साहित्य भारती - मराठी प्रेमकथा - क्षण आतुर - लेखिका - अर्चना पाटील, अमळनेर

marathi katha , story, literature, archana patil, sahitya bharati

क्षण आतुर
अवनी आणि चिन्मय एका सरकारी कार्यालयात नोकरीला होते.चिन्मय अवनीला दोन वर्षे सिनीअर होता.अवनीची नवीनच सुरुवात होती.पहील्याच दिवशी अवनी चिन्मयच्या नजरेचा भरली होती.गोरा रंग,कुरळे केस...जणु माधुरी दिक्षितच. कार्यालयात दोघांच्या खुर्च्या समोरासमोरच होत्या. चिन्मय दिवसभर अधुनमधून अवनीकडे बघत होता.अवनीमात्र नवीन असल्याने सगळ्यांशी ओळख करऊन घेण्यात गुंग होती. संध्याकाळी ऑफीस सुटले.अवनी लगबगीने बस सुटु नये म्हणून बसस्टॉपकडे पळू लागली.
"हाय,मी चिन्मय. मी सोडु का तुम्हाला बसस्टॉपवर?"
"हो नक्कीच",ऑफीसचाच माणुस आहे आणि गरज पण आहे म्हणून अवनी पटकन त्याच्या गाडीवर बसली.
"उद्यापासून दहा मिनीट लवकर निघत जा ऑफीसमधुन म्हणजे तुमची अशी धावपळ होणार नाही."
"थँक यु .उद्या भेटु."
    "हा स्वप्नील जोशीसारखा चॉकलेट बॉय.याने स्वतःहुन मला लिफ्ट दिली.",या विचाराने अवनी खुष झाली. दुसऱ्या दिवशी चिन्मय जरा लवकरच येऊन बसला.कधी अवनी ऑफीसच्या दरवाजात येईल आणि त्याला तिचं दर्शन घडेल असं झालं होतं त्याला.अवनी आली.तिच्या खुर्चीवर बसली.तिने पाण्याची बाटली काढली आणि पाणी प्यायला सुरुवात केली.पाणी पितांनाच तिची चिन्मयशी नजरानजर झाली.दोघांनी एकमेकांकडे पाहुन स्मितहास्य केलं.काही दिवसांतच थोड्या थोड्या वेळाने चिन्मय अवनीच्या टेबलवर घारीसारखा घिरट्या घालु लागला.संध्याकाळी तिची बस सुटल्यावर घरापर्यंत स्वतः टूव्हीलरवर सोडू लागला.तिची काळजी घेण्याचा एक क्षणपण तो सोडत नव्हता.तिला आनंद होईल अशाच गोष्टी तो सतत करत असे.सतत तिच्यासाठी फुले आणणे,गुपचूप कोणालाही न समजता बाहेर फीरायला घेऊन जाणे,गिफ्ट्स देणे...एक प्रियकर म्हणून तो कुठेही कमी नव्हता.
"अवनी,तुला एक सांगू का मी आजपर्यंत कोणत्याच मुलीशी इतका वेळ बोललेलो नाही आहे.तु माझ्या आयुष्यातील पहीली मुलगी आहेस मी जिच्यासोबत इतक्या गप्पा मारल्या."
"हो का"
"तुझा विश्वास बसत नसेल तर तु तपास करू शकते माझ्याबद्दल'
"पण मी एक सांगु का,तुझं सतत माझ्या टेबलवर येणं यामुळे माझं नाव खराब होते आहे असं वाटत नाही का तुला?"
"मी लोकांचा विचार करून करून जगत नाही. मला जे करावसं वाटतं ते मी करतो."
"पण मी करते.कारण मला घरी उत्तरं द्यावी लागतात."
"ठीक आहे,उद्यापासून नाही येणार तुझ्याजवळ."
चिन्मयच्या या उत्तराने अवनीच उदास झाली. आपला एक माणूस आपल्यापासून दुर गेला म्हणून तिला वाईट वाटु लागलं.रोज सकाळी ती आतुरतेने चिन्मयचा चेहरा पाहण्यासाठी ऑफीसला लवकर पोहोचु लागली.तो एकदा ऑफीसमधे शिरला की तिला बरे वाटत असे.सात आठ दिवस झाले. चिन्मय चेहरा उतरऊनच दिवसभर फीरत असे.त्याचा उतरलेला चेहरा पाहून अवनीला खुपच अपराध्यासारखे वाटे.
"हँलो,चिन्मय आज सोडतो को मला बसस्टॉपला?"
"ऑफीसमधे गॉसिप होईल बरं का,नीट विचार करून माझ्या गाडीवर बस."
"चालेल मला.चिन्मय मला एक प्रॉमिस कर.काहीही झालं तरी तु तोंड उतरऊन फीरणार नाही. मला कारण विचारू नको पण तुझं तोंड उतरलं की मला खुप बेचैन होतं.हस बरं एकदा मोकळा."
"माझं हसणं तुझ्या हातात आहे.चल कॉफी पिऊ."
"नाही ...नको..."
"परत तेच...मी काहीही सांगितले की फक्त हो ऐकायची सवय आहे मला अवनी मँडम.आजपर्यंत उभ्या आयुष्यात कधी कुणाचीच तोलतोल केली नाही पण तुझ्यासमोर अक्षरशः जमिनीवर लोळतोय मी .आतातरी माझ्या प्रेमाचा स्विकार कर."
"तु गुजराथी ,मी महाराष्ट्रीयन...माझे आईबाबा कधीच तयार होणार नाहीत लग्नाला."
"अगं मग आपण पळून जाऊन लग्न करू"
"ते पाऊल मी कधीच उचलणार नाही आणि म्हणूनच मी तुझ्या प्रेमापासून नेहमीच स्वतःला दुर ठेवते."
"बरं लग्न नको करूस पण जोपर्यंत माझ्यासोबत या ऑफीसमधे आहेस तोपर्यंत तर संबंध ठेव"
"हो नक्कीच, मी तुझी एक चांगली मैत्रिण आहे चिन्मय.जिव्हाळा आणि आपुलकी तर तुझ्यासाठी माझ्या मनात आयुष्यभर राहील."
"उद्यापासून तो जोशी,कानिटकर,इसे....अन् ती राणे मँडम....कुणाचचं नाव नको सांगु मला.मी तुझ्या टेबलवर येणार आणि गप्पा मारत बसणार."
"परत तेच...हेच पटत नाही मला.तु खरचं माझ्यावर प्रेम करतोस तर माझं नाव खराब करू नकोस",अवनीने कॉफीचा मग जोरात आपटला.
"राग आला वाटतं...येऊ दे.राग जसा येऊ शकतो तसा काही वेळाने तो परत जाऊपण शकतो."
"निघते मी...वेळ होतोय."
    अवनी प्रत्येकवेळी चिन्मयला सांगत होती,"माझ्यापासून दुर राहत जा...माझ्यात जास्त गुंतु नकोस...माझी जेव्हा इथून बदली होईल तुला खुप त्रास होईल...आणि माझ्यामुळे कुणाला त्रास झालेला मला मुळीच आवडत नाही. मी खुपच फ्रँकली बोलते तुझ्याशी पण प्लीज त्याच्यातून वेगळा अर्थ काढु नकोस."
"तु टेन्शन नको घेऊस गं..एकदा तुझी इथून बदली झाली की मी तुला कधीही कॉल करणार नाही. तु काय मला मवाली समझते की काय.चांगल्या प्रतिष्ठित घरातील मुलगा आहे मी.",चिन्मयने पटकन उत्तर दिले.
दोघांनाही माहीत होतं एक दिवस वेगळ व्हायचयं ,तरीही दोघेही सतत एकमेकांसोबत राहण्यास उत्सुक होते.प्रत्येक क्षण जगुन घ्यायचा होता.अवनी सतत चिन्मयला नाही नाही म्हणता कधी त्याच्यात गुंतून गेली तिलाच कळले नाही. ऑफीसच्या लोकांची भिती तिच्या मनातुन कधीच गळून गेली.उलटपक्षी तिचा चेहराच चिन्मय नसतांना आपोआप उतरून जात होता.स्वतःच्या भावना समाजाच्या भितीने कीतीही लपवल्या तरीही हालचालींमधुन त्याऑफीसमधील लोकांना जाणवतच होत्या.तुला त्रास होईल असं सांगणाऱ्या अवनीला आता स्वतःलाच चिन्मयसोबत घालवलेल्या क्षणांचा त्रास व्हायला लागला.आयुष्यात माणसं भेटत असतात पण चिन्मयमुळे अवनीला आयुष्य मिळाले.
एक दिवस चिन्मय ऑफीसमधे नेहमीसारखा अवनीसमोर येऊन बसला.एकसारखा तिच्याकडे बघु लागला.
"गुड न्युज आहे.गावाकडे जातो आहे मी पंधरा दिवस..लग्न करूनच परत येईल."
अवनी हे ऐकताच बावरली.तिचा चेहरा खाडकन पडला.उसनं अवसाण आणुनच ती बोलु लागली.
"अभिनंदन,तुझं.नशीबवान आहे ती मुलगी खूप."
"निघतो मी.दुपारी तीनची ट्रेन पकडायची आहे."
चिन्मयपण थोडासा रागातच निघून गेला.एवढा जीव ओवाळून टाकला तरीही अवनी लग्नासाठी तयार झाली नाही याचाच थोडासा राग होता.त्याचबरोबर अवनी आयुष्यभर चिन्मयला विसरूच शकणार नाही याचीपण त्याला खात्री होती.दुपारी अडीचला चिन्मय रेल्वेस्टेशनवर पोहोचला.तो एका बाकावर खिन्न मनाने बसला होता.तेवढ्यात समोर अवनी येऊन उभी राहीली.
"ऑफीसमधुन मी थोडा रागातच आलो होतो.पण आता वाटतयं मी विनकारणच तुझा राग करत होतो.एका जुन्या गाण्याच्या ओळी आठवत आहेत....ये फुल क्या करेंगे घायल कीसीऔरको...जो खुद घायल होते है...माझा प्रेमरोगाचा संसर्ग अखेरीस तुला झाला तर..."
"मला तु खुप आवडतोस चिन्मय.मी पण प्रेम करायला लागली आहे तुझ्यावर.तुझं माझ्या अवतीभवती असणं म्हणजे जणु स्वर्गच.तुझ्यामाझ्यातलं सगळचं अविस्मरणीय. नंतर तु माझा राहणार नाहीस म्हणून आज बोलुन घेते.तु जिंकलं आहेस मला चिनु.असा हरल्यासारखा बसु नकोस.एखाद्या मुलीचं मन जिंकणं म्हणजे महाकठीण गोष्ट.ती तु साध्य केलीस.सुखी रहा.",हे बोलत असतानांच अवनीचे डोळे भरून आले आणि ती निशब्द झाली.
"या क्षणांसाठीच तर तरूणाई आतुर असते.एक मुलगी अखेरीस माझ्या प्रेमात पडली...माझं तारुण्य सफल झाले.आता आयुष्यभर अरे हा प्रेमरोगाचा टप्पातर मी जगलोच नाही असंतर वाटणार नाही ना मला.कोणीतरी माझ्यासाठी खुप रडणार आहे,माझ्या आठवणींनी व्याकूळ होणार आहे,कोणाचंतरी जेवण काही दिवस बंद होणार आहे...पण त्याचसोबत हे पण लक्षात ठेव तु तुझं मन कीतीही इतर कामांत रमवलसं ना तरी माझ्या आठवणी कधीच पुसल्या जाणार नाहीत.एनी वे रडू नकोस.कारण तुझ्या रडण्याचा त्रासपण मलाच जास्त होईल.प्रत्येक जखमेवर एकच औषध असते,ते म्हणजे वेळ.ही वेळच तुला आणि मला सावरेल.मला आनंद आहे शेवटच्या क्षणी तरी तु पण माझ्यात गुरफटली आहेस हे कबुल केले.भेटु पुन्हा. माझ्या सौभाग्यवती सोबत.येतो मी."
ट्रेन आली.चिन्मय डब्यात बसला.डोळे तर त्याचे पण पाणावले.कंठ दाटून आला.ट्रेन निघून गेली.आता अवनी ज्या बाकावर चिन्मय बसला होता तिथेच मन भरून रडू लागली. कारण हा क्षण परत तिला कधीच पुन्हा जगता येणार नव्हता.

अर्चना पाटील, अमळनेर 

marathi katha , story, literature, archana patil, sahitya bharati


-----------------------------------------------
- महत्वाचे - 
साहित्य भारती या वेबसाईटवर प्रकाशित मजकुरात व्यक्त केलेली मतांशी साहित्य भरतीचे संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. 
साहित्य भारती या वेबसाईटवर प्रकाशित साहित्याचे सर्वाधिकार ( कॉपी राईट ) त्या-त्या  साहित्यिकांकडे आहेत. हे साहित्य पूर्वी इतरत्र प्रकाशित झालेले असू शकते. तसेच ते पुन्हा कोणत्याही प्रकारे प्रकाशित करण्याचा सुद्धा अधिकार साहित्यिकांचा आहे. पुन्हा प्रकाशित करताना पूर्व प्रसिद्धी म्हणून साहित्य भारताचा उल्लेख करू शकता. या साहित्याचा पूर्ण अथवा अंशतः भाग संबंधित साहित्यिकांच्या परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारे प्रकाशित करू नये. तसे आढळून आल्यास कॉपीराईट कायद्यान्वये कारवाई होऊ शकते. 

-- माध्यमांवर भेटूया --

Post a Comment

आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय, आणि सुचनांचे स्वागत आहे .
सोबतच्या 'सदस्य व्हा' या रकान्यात इमेल भरून आपण साहित्य भारती चे विनामुल्य सदस्य होऊ शकता.

Previous Post Next Post