![]() |
Dimple Tai & Mangal Tai |
शूटिंग संपवून घरी सुखरूप पोहोचले. पंढरपुरात सहा दिवस राहून आलीस, पांडुरंगाचे दर्शन तरी घेतलेस की नाही म्हणून घरी येताच आहो नी विचारले, म्हटले केवळ दर्शन नाही घेतले. याची डोळा जित्या जागत्या पांडुरंगाना पाहून आले. त्यांच्यासमवेत राहून आले. यांना काही कळेना. दोन शरीराचा, पण एक अंतरंगाचा पांडुरंग मला चित्रीकरणाच्या ठिकाणी ' पालवी ' मध्ये भेटला. असे सांगताच घरातील सर्व मंडळी भोवती गोळा झाली. बोलताना काळा वेळाचे भान हरपून गेले.
आपल्या सर्वांपर्यंत मी अनुभवलेली ती सत्यकथा पोहोचावी म्हणून हा लेखन प्रपंच.. खरंतर कुठून सुरू करू अन् कुठे संपवू हे न कळल्याने कालचा पूर्ण दिवस त्या पाहिल्या, ऐकिल्या प्रसंगात त्यातील घालमेलीत गेला. पण आपण सारे सुज्ञ समजून घ्याल ही अपेक्षा... त्याची हकीकत अशी...
आपल्या इचलकरंजीतील उगवते तरुण दिग्दर्शक सर्वेश होगाडे यांचा फोन आला. आपण चॅरिटी साठी एक शॉर्ट फिल्म करतोय. एच आय व्ही पॉ झि टीव्ह अनाथ मुलांची सत्यकथा आहे. मानधन मिळणार नाही. येण्याजाण्याचा खर्च राहण्या खाण्याची सोय इतके होईल. मनात विचार आला. मागील शॉर्टफिल्म पेक्षा विषय आगळा वेगळा आहे. काही नवे शिकण्याची संधी, सोबत समाजकार्याची पुण्याई, स्वार्थ परमार्थ अशा काहीशा स्वार्थी विचारानेच मी हो म्हटले. ११ मार्च च्या संध्याकाळी सात वाजता पंढरपुरात पालवी संस्थेत पोहोचले.
एका तीनमजली जोड इमारतीच्या गेट च्या आत पाऊल टाकताच आतापर्यंत ज्या विषयापासून मी खूप दूर होते त्या वास्तवाशी सामना झाला. तिथे अगदी तान्ह्या बाळापासून वीसबाविस वर्षापर्यंत काही लहान हातात जेवणाची ता टे घेवून चाललेल्या, काही अगदी लहान खेळणाऱ्या, काही इतरांना मदत करणाऱ्या सर्व एच आय व्ही पॉ झि टी व्ह मुलांकडे पाहून माझ्या पोटात खड्डा पडला, मनात कालवाकालव सुरू झाली. सर्व इमारत बघत तिसऱ्या मजल्यावर टेरेस वरील खोलीत दोन मुली मला घेवून गेल्या कुणी या बसा म्हटले, कुणी पाणी, चहा आणून दिला. कशातच लक्ष लागेना. मला नियतीचा प्रचंड तिटकारा आला. या साऱ्यात या मुलांचा काय दोष होता. आईवडील नाहीत, स्वतःच घर नाही. या जगात माझ्यासाठी तुटणार काळीज कुठेच नाही. मरण समोर दिसताना ही ती मुलं आनंदाने जगत होती.काय म्हणत असतील त्यांची मन. मुली खाली गेल्यावर दाबलेल्या हुंदक्याला डोळ्यांनी वाट दिली. खूप रडले. अगदी ओक्साबोक्शी.. वाटलं आठवडा कसा काढायचा. निघून जावूया इथून..आपल्याला नाही सहन होणार..इतक्यात वीज चम कावी तसा विचार मनात चमकून गेला..आपल्याला केवळ पाहवत नाही तर हे सारं वाहवणाऱ्या कोण असतील त्या दोघी...??
जगात पावलोपावली स्वार्थाने बरबटलेले लोक दिसतात. माणूस किती नीचतम वागू शकतो याच्या बातम्या रोज पेपरात छापून येतात. किंबहुना केवळ आत्मसंतोषाच्या भ्रामक कल्पनेने दुसऱ्याला, समाजाला, जगाला दुःखाच्या खाईत लोटणारे असंख्य जीव आपण जगात पाहतो..मग हे कोण परमात्मे, जे दुसऱ्याच्या दुःखावर फुंकर घालण्यासाठीच जगतात, जगाने टाकलेल्या जीवांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याला पूर्णविराम देवून या मुलांसाठी जगतात.
तर त्या आहेत एक ज्योत, एकोंसत्तर वर्षे वयाच्या पंढरपूरमधल्या एक सुप्रसिध्द व्यक्तित्व उत्तम लेखिका, केवळ पुस्तकांनी भरलेल्या खोलीत राहणाऱ्या, केवळ आपले ज्ञान कर्तृत्व प्रेम, ममता हेच दागिने घालणाऱ्या उत्तम सुगरण असणाऱ्या..ही यादी न संपणारी आहे अशा मंगल शहा अर्थात बई व या ज्योतीला समई तील जागा दाखवणाऱ्या त्यांच्या मानव कार्याला पुढे नेणाऱ्या, एकोणप न्नास वर्ष वयाच्या त्यांच्या कन्या केवळ दोन जोडी कपडे इतकीच वैयक्तिक संपत्ती, कर्तुत्वाने व कष्टाने पुरुषाला लाजवील असे व्यक्तित्व असणाऱ्या डिंपल ताई.
वीस वर्षांपूर्वी २००१ ला एड्सबाबत समाजप्रबोधन करीत असताना घडलेल्या प्रसंगापासून आईवडील एड्स ने गेलेल्या, नातेवाईकांनी हात लावणार नाही म्हणून गोठ्यात जनावरांच्या पलीकडे मरायला सोडलेल्या दोन तान्ह्या बाळांपासून बई व डिंपल ताई नी या कार्याला सुरुवात केली. प्रवास खूप खडतर होता. स्वतःच्या घरापासून विरोधाचा रोष पत्करून माझ्या तुमच्या सारख्या सर्व सामान्य माणसाच्या विचारा व कुवती पलीकडे जावून प्रवाहा विरूद्ध पोहून या दोघींनी नेटाने हे कार्य सुरूच ठेवले आहे.
यातून आऊटपुट काय.. का सांभाळायचं अशा मुलांना, व्यक्तींना अशा बोथट बधीर मानसिकतेला सहन करत शेतात, उकिरड्यावर, प्लास्टिक पिशवीत एक दिवसाची नुकतीच जन्मलेली टाकलेली लेकरे आणून त्यांना आईची माया, प्रेमाची ऊब.. उन्हातली सावली, डोळ्यांचे दिवे, हाताचे पाळणे करून, मदतीसाठी पायाला चाके लावून आपल्या अष्ट हातांनी रात्रीचा दिवस करून बई व डिंपल ताई या मुलांना सांभाळतात. सुरुवातीला या मुलांना घेवून राहायला कुणी जागा देत नव्हते. आत्ताची जागा कशी मिळाली इमारत कशी झाली त्याचीही स्वतंत्र कथा आहे.तशी इथल्या प्रत्येक मुलाची व संस्थेच्या जडणघडणी तील प्रत्येक प्रसंगाची एक स्वतंत्रच कथा आहे. आज दोनाची चार सहा करत हा मुलांचा आकडा ११० चा झाला आहे. व प्रौढ मिळून १५० व्यक्तींचे पालवी नावाचे कुटुंब चालविण्यासाठी अखंड तारेवरची कसरत या मायलेकिंची सुरू आहे.
या दोघींचा रोजचा दिनक्रम प्रचंड कामाचा घाईगडबडी चा थक्क करणारा असतो.आपले चार सहा माणसाचे कुटुंब चालविताना ही आपली दमछाक..इथे तर दीडशे.. रोजचे मुलांचे, येथील सर्वांचे औषध पाणी बघणे, मलमपट्टी करणे, काय हवं नको बघणे, दीडशे लोकांचा सकाळ संध्याकाळ चा स्वयंपाक नाश्ता स्वतः बई बनवतात. योगासन व्यायाम करून घेतात. शिक्षणाची, आपल्या कृतीतून संस्काराची काळजी घेतात. डिंपल ताई न लाजता आपल्या मुलांसाठी पैसा गोळा करण्यासाठी अखंड धावतात. सारच अचंबित करणारं आहे. काय सांगू कोणतं व किती प्रश्न प डावा. शब्द थिटे. प्रकल्पाला जागा कमी पडत आहे. त्याच मानव कार्याचा भाग म्हणून तेथे घडलेल्या एका मुलीच्या सत्य कथेवर आधारित एक फिल्म बनवण्याचे ठरले. पालवी हे वास्तव जगासमोर आणण्यासाठी, तेथील लेकरांना जगविण्यासाठी. त्यायोगे सावित्रीबाई फुलें ची आठवण करून देणारे आजच्या काळातील हे सत्य.. लोकोत्तार कार्य, दोन लोकविलक्षण व्यक्ती..खरे पांडुरंग पाहण्याची अनुभवण्याची संधी आम्हा फिल्मच्या संपूर्ण टीम ला मिळाली. आपल्याला ही जगाने त्यागलेल्या मुलांना स्वतःच्या मिठीत घेणारा जिता जागता देव पाहण्याची ही संधी नक्कीच मिळू शकते ' पालवी ' मध्ये आणि या ' सफर, कुछ ऐसा भी ' नावाच्या शॉर्टफिल्म मध्येही... एका लेखात सारं कार्य लिहिणं शक्य नाही. शब्दमर्यादा येतात क्षमस्व
आयुष्यात खरंच काही मानवसेवे साठी करायचं असेल तर आवश्य एकदा पालवी ला भेट द्या. मंदिरात नाही तर तिथे मदत करा. आणि हो तिथे देव ही राहतो खराखुरा.
पालवी, पंढरपूर
सौ मंगल शहा (बई)
.9881533403
सौ डिंपल ताई
9860069949
www.palawi.org
सौ. वर्षा टकले निशाणदार*
सौ गंगामाई विद्या मंदिर, इचलकरंजी.
9823785537
-- माध्यमांवर भेटूया --
![]() |
|||
![]() |
![]() |
![]() |
![]() |
👌काळजाला भिडणारे लेखन .👌 प्रत्यक्ष पालवी पाहण्याची इच्छा निर्माण करणारे लेखन, 👌सुंदर, ओघवती भाषा , भाषाशैली तील अनुभव कथन,👌 आणि त्या मुलां साठी मनाची तळमळ दिसून येते .👌
ReplyDeleteKeep it up . वर्षा 💐 Best of luck💐
खूप छान लेखन, मंगलताई आणि डिंपलताई या दोघांना त्रिवार वंदन
ReplyDeleteसुंदर लेखन...!👌👌👌
ReplyDelete