मराठी साहित्याच्या प्रांतातील एक आश्वासक नाव म्हणजे कवी सूर्याजी भोसले. कीर्तनकार प्रवचनकार अशी ओळख असलेले सूर्याजी हे एक संवेदनशील कवी आहेत, हे त्यांच्या कविता वाचताना जाणवते. खरेतर आजकाल अनेक कवी साहित्यनिर्मिती करत आहेत, प्रत्येक जण आपापल्या परीने व्यक्त होत असतात ,पण रसिकांच्या पसंतीस उतरण्याचे भाग्य काही मोजक्याच कवींना लागते, त्याचे कारणही त्यांची कविताच असते. बऱ्याचदा काय होतं की, सोपी कविता म्हणता म्हणता बाळबोध कविता लिहिली जाते, किंवा काहीतरी विलक्षण करण्याच्या नादात कविता दुर्बोध होत जाते . परंतु कवी सूर्याजी भोसले यांची कविता संयमित व सुबोध आहे ती रसिकांच्या थेट काळजाला हात घालते. त्यांचा 'कालाभूल' हा कविता संग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे
कालभूल ( कविता संग्रह ) |
सूर्याजी भोसले यांचा जन्म व बालपण खेड्यातले असल्याने सहाजिकच त्यांच्या कवितेत गाव मातीचे, शेत शिवाराचे, आणि त्या अनुषंगाने ग्रामीण जीवनाचे प्रतिबिंब उमटते आहे. सूर्याजीची कविता वेदनेचे भांडवल न करता शेतकऱ्यांच्या जगण्यातल्या दुःखा बरोबरच शेतकऱ्याची दुर्दम्य इच्छाशक्ती व आशावाद अधोरेखित करते.
याचे उत्तम उदाहरण म्हणजे त्यांच्या 'बाप' या कवितेतील या काही ओळी पहा .
कष्ट करीन हातानं
देव देईल जोमानं
पीक बहरू येईल
माझ्या माईच्या घामानं
आणि शेवटच्या ओळीतर आशावादाचे ब्रीद ठरावे अशा आहेत
जग जगता जगता
माय म्हातारी जगलं
तुझ्या माझ्या दरमधी
भीक लक्ष्मी मागलं
मागील अनेक वर्षापासून सूर्याचीना मी व्यक्तिशः ओळखतो, तसेच त्यांच्या कविता, त्यांच्या सुरेल आवाजात अनेकदा ऐकल्या आहेत. मंचावरून रसिकांना मोहिनी घालणारी सूर्याजीची कविता, आता पुस्तकरूपाने वाचकांवर गारुड करण्यासाठी सिद्ध झाली आहे. त्यांचा काला भूल हा कविता संग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे.
सुरुवातीलाच या कवितासंग्रहाचे शीर्षक हे रसिकांना आकर्षित करते.
काला भूल शब्दाचा अर्थच मुळी जीवाची तगमग होणे असा आहे.
जसे की मघाशीच म्हटल्याप्रमाणे, सूर्याजींनी जरी त्यांच्या कवितेत, ग्रामीण जनजीवन आणि शेतकऱ्यांची व्यथा प्रकर्षाने मांडली असली, तरी त्या कवितेत आक्रस्ताळेपण अजिबात नाही, म्हणून त्यांची कविता वाचताना, वाचकांच्या मनाची तगमग झाल्याशिवाय राहत नाही. पुस्तकांच्या शीर्षका इतकेच, पुस्तकाचे मुखपृष्ठही आकर्षक आहे. भाताची परीक्षा शिताने होते, तसेच या पुस्तकात, आपल्याला काहीतरी छान वाचायला मिळणार याची खात्री मुखपृष्ठ पाहूनच होते. त्याचे श्रेय आमचे सन्मित्र कवी, चित्रकार, विष्णू थोरे यांचे आहे. विष्णू थोरे यांनी मुखपृष्ठ आणि आतील रेखाटने समर्पक केली आहेत.
विष्णू थोरे हा एक स्वतंत्र लेखनाचा विषय आहेत.
कालाभूल पुरता विचार करता, एखाद्या सुबक मूर्तीवर सुंदर वस्त्रालंकार चढवल्यास, जसे त्या मूर्तीचे सौंदर्य वाढते, अगदी तसेच मुळात सुंदर असलेल्या साहित्याला, आपल्या मुखपृष्ठाच्या रूपाने सुंदर साज चढवून विष्णू थोरे, यांनी कालाभूल चे देखणेपण कैकपटीने वाढले आहे.
कवी सूर्याजी भोसले |
साहित्यविश्वात काव्याग्रह प्रकाशन हे नाव उच्चारले, की पुस्तक दर्जेदार असणार, याची खात्री पटते. कालाभूल ची जबाबदारी सुद्धा काव्याग्रहने जबाबदारीने पार पाडली आहे. प्रकाशक विष्णू जोशी, यांनी त्यांच्या प्रत्येक पुस्तकाप्रमाणेच, या ही पुस्तकावर प्रचंड परिश्रम घेतल्याचे, पुस्तक पाहताच लक्षात येते. आजकाल पुस्तक निर्मिती व प्रकाशन ही काहीशी किचकट झालेली प्रक्रिया असताना, पुस्तकावर पुरेसा वेळ देऊन, बारीकसारीक गोष्टीं सुद्धा परिपूर्ण असाव्या हा काव्याग्रहचा अट्टाहास, पुस्तक पाहताना पदोपदी जाणवतो. नेहमीप्रमाणेच दर्जेदार साहित्य आणि उच्च निर्मितीमूल्य असलेले पुस्तक रसिकांना दिल्याबद्दल, श्री विष्णू जोशी आणि काव्याग्रह प्रकाशन यांचे विशेष अभिनंदन
पुस्तक निर्मितीप्रक्रियेतल्या बाकीच्या शिलेदारांनी ही आपापले काम चोख केले आहे. पुस्तकाची छपाई आणि मांडणी अतिशय सुबक व टापटीप आहे. त्यामुळे पुस्तकाचे अंतरंग बहारदार झाले आहे.
एकंदरीतच 'कालाभूल' च्या रूपाने काव्य रसिकांना परिपूर्ण वाचनानंद मिळणार यात शंका नाही.
सूर्याजी भोसले यांच्या पुढील वाटचालीस साहित्य भारतीच्या वतीने शुभेच्छा
कवीश्रीकुल सचिन कुलकर्णी |
पुस्तक परिचय लेखन - कवीश्रीकुल
सचिन कुलकर्णी पंढरपूर
9096251211
पुस्तकाचे नाव - कालभूल ( कविता संग्रह )
कवी - सूर्याजी भोसले
प्रकाशक - विष्णू जोशी ( काव्याग्रह प्रकाशन )
पृष्ठ संख्या - ८०
मूल्य - १२०
- पुस्तक मिळण्यासाठी संपर्क -
सूर्याजी भासले
९५२७३५६२३२
-- माध्यमांवर भेटूया --
![]() |
|||
![]() |
![]() |
![]() |
![]() |
2 Comments
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा
ReplyDeleteधन्यवाद सर
Deleteआपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय, आणि सुचनांचे स्वागत आहे .
सोबतच्या 'सदस्य व्हा' या रकान्यात इमेल भरून आपण साहित्य भारती चे विनामुल्य सदस्य होऊ शकता.