पुस्तक परिचय - आदर्श विचारांच्या कथा ‘सोबती’ - कथा संग्रह - प्रतीक दुधाळ

 प्रतीक चंद्रकांत दुधाळ यांचा ‘सोबती’ हा कथासंग्रह

sobati, marathi storybook, pratik dudhal, sahityabharati, pustak parichay
storybook- sobatee


 प्रतीक चंद्रकांत दुधाळ यांचा ‘सोबती’ हा कथासंग्रह  नुकताच प्रकाशित झालेला आहे. कथा हा वाचकप्रिय साहित्यप्रकार आहे. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना गोष्टी ऐकणे व सांगणे आवडत असते. कथा ही केवळ मनोरंजनच करत नाही तर ती प्रबोधनही करत असते.  पुरातन काळापासून कथा हा वाङ्मयप्रकार विकसीत व लोकप्रिय होताना दिसून येतो. प्रतीक दुधाळ हे  नवोदित लेखक. परंतु त्यांचे वाचन,  मनन, चिंतन असल्याने व निरीक्षण शक्ती असल्याने त्यांनी आपल्या जीवनानुभवातून अनेक कथांची निर्मिती केली आहे. ‘सोबती’ च्या  माध्यमातून त्यांच्या कथा वाचकांसाठी उपलब्ध झाल्या आहेत.
                ‘सोबती’ मध्ये २१ लघुकथा आहेत. ‘मोठेपणा’ या कथेत नोकरीत बढती मिळाल्यामुळे दीपकराव एका मोठ्या हॉटेलमध्ये आपल्या कुटुंबीयांना जेवण देण्यासाठी आणतात. त्या उच्चभ्रू व पॉश हॉटेलमध्ये  मळकट कपडे घातलेली आठ-दहा गरीब मुलेही येतात. अशा मोठ्या हॉटेलमध्ये ही गरिब मुले पाहून दीपकरावांना आश्चर्य वाटते. चौकशीअंती कळते की-  केशव नावाचा एक मुलगा नुकताच इंजिनिअर झालेला असतो. आपला पहिला पगार तो समाजातील दीन-दुबळ्यांवर खर्च करणार असतो. कारण समाजात काही लोक एक वेळच्या जेवणालाही महाग असतात, याची जाण त्याला असते. चौकशीअंती दीपकरांवाना जेव्हा हे कळते तेव्हा ते केशवला जवळ बोलावून त्याचे कौतुक करतात. वयाने मोठे असूनही त्याच्या या दातृत्वाने प्रभावित होऊन केशवला वंदन करतात. समाजात अशी देवमाणसं अपवादाने असतात. जी दुसर्‍यांची दु:खं  जाणून त्याग करत असतात. दीपकराव व त्यांच्या कुटुंबीयांना या प्रसंगामुळे नवीन धडा मिळतो.

                ‘अर्धांगिनी’ ही कथा पत्नीची महती सांगणारी आहे. अविनाशला एके दिवशी ऑफिसला जाण्याची घाई असते. तो आपल्या वस्तूंसाठी आपली पत्नी साक्षीवर सारखा चिडत असतो.  जाता-जाता तिने दिलेले पोहेही तो खात नाही. ते खारट झाल्यामुळे तो तिच्यावर  रागावतो व रागारागानेच उपाशी ऑफिसला जातो. त्यानंतर ऑफिसमधून आल्यावर साक्षीने केलेला केकदेखील त्याला आवडत नाही. रागाच्या भरात तो साक्षीला घराबाहेर काढतो. थोड्याच वेळात साक्षीच्या आईचा अविनाशला फोन येतो. साक्षीने आईला अविनाशने रागावलेले  सांगितलेले नसते; तर त्यांना आपण केलेले पोहे फार आवडल्याचे सांगितलेले असते. आपल्या मुलीला चांगले सांभाळत असल्याने ती अविनाशचे कौतुक करते. हे ऐकून अविनाशला आपल्या कृत्याचा पश्‍चात्ताप होतो. बाहेर येऊन तो साक्षीला शोधतो. साक्षी बाहेरील एका

बाकावर नाराज होऊन बसलेली असते. आविनाश तिला मिठीत घेतो. जगातील सर्वोत्कृष्ट अर्धांगिनी मिळाल्याचा आनंद त्याला होतो. स्त्री ही  सोशिक असते. ती आलेली दु:खे सोसून कुटुंबाला सुख वाटत असते. आपल्या आईजवळ पतीची तक्रार न करता ती त्याच्याबद्दल चांगलेच  सांगते, हा साक्षीचा स्वभाव अविनाशला खूप आवडतो व तिला पुन्हा स्वीकारतो. संसारात किरकोळ गोष्टी सुद्धा माणसा-माणसांत दरी निर्माण  करतात. घटस्फोटास कारणीभूत ठरतात. परंतु समजूतदारपणा दोघांतील एकाने जरी दाखवला तरी संसाराची घडी कधीच विस्कटत  नाही.

एक मोठे तत्त्वज्ञान सांगणारी कथा अविवाहित प्रतिकला कशी सुचली हेच आश्चर्य आहे!


               ‘समाधान’ या कथेतील शिवाजी नावाचा युवक अपूर्वाला आपल्या दुचाकीवर शहरातील एकट्या- दुकट्या महिलांना त्यांच्या घरापर्यंत सुरक्षित पोहोचवण्याचे काम नि:स्वार्थपणे करत असतो. आज आपण शहरगावात पाहतो- रात्रीच्या वेळी एकट्या-दुकट्या महिलांना  रिक्षा, टॅक्सी, बस अशी सार्वजनिक वाहने मिळत नाहीत. मिळाली तरी त्यात बसणे रात्रीच्या वेळी धोक्याचे असते. त्यामुळे त्यांना अशा रात्री  चालत घरी येणे क्रमप्राप्त होते. अशा संकटात सापडलेल्या महिलांना शिवाजी आपल्या बाईकवर बसवून त्यांना त्यांच्या घरी सुरक्षितपणे  सोडण्याचे काम विनामोबदला करत असतो. सुरुवातीला अपूर्वाला त्याच्या गाडीवर बसायला भिती वाटते. पण नंतर त्याच्याशी बोलताना हा युवक सर्व महिलांना आपली बहीण मानून त्यांना त्यांच्या घरी सोडण्याचे काम रोजच रात्रीच्या वेळी चोखपणे करत असतो, हे तिला समजते त्यावेळी त्याच्याविषयी तिच्या मनात आदर वाढतो. घरी सोडल्यानंतर अपूर्वा त्याला चहासाठी आग्रहाने थांबण्यास सांगते, पण तो थांबत नाही. त्याला आणखी बहिणींना अशीच मदत करायची असते म्हणून तो निघून जातो.  अशी नि:स्वार्थपणे कार्य करणारी माणसे या समाजात खूपच कमी आहेत. अशी या तरुणासारखी प्रवृत्ती प्रत्येक तरुणाने ठेवली तर आपल्या देशातील माय-बहिणी रात्री-अपरात्रीसुद्धा रस्त्याने बिनधास्तपणे वावरतील, यात शंका नाही.

sahitya bharati, book review, sobati, marathi, storybook, pratik dudhal, rajendra bhosale,
प्रतीक दुधाळ

                ‘सल्ला’ या कथेत लेखकाने जबाबदारीचे महत्त्व सांगितले आहे. माणसाला जगायचे म्हटल्यावर त्याला जबाबदारीचे ओझे वाहाने आवश्यक असते.  ‘धडा’ या कथेत विशालला एका स्पर्धेत बक्षीस मिळते. अयोग्य मार्गाने मिळालेले बक्षीस विशाल मात्र नाकारतो. आजच्या  बक्षिसासाठी धडपडणार्‍या युवकांसाठी आदर्श असणारी ही कथा आहे.

‘वंशाच्या पणत्या’ या कथेत सदाशिवरावांना मुलगा असूनही शेवटच्या क्षणी तो त्यांच्याजवळ येत नाही. आयुष्यभर मुलीचा द्वेष करणारे सदाशिवराव मुलीचे हातचे पाणी  पिऊन आपली इहलोकीची यात्रा संपवतात. ‘वेगळेपणा’ ही कथा ज्याच्या काम त्यानेच करावे, ही शिकवण देते. ‘एकनिष्ठ मित्र’ या कथेत वाचनाचे महत्त्व सांगितले आहे.

‘प्रयत्न’ या कथेत अलीकडील तरुणाईचे सेल्फीचे वेड चित्रित केले आहे. याशिवाय ‘मोठेपणा’, ‘दृष्टिकोन’, ‘कर्तव्य’, ‘घालमेल’, ‘अगतिक’,

                ‘त्याग’ याही कथा उल्लेखनीय झाल्या आहेत.  दुधाळ यांच्या कथांत उच्च संस्कारांचे अधिष्ठान आहे. कथेची शैली सहज असून प्रवाही आहे. निवडलेले प्रसंग रोजच्या  जीवनातील असून विशेषत: आजच्या तरुणाईच्या राहाणीमानाचे दर्शन घडवतात. छोट्या-छोट्या प्रसंगांतूनही कथा जन्म घेते व काहींना-काही  संदेश देऊन जाते. 

                  समर्पक असे मुखपृष्ठ शुभम कुमठेकर यांनी साकारले आहे. राजेंद्र भोसले यांची या कथासंग्रहास प्रस्तावना आहे. लेखकाचा हा पहिला कथासंग्रह आहे. साहित्यविश्वात पडलेले दुधाळ यांचे हे पहिले पाऊल आश्वासक आहे. अपेक्षा वाढवणारे आहे. कारण त्यांनी कथांमधून मांडलेले विचार प्रगल्भ व परिपक्व आहेत.  त्यांच्या साहित्यप्रवासास शुभेच्छा.

sahitya bharati, book review, sobati, marathi, storybook, pratik dudhal, rajendra bhosale,
राजेंद्र भोसले


***
पुस्तक परिचय - राजेंद्र भोसले

‘सोबती’ (कथासंग्रह)

प्रतिक चंद्रकांत दुधाळ

प्रथमावृत्ती- २५ फेब्रुवारी- २०२०

सुविद्या प्रकाशन, सोलापूर

पृष्ठ संख्या- ५९

मूल्य रू.- ८०/-  


-- माध्यमांवर भेटूया --

1 Comments

आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय, आणि सुचनांचे स्वागत आहे .
सोबतच्या 'सदस्य व्हा' या रकान्यात इमेल भरून आपण साहित्य भारती चे विनामुल्य सदस्य होऊ शकता.

Previous Post Next Post