साहित्य भरती - मराठी कथा - दैव - राजेंद्र भोसले

marathi story, katha , daiv, rajendra bhosale , literature, sahitya bharati


दैव 

बाबू वारकाचा हजामीचा धंदा गावात तसा बरा चालला होता. बलुतेदार पद्धत केव्हाच मोडीत निघाली होती. आपला पिढ्यानपिढ्या चालत आलेला हजामतीचा व्यवसाय धान्याऐवजी आता बाबू पैशाच्या स्वरूपात करत होता.
जिल्ह्याच्या ठिकाणी हजामतीचा प्रचलित दर गावाच्या मानाने आठ ते दहा पटीने जास्त हाता. शहरात तशा सुविधाही होत्या. हजामतीसाठी बसण्यास चांगल्या प्रकारच्या खुर्च्या, पुढे-मागे मोठमोठाले भव्य आरसे, चांगल्या प्रतीचे कंगवे, केस चोपण्यासाठी इलेक्ट्रिक मशीन्स, भारी शँपो, क्रिम्स, स्नो-पावडर आदींमुळे शहरवासीयांना ते अंगवळणी पडले होते.
गावात मात्र लोक दाढी व कटिंगसाठी नाममात्र पैसे देत. बाबूकडे शहरातल्या या सुविधा नव्हत्या. त्यासाठी जागा, फर्निचर, मशीनरी आदी भांडवल त्याच्याजवळ नव्हते. निरनिराळया क्रीम्स तर सोडाच, पण साधा लार्ईफबॉय साबण वापरणंदेखील त्याला परवडत नव्हतं. फक्त एक धोपटी हेच त्याचे भांडवल. धोपटीत आधुनिक ब्लेड बदलण्याजोगा वस्तरा, (एड्ससारख्या भयानक रोगाची लागण होऊ नये म्हणून). दोन-तीन प्रकारच्या जुनाट कात्र्या, आरसा, इत्यादी साहित्य होतं.
सकाळी एखाद्याचा निरोप आला तर, त्याच्या घरासमोर ओटा पाहून तो हजामीचे दुकान मांडायचा. गिर्‍हाइकाच्या हातात आरसा द्यायचा. हवी तशी केसं भादरायचा. ग्रामस्थांचाही, डोक्यावरचे केस काढून ओझं कमी करणं एवढाच उद्देश असायचा. साधारणत: फक्त जुनी माणसं अन् लहान पोरंच त्याच्याकडून कटिंग करून घेत होती. गावातील शिकलेली पोरं शहरातच नव्या ‘स्टाईलनं’ दाढी-कटिंग करायची.कोणाचं बोलावणं आलं तर त्या संपूर्ण घरातल्या माणसांची कटिंग, दाढी व लहान मुलांचा चमनगोटाही करायचा. तो एखाद्या घरी आल्यावर आसपासच्या घरातीलही लोक स्वत:ची कटिंग मुलांची कटिंग त्याच्याकडून करून घ्यायची. दररोज साधारण चार-पाच हजामती व दोन-तीन दाढ्या केल्या तरी दुपारपर्यंत पंचवीस ते तीस रुपयांपर्यंत आरामात कमार्ई व्हायची. त्यातही उधारीचा समावेश असायचा.
गावातलं बोलावणं जरी आलं नसलं तर बाबू आपली धोपटी घेऊन चावडीवर बसायचा. चावडीवरही दोन-चार डोकी भादरायला मिळायची. एक-दोन दाढ्या सहज मिळायच्या.
बाबूला चार मुली व एक मुलगा होता. वाडवडिलांची काही इस्टेट नव्हती. फक्त एक कुडाच्या भिंती असलेलं छपराचं झोपडं, हीच त्याची स्थावर होती. दोन मुली सासरी नांदत होत्या. एका मुलीचं लग्न अद्याप व्हायचं होतं. तिचाही घोर बाबूला लागला होता. धाकटा चार पोरींच्या पाठीवर झालेला मुलगा अशोक अद्याप शाळा शिकत होता. तो इयत्ता चौथीत शिकत होता. लोकांची हजामत करून मान-अपमान सहन करून आपली तर हयात गेली. अशोकला हा पिढीजात व्यवसाय करू द्यायचा नाही. त्याला खूपखूप शिकवायचं, मोठं करायचं अशी बाबूची इच्छा होती. मागासवर्गीय कोट्यातून नोकरी लागेल, अशी त्याची खात्री होती.
लगतच्या दोन गावांत न्हावी नव्हते. त्यामुळे आठवड्यातून एकदा क्रमाक्रमाने त्या गावात जाऊन बाबू हजामतीचे काम करून यायचा. पोटचारा पिकवायचा. पोरींची लग्नं, बाळंतपण, पाहुणचार यात त्याचा खर्च व्हायचा. काही दिवशी त्याचा वस्तरा बारा-बारा तास चालल्यानं चांगला धंदा व्हायचा. त्याच्या बळावर त्यानं चौथ्या पोरीला उजवून दिलं. अशोकलाही मॅट्रिकनंतरच्या शिक्षणासाठी शहरगावी पाठवलं.
पोराला उच्च शिक्षण द्यायचं म्हणून त्यानं वस्तर्‍याला कधी विश्रांती दिली नाही. ऐन साठीतही तो एखाद्या तरुणाप्रमाणे उत्साहाने काम करायचा. आलेला सर्व पैसा मुलाच्या शिक्षणाला खर्च करायचा. पोटाला कमी पडलं तरी चालेल, पण अशोकच्या शिक्षणाला पैसे कमी पडू द्यायचे नाहीत असं पत्नी सावित्रीला तो नेहमी म्हणायचा.
अशोकनेही बापाच्या कष्टाचे पांग फेडले. दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवून केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला. प्रथम वर्ष सायन्सला प्रवेश मिळाला. अशोक शहरात हॉस्टेलवर राहायचा. गावाकडून डबा यायचा. शाळेची टर्म फी, परीक्षा फी, पुस्तके आदी खर्च बाबू नाव काढताच करायचा.म्हातारा बाबू पोराची प्रगती पाहून, चिकाटी पाहून आनंदून जायचा. ‘मी जित्ता हाय तवर, अशोकला नोकरीत लागलेला बघायचाय’ हे अंतिम ध्येय वारंवार सावित्री व अशोकजवळ बोलून दाखवायचा. चार लोकांतही सांगायचा.
मजल-दरमजल करीत अशोक विज्ञान शाखेचा पदवीधर झाला. मध्यंतरी बारावीनंतर त्यानं मेडिकल व इंजिनिअरिंगला प्रयत्न केला होता; पण पुरेसे मार्क नसल्यानं विज्ञान शाखेच्याच पदवीपर्यंतचे शिक्षण घेणे त्याला क्रमप्राप्त झाले.
पदवीनंतरही त्याने नोकरीसाठी अनेकांचे उंबरे झिजवले. कुठे पाचशे, कुठे हजार-बाराशे दरमहाप्रमाणे कारकुनी करून स्वत:चा खर्च भागवला.
वयोमानाप्रमाणे वडिलांना हळूहळू काम होर्ईनासे झाले. हात थरथर कापू लागल्याने नवीन पद्धतीने ब्लेड घातलेला वस्तरा कुणाच्या गालावर, कुणाच्या कानावर, कुणाच्या ओठावर जखमा करू लागला. असा प्रकार वारंवार घडल्यानंतर गावकरी शिव्या हसडू लागले.
‘‘म्हातार्‍या, होत नाही तर कशाला करतुयास हजामती? बस तसाच गुमान. पोरगा आलाय की करतुकिला, त्याच्या हातात दे की धोपटी...’’
वडिलांचे हात थंड झाल्याने अशोक दोन ठिकाणी कारकूनकी, शिपायाची कामे करून थोडा पैसा वडिलांसाठी पाठवू लागला. इकडचा शहरातला त्याचा खर्च, कमी पगार यामुळे खर्चाची तोंडमिळवणी करता करता तोही मेटाकुटीला आला होता.
पदवीनंतरची पाच वर्षे अशोकने अशीच काढली. एम्प्लॉयमेंटला नाव तर कधीच नोंदवलं होतं. स्पर्धात्मक परीक्षाही तो द्यायचा. निरनिराळ्या कंपन्यांमध्ये अर्ज करायचा. पण मोठ्या प्रमाणात स्पर्धा असल्यानं त्याला कॉल येत नव्हता. वडील तर अंथरुणावर खिळून होते. त्यांच्या औषधांचा खर्च वाढला होता. सावित्रीही वैतागली होती. एकदा न राहवून तिनं अशोकला विचारलं,
‘‘अशोक, अजून किती शिकायचं? म्हातारा व्हस्तोर तुझं शिक्षाण चालू ठेवणार हायेस काय? आरं, बाप धरणीला लागला, तुला नोकरी कवा मिळंल...?’’
‘‘ अगं आई, तुला काय सांगू? नोकरीचं लय अवघड झालंय. सरकार हाय तीच लोकं कामावरनं काढाय लागलंय. आम्हा बेकारांना कोण इचारणार? तरी पर म्या दोनदा एम.पी.एस.सी. व पी.एस.आय. पदासाठी अन् मामलेदारपदासाठी परीक्षा दिल्यात. पासबी झालोय. आता फकस्त तोंडी राह्यल्याय.’’
अशोक काय बोलतोय ते सावित्रीच्या लक्षात येईना.
‘‘ बरं ऊठ, जेवाण कर, त्यास्नी मी आंघोळ घालते. अन् खुरपाय जाते.’’
पोटभर जेवण करून अशोक शहराकडे आला. एकीकडे नोकरी, दुसरीकडे विनंत्या-अर्ज करीत होता. वडिलांची तब्येत दिवसेंदिवस जीर्ण होत चालली होती. नोकरी लागण्याची कुठलीही आशा नव्हती. गावाकडे येऊन थोडेफार पैसे देणे, वडिलांना डोळे भरून पाहणे एवढंच त्याच्या हातात होतं.
एके दिवशी गावाकडून अशोक कंपनीत आला. तोच त्याच्या मित्रानं सरकारी तिकिटे लावलेला खाकी बंद लिफाफा अशोकच्या हाती दिला.
‘‘ बघ् नोकरीचा कॉल वगैरे तर नाही ना?’’
‘‘ आपलं एवढं कुठलं नशीब...?’’ म्हणत अशोकने लिफाफा फोडला. त्यातील मजकूर असा होता...
‘‘आपली महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे. आपण तातडीने सर्व मूळ कागदपत्रांसह पोलीस मुख्यालयात हजर व्हावे. वेळेवर हजर न राहिल्यास आपणास नोकरीची गरज नाही, असे समजून प्रतीक्षा यादीतील दुसर्‍या उमेदवाराला आपल्या जागी नियुक्त करण्यात येईल...’’
अशोकचा आनंद गगनात मावेना. तो लगेच खोलीकडे वळला. सर्टिफिकेटचा गठ्ठा घेतला व थेट पोलीस मुख्यालयाकडे त्याने धाव घेतली. संबंधित अधिकार्‍यांना भेटला. त्यांनी सर्व कागदपत्रांची पाहणी करून नाशिकला ट्रेनिंगला जाण्याच्या तयारीनिशी दोन दिवसांनी पुन्हा येण्यास सांगून तशी ऑर्डर हातात दिली.
हातात पडलेली नोकरीची ऑर्डर पाहून अशोकच्या डोळ्यांतून नकळत आनंदाश्रू तरळले. अशोक भारावून गेला होता. नाना तर्‍हेची स्वप्ने त्याच्या डोळ्यांसमोर तरळत होती.
वडिलांना ही नोकरीची बातमी कळल्यावर किती आनंद होईल याची कल्पनाच अशोक करू शकत नव्हता. एखादी पाचशेची नोट सांभाळावी तशी ती ऑर्डर सांभाळत मिठाईच्या दुकानासमोर अशोक थांबला. प्रथम दादांचं तोंड गोड करायचं, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा असे ठरवून त्याने पाव किलो पेढे विकत घेतले. पिशवीत टाकले व गावाकडची गाडी पकडली.
अशोकच्या घरासमोरच बस थांबली. तो गाडीतून उतरला. घराकडे कटाक्ष टाकला. घरासमोर गर्दी झाली होती. कोणीतरी ‘अशोक आला’ म्हणालं. तशी सावित्री पळत येऊन त्याच्या गळ्यात पडली.
‘‘ तुझं दादा गेलं रं...’’
अशोकच्या लक्षात सारं आलं. त्याला चक्कर येते की काय असे वाटू लागले. डोळ्यांसमोर काजवे चमकल्यासारखे झाले. पेढ्याचा पुडा खाली असलेली हातातली पिशवी खाली पडली.
‘‘दादाऽऽऽ... दादाऽऽ...’’ म्हणत तो ओक्साबोक्शी रडू लागला.
‘‘दादा उठा, म्या तुमचं सपान पुरं करून आलोय. दादा म्या पी.एस.आय. झालोय..’’
त्याचा आवाज घोगरा झाला होता. दोन-चार माणसांनी त्याला ओढतच बाहेर काढलं. लांब ओट्यावर जाऊन बसविले. हातात पाण्याचा तांब्या दिला. अशोक भानावर येत तांब्यातलं पाणी ढसाढसा प्यायला. त्याला जाणवलं, आपण ज्या कट्ट्यावर बसलो आहोत तो कट्टा दादांच्या हजामतीचा कट्टा होता.
त्याच्या मनात दादांबद्दलच्या पूर्वेतिहासाचे ढग दाटून आले.
‘‘दादा लईच घाई केली तुमी जायची. आता माझ्या कर्तुकीचं किस्सं कुणाला सांगू? माझ्यासाठी काबाडकष्ट करणारा बापच न्हाय तर ही नोकरी काय कामाची. ऐन सुख उपभोगण्याच्या वेळेलाच काढता पाय घेतला दादा...’’
‘‘अशोक, ऊठ. केसं भादरून घी. दादास्नी पाणी तुला पाजायचं.’’ असं म्हणून अशोकच्या डोक्याला दुसर्‍या न्हाव्यानं वस्तरा लावला.
***
राजेंद्र भोसले 
पत्ता - ब-९३, 'आनंदयात्री', 
राजस्वनगर, विजापूर रोड,
सोलापूर - ४१३००४
मो. - ९८८१७८६४६६

marathi story, katha , daiv, rajendra bhosale , literature, sahitya bharati

-----------------------------------------------
- महत्वाचे - 
साहित्य भारती या वेबसाईटवर प्रकाशित मजकुरात व्यक्त केलेली मतांशी साहित्य भरतीचे संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. 
साहित्य भारती या वेबसाईटवर प्रकाशित साहित्याचे सर्वाधिकार ( कॉपी राईट ) त्या-त्या  साहित्यिकांकडे आहेत. हे साहित्य पूर्वी इतरत्र प्रकाशित झालेले असू शकते. तसेच ते पुन्हा कोणत्याही प्रकारे प्रकाशित करण्याचा सुद्धा अधिकार साहित्यिकांचा आहे. पुन्हा प्रकाशित करताना पूर्व प्रसिद्धी म्हणून साहित्य भारताचा उल्लेख करू शकता. या साहित्याचा पूर्ण अथवा अंशतः भाग संबंधित साहित्यिकांच्या परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारे प्रकाशित करू नये. तसे आढळून आल्यास कॉपीराईट कायद्यान्वये कारवाई होऊ शकते. 

-- माध्यमांवर भेटूया --

Post a Comment

आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय, आणि सुचनांचे स्वागत आहे .
सोबतच्या 'सदस्य व्हा' या रकान्यात इमेल भरून आपण साहित्य भारती चे विनामुल्य सदस्य होऊ शकता.

Previous Post Next Post