंनी ज्या वस्तूंवर काम करता करता ह्या कविता लिहिल्या आहेत. त्यातल्या काही वस्तू तसेच त्यांचे घर बहिणाबाईचा मुलगा ( ओंकार चौधरी) यांच्या सुनबाई श्रीमती पद्माबाई पांडुरंग चौधरी (बहिणाबाईंच्या नातसून ) यांनी जिवापाड जतन करून ठेवलेल्या आहेत. जळगावच्या चौधरी वाड्यातील बहिणाबाईंच्या घराचं रूपांतर संग्रहालयात झालेल आहे. त्याला बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट असे नाव देण्यात आले आहे. आज बहिणाबाईंच्या रोजच्या वापरातली शेतीची अवजारं, स्वंयपाकाच्या वस्तू, भांडी, पुजेचं साहित्य ह्यांची जपवणूक होत आहे. हा अलौकिक ठेवा पुढील पिढीला पाहता येणार आहे. अरे संसार संसार म्हणत संसारातील सुख दुःखांच्या साक्षीदार असलेल्या अनेक गोष्टी या संग्रहालयात बघायला मिळतात. हे संग्रहालय फक्त बहिणाबाईंच्या वस्तूंचं, आठवणींचंच संग्रहालय नाही तर या भागातील कृषीजन संस्कृतीत राबणाऱ्या, कष्टकरी महिलांच्या आठवणींचा, श्रमाचा हा ठेवा आहे. जळगावात जेव्हा लेखक कवी येतात तेव्हा ते आवर्जून ह्या वाड्याचं दर्शन घेतात. बहिणाबाईंच्या घराच्या उंबरठ्यावर डोकं टेकवतात, धन्य होतात आणि मनोमन बहिणाईशी नातं जोडतात. त्यांच्या याच आठवणी चिरकाल टिकतील हेच महत्त्वाचं आहे. प्रत्येकाने पहावं असं हे बहिणाबाईंचं संग्रहालय आहे. तसेच जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे नावही बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ असे ठेवण्यात आले आहे. बहिणाबाई चौधरी यांचे पुत्र कवी सोपानदेव चौधरी यांनी बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर बहिणाबाईंची गाणी जी हस्तलिखित स्वरूपात होती. ह्या कविता सोपानदेवांनी आचार्य अत्रे ह्यांना दाखविल्या. अत्रे उद्गारले, "अहो हे तर बावनकशी सोनं आहे. हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणं हा गुन्हा आहे",आणि अत्र्यांनी त्या कविता प्रकाशित करण्यात पुढाकार घेतला. अत्रे ह्यांच्या विस्तृत प्रस्तावनेसह बहिणाबाईंची गाणी १९५२ मध्ये प्रकाशित झाली. आणि ‘धरत्रीच्या आरशामधी सरग’ (स्वर्ग) पाहणाऱ्या ह्या कवयित्रीचा महाराष्ट्रास परिचय झाला. ह्या काव्यसंग्रहात बहिणाबाईंच्या फक्त ३५ कविता आहेत; परंतु कवित्वाची कोणतीच जाणीव मनात न ठेवता, केवळ सहजधर्म म्हणून रचिलेली त्यांची बरीचशी कविता वेळीच कुणी लिहून न ठेवल्याने त्यांच्याबरोबरच नाहीशी झालेली आहे. बहिणाबाईंची गाणी हे त्यांच्या कवितेचे पुस्तक प्रकाशित झालेले आहे . बहिणाबाई चौधरी यांच्याविषयी अनेक नामवंतांनी लिहिले आहे. त्यांच्या कवितांची गाणी करून महाराष्ट्राच्या घरा घरात पोचली आहेत. परंतु काही लोकांनी त्यांचा अडाणी असा केलेला उल्लेख मात्र जरा खटकतो . कारण अडाणी हा अज्ञानी शब्दाचा अपभ्रंश किंवा बोली भाषेतील शब्द आहे . बहिणाबाई अशिक्षित होत्या पण अडाणी नक्कीच नव्हत्या असे वाटते .
सदर लेखातील माहिती बहिणाबाई चौधरी यांच्याविषयी पुस्तके विविध लेख तसेच इंटरनेटवर उपलब्ध माहितीच्या आधारे लिहिला असून . काही उणीव किंवा त्रुटी जाणवल्यास संपादक साहित्य भारती यांच्याशी संपर्क करावा .
-- माध्यमांवर भेटूया --
![]() |
|||
![]() |
![]() |
![]() |
![]() |
Tags:
मराठी साहित्यिक