साहित्य भारती - पुस्तक परिचय - ‘बाप नावाची माय' - डॉक्टर राजेश गायकवाड

book review, baap navachi may, pustak parichay, dr. rajesh gaikwad, sahitya bharati


‘बाप नावाची माय' : एक ह्रदयस्थ हुंकार 

               डॉक्टर राजेश गायकवाड लिखित ‘बाप नावाची माय’ हे त्यांच्या वडिलांचे जीवन चरित्र. खरेतर ग्रामीण भागात जीवन चरित्र लिहिणे हा प्रकार मराठी साहित्यात फारच दुर्मीळ आहे. सर्वसामान्य माणसाचं जीवनचरित्र लिहिलं जाणं ही फार मोठी गोष्ट आहे. ग्रामीण भागात सर्वसामान्य कुटुंबात जीवन जगणाऱ्या डॉक्टर राजेश गायकवाड यांच्या वडिलांचे हे जीवन चरित्र; पण त्यासोबतच डॉक्टर राजेश गायकवाड यांचे हे आत्मकथनही आहे. लहानपणापासूनच्या वडिलांच्या सहवासात घालवलेले क्षण शब्दबद्ध केले आहेत. डॉक्टर राजेश गायकवाड यांना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून त्यांच्या वडिलांनी शिक्षणाच्या सर्व सुविधा पुरवून आपली मुलं मोठी व्हावीत, ही महत्त्वाकांक्षा बाबाळगली त्यासाठी प्रसंगी मोलमजुरी केली. डॉक्टर राजेश गायकवाड यांच्या मातेचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे वडील दुसरे लग्न न करता सारे जीवन आपल्या मुलांसाठीच वाहून घेतात. पोरक्या झालेल्या मुलांची माय बनतात व बाप आणि माय हे दुहेरी नातं एका निर्धाराने निभावतात. ह्या त्यांच्या संकल्पाची ही एक संघर्षमय कहाणी आहे. 
             ग्रामीण भागात शिक्षणाच्या अपुऱ्या सुविधा. कमालीचे अडाणीपण आणि शिक्षण घेण्यासाठीची प्रतिकूलता असताना त्यांचे वडील व्यवसायाने छोटेसे दुकानदार पण पारंपरिक शेतीचा व्यवसाय आणि वृत्तीने कट्टर पंढरीचे वारकरी. हा त्रिवेणी संगम त्यांच्या स्थानी पाहायला मिळतो. खरेतर व्यवसायाने दुकानदार असलेला माणूस जास्तीत जास्त नफा कसा कमवायचा हेच पाहत असतो, पण वृत्तीने कट्टर वारकरी असलेला हा बाप दुकानदार असूनही जास्त नफा कमावण्यापेक्षा थोडासाच नफा, तोही इमानदारीने करावा. 
गोरगरिबांच्या मदतीला धावून जावे, हे तत्त्वज्ञान बाळगणारा. त्यांच्यात ही दूरदृष्टी असूनही आपल्या पोरक्या झालेल्या मुलांसाठी मात्र त्यांचं अंतःकरण पूर्ण मातृमयी होऊन जातं. पत्नीच्या निधनानंतर लग्नाची अनेक स्थळे चालून येऊनही ते सर्व टाळतात. वारकऱ्यांचं लग्न हे एकदाच असतं आणि दुसरं लग्न ही भावना त्यांच्या आसपासही फिरकत नाही, यातून त्यांच्या पत्नीविषयी असलेली एकनिष्ठता आणि वारकऱ्यांची कट्टरवृत्ती दिसून येते. आता या पुढचं आयुष्य हे फक्त मुलांच्या शिक्षणाशी अर्थात त्यांच्या भाषेत सांगावयाचे तर ‘आता लग्न मुलांच्या पुस्तकांशी’ असा निर्धार करून आपल्या मुलांना उच्च शिक्षणापर्यंत पोहोचवतात व राजेश गायकवाड हे डॉक्टर होतात. ही साठसत्तर सालापूर्वी अशक्य असणारी गोष्ट ते शक्य करून दाखवतात. ‘जमीन इकू पण शिक्षण शिकू’ काळाच्या कसोटीवर पाहिले तर ही गोष्ट आज एवढ्या सुविधा असतांना डॉक्टरचा मुलगाही डॉक्टर होणं, हे मुश्किलीचं झालंय. त्यांचा हा संपूर्ण कालपट परिस्थितीशी कसा झुंजण्यात घालवला, ही एक यशस्वी नि एकांगी झुंज अत्यंत तपशिलाने व बारीक-सारीक प्रसंगातून लेखकाने उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. एकीकडे लेखक वयाची व सेवेची निवृत्ती झाल्यानंतर आपल्या वडिलांचा मृत्यूपश्चात त्यांच्या वियोगात जपलेल्या मनस्वी आठवणी त्या उफाळून येत असताना हे लेखन केलेले आहे. पण आश्चर्याची बाब ही की, पेशाने डॉक्टर, सेवा निवृत्त झालेले आणि ते लिहीत आहेत आपल्या बालपणापासूनच्या आठवणी ते डॉक्टर होण्यापर्यंतच्या वडिलांच्या सानिध्यातल्या आठवणी. एक प्रथितयश डॉक्टर, ज्यांचा मराठी वाङ्मयाशी दुरान्वयानेही संबंध नाही, तो माणूस आपल्याच परिसरातली प्रादेशिक बोली इतक्या वर्षानंतर मनात साठवून ठेवतो; वडिलांच्या आठवणींशी एकरूप होऊन त्या शब्दबद्ध करतो. ही बाब आश्चर्यकारक आहे, असे मला वाटते. त्यांच्या परिसरात आलेले अनेक शब्द हे मराठी वाड्मयात मोलाची भर घालणारी आहेत. उदा. ‘व्हईक मरण, तहडणी लागणे, बदबद, करळ, डाबकं, आमनधपक्या इ. आज बोली भाषेतील अनेक शब्द लुप्त होत असताना डॉक्टर राजेश गायकवाड यांनी आपल्या ‘बाप नावाची माय’ ह्या चरित्रात वापरली आहेत. एकीकडे आपल्या वडिलांचे चरित्र तर दुसरीकडे स्वतःचे आत्मकथन इतक्या उत्कंठतेने चितारले आहे की, वाचक त्या पात्र व प्रसंगाशी एकरूप होऊन जातो. ही प्रत्ययकारीताच कोणत्याही लेखकाच्या यशाची पावती असते, म्हणून हे पुस्तक आजच्या स्पर्धेच्या वातावरणात प्रत्येक विद्यार्थ्यांने व प्रत्येक पालकांनी ते वाचावे, इतके प्रेरणादायी आहे. 
                   ग्रामीण भागात कोणकोणत्या अडचणी असतात. ग्रामीण भागातील व्यक्तींच्या वृत्ती-प्रवृत्ती कशा असतात, हे या कादंबरीतून मांडले आहे. आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ राहून कठोर परिश्रम केल्यास हमखास यश येतं, हेच या कादंबरीतून डॉ.राजेश गायकवाड यालेखकाने उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ही कादंबरी वाचून मला ‘क्रौंचवध आणि रामायण' याची आठवण झाली. डॉक्टर राजेश गायकवाड यांच्याबाबतही असेच काहीसे घडले असावे, असे मला वाटते. कारण वडिलांचा मृत्यू आणि त्यांच्या स्मरत जाणाऱ्या आठवणी आणि या आठवणीतून जन्मलेली ‘ही बाप नावाची माय’ होय. लेखकाला आपल्या बापात दडलेली माय याचा साक्षात्कार होतो आणि लहानपणापासून ते डॉक्टर होण्यापर्यंत बापाने उपसलेले अपार कष्ट हे आठवून बापात दडलेली माय गवसून जाते. आपल्या बापाला समजून घेणे, ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. आणि त्याहून बापात दडलेल्या माईचा शोध घेणे, तिचा साक्षात्कार होणे आणि ती आविष्कृत करता येणे, हे काम तर अत्यंत कठीण, पण डॉक्टर साहेबांनी हे काम बापाच्या मृत्यूनंतर वियोगाच्या दुःखातून प्रकटलेला एक मनस्वी हुंकार होय. असे मला वाटते; म्हणूनच हे लेखन अत्यंत प्रत्ययकारी झाले आहे.

                   तशी जगात बाप माणसं असतातच आणि अशाच बापाच्या पोटी जन्म घेतलेली सवाई बेटेही असतात, त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर राजेश गायकवाड हे होत. कारण बापाने पाहिलेली स्वप्नं साकार करणे हे मुलाचं कर्तव्य असतं ते स्वप्न ते पूर्ण करतात. लाल दिव्याची गाडी नसली तरी निळ्या दिव्याची गाडी घरासमोर अधिकारी बनून आणून दाखवतात. असे मला वाटते. कारण बापाचा कठोरपणा व माईचा मातृहृदयी हळवेपणा याचा सुरेख संगम यात घडलेला आहे. बापाच्या सान्निध्यात घालवलेले क्षण काळाच्या विशाल पटलावर बापाची जिद्द व बापात दडलेल्या माईचा साक्षात्कार, या ठिकाणी या कलाकृतीतून साक्षात होताना आढळून येतो. बाप कळला रामाला बाप कळला परशुरामाला बाप कळला देवव्रत भीष्माला तशी बापातली माय कळली, डॉक्टर राजेश गायकवाड यांना.... त्यांच्या हातून उत्तरोत्तर उत्कृष्ट लेखन घडत राहावे यासाठी मनापासून शुभेच्छा… !

 – प्र.श्री.जाधव 
8668871264

-- माध्यमांवर भेटूया --

Post a Comment

आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय, आणि सुचनांचे स्वागत आहे .
सोबतच्या 'सदस्य व्हा' या रकान्यात इमेल भरून आपण साहित्य भारती चे विनामुल्य सदस्य होऊ शकता.

Previous Post Next Post