कृतघ्नता
आज कार्यालयातून दमून आले होते. स्वप्निल अद्याप शाळेतून आला नव्हता. आरती भावजीबरोबर बाहेर गेली होती. सासूबाई स्वयंपाकघरात काहीतरी करीत होत्या. तर मामंजी कुठलेसे पुस्तक वाचत होते.
तसे आमचे कुटुंब एकत्र. एक दीर, एक नणंद लग्नाचे होते. दोघेही अजून शिक्षण घेत होते. भाऊजी इलेक्ट्रिकल इंजिनिअरच्या तृतीय वर्षाला तर नणंद सुषमा ‘लॉ’ च्या प्रथम वर्षाला होती. आणखी दोन नणंदा त्यांच्या-त्यांच्या घरी सुखाने नांदत होत्या.
हे अजूनही ऑफिसमधून आले नव्हते. कधी-मधी त्यांना उशीर होतो. कधी ऑफिसमध्ये पार्टी असेल तर आणखीन उशीर. या दोन महिन्यात त्यांची प्रकृती खालावलेली असल्याने ते फार उशीर करीत नाहीत.
तेवढ्यात दारात गाडी वाजली. बहुतेक भाऊजी आले असावेत. आरती पळतच घरात आली. मला बिलगली.
‘‘आई केव्हा आलीस?‘‘
‘‘आत्ताच बाळ..... तू कोठे गेली होतीस आरती?‘‘
तेवढ्यात भाऊजी आत येत म्हणाले,
‘‘आमच्या कॉलेजचे फंक्शन होते, म्हटले आरतीला न्यावे...’’
‘‘काय केलंस तू आरती?’’
‘‘मी किनई...‘‘
‘‘अगं सांग आरती‘‘
‘‘मी खूप खेळले.... जेवण केलं.... लाडू खाल्ले.... जाम खाल्ला... ‘‘
‘‘वा छान !‘‘
‘‘अगं सूनबाई आत ये पाहू जरा ‘‘ सासूबाईंची हाक आली.
सासूबाईनी भाजी करायला टाकली होती. अद्याप पोळ्या करायच्या होत्या. मी चहा करून घेतला. सर्वांना दिला. मीही घेतला. पोळ्या लाटायला बसले. आणखी भरपूर पोळ्या लाटायच्या होत्या. माझं लक्ष भूतकाळात नकळत गेलं.
खरंच दिवसभर ऑफिस करायचं. रात्रीचा स्वयंपाक, रांधा, कांडा, उष्टी काढा. झोपायला उशीर. सकाळी सासूबाईच्या दरार्यानं लवकर उठावं लागतं. परत ऑफिस. खरंच मी काम करणारी व पैसे मिळवणारी मशीन झाले आहे. सुषमा तर सतत अभ्यासात असते. ती काडीचंही काम करत नाही. उलट केलेल्या स्वयंपाकाला नावे ठेवते. भाऊजी आणि ह्यांंच्याकडून घरकामाची कुठलीच अपेक्षा ठेवणे उचित नव्हते. कारण पुरुषांनी घरातले कुठले काम करायचे नाही असे परंपरागत चालत आले होते.
लग्न झाले तसे वेगळे राहण्याचा विचार अनेक वेळा माझ्या मनात आला. यांच्यापुढे बोलूनही दाखविला होता. पण ते नेहमी म्हणायचे,
‘‘अगं मी थोरला, माझ्यावर जबाबदारी आहे. सुषमाचं लग्न, विनोदचं करिअर, शिवाय आई-बाबांची सेवा आहेच की....‘‘
त्यांच्या कुंटुंबवत्सल स्वभावामुळं मी गुरासारखी राबत होते. त्यांच्या एका शब्दामुळे माझे कष्टनिरसन व्हायचे. तसा मला जाच-हाट नव्हता. पण कामाचा मात्र डोंगर होता. सासुबाईनंा मोलकरीण ठेवलेली आवडत नव्हती. एखादी आणलीच तर ङ्गारच वयस्कर आहे, काम होत नाही किंवा ङ्गारच तरुण आहे म्हणूनही त्या नाकारायच्या.
‘‘आमच्या काळात वीस-पंचवीस माणसांचे काम करून आम्ही शेतावर जायचो हो. आजकालच्या सुनांना काही काम नाही.‘‘ असा आरोपही त्या नेहमी करायच्या.
तशी ह्यांची बँकेतली चांगल्या हुद्याची नोकरी होती. पगारही भरपूर होता. माझीही सरकारी नोकरी. मामंजीनाही चांगली पेन्शन असल्यानं आर्थिक सुबत्ता होती. मात्र मामंजीच्या पेन्शनवर आपण जगतो आहोत अशी सासूबाई, सुषमा आणि विनोदची भावना होती. त्यामुळे ते माझ्या व ह्यांच्या कमाईकडे दुय्यमतेने पाहात हाते.
कॉलेजसाठी पैसे पाहिजे असल्यास विनोद वडिलांकडे पैसे मागायचा. मामंजीची पेन्शन कितीशी पुरणार? ते शेवटी यांनाच सांगायचे. आम्हीच दोघे विचार करून जुळवा-जुळव करून सुषमा व विनोदला पैसे पुरवायचो.
आरती व स्वप्निल ही दोघेही सार्या घरचा जीव की प्राण होती. आजी-आजोबा, आत्या, काका, आई-बाबा यांच्या सहवासात तिळातिळानं वाढत होती.
तेढ्यात यांची स्वारी आल्याची जाणीव झाली. मी बाहेर आले.
‘‘आज इतका उशीर?‘‘
‘‘हं दवाखान्यात गेलो होतो, बँकेतून परस्पर.‘‘
‘‘काय सांगितलं डॉक्टरनी‘‘
‘‘गोळ्या बदलून दिल्यात.‘‘
‘‘हे बघा. दोन महिने झाले आजारी आहात. आणखी गुण नाही. एखाद्या स्पेशालिस्टकडे दाखवा.‘‘
‘‘अगं, स्पेशालिस्टकडे गेलं की काही खरं नाही. रक्ताच्या चाचण्या, इ.सी.जी., सी.टी.स्कॅन, सोनोग्राफी..... नाहक खर्च होतो.‘‘
‘‘मग असं किती दिवस काढणार अंगावर?‘‘
‘‘पाहू.... कुठे मी झोपून आहे? काम तर करतोय ना?‘‘
रात्रीचे जेवण आम्ही एकत्र घेतो. नेहमीप्रमाणे सर्वजण जेवलो. प्रत्येकजण आपापल्या खोलीकडे झोपायला गेले. स्वप्निल व आरती केव्हाच झोपले होते. घड्याळात नेहमीप्रमाणेच अकरा वाजले होते.
‘‘अहो! असं किती दिवस राबू मी? मलाही जीव आहे म्हटलं. कोणी कसलीच घरात मदत करत नाही. जीव नकोसा झालाय...‘‘
‘‘अगं असं का बोलतेस? ती आपलीच माणसं आहेत. सर्व आपल्यासाठी नाही करायचं तर कोणासाठी? आणि यावर उपाय तरी काय? ङ्गार तर मी सुषमा व आईला तुला मदत करण्यास सांगेन. तुझा नेहमीचा विभक्त राहण्याचा विषय काढू नकोस. एक लहान बिनलग्नाचा भाऊ अन् बहीण यांना सोडून मी वेगळे राहिलो तर जग काय म्हणेल? सुषमाचं लग्न एकदाचं होऊ दे. विनोदचं करिअर बनू दे. मग पाहू.‘‘ त्यांनी नेहमीचे चर्हाट चालू केले. मला केंव्हा झोप लागली ते कळलेच नाही.
‘‘सुनबाई ...‘‘ या सासूबाईच्या हाकेने जाग आली. पहाटे चारचा ठोका चुकू देत नाहीत सासूबाई.
घरात आजारी पडायला सवड नव्हती. ऑङ्गिसमधून रजेसाठी म्हणून चार दिवस आजारी पडले तरी घरात विश्रांती मिळत नव्हती. जमेल तेवढी कामं करावीत अशी सासूबाईंची इच्छा असायची.
कधी-कधी वाटायचे, जगायचे तरी कशासाठी? पण माझी दोन चिमणी पोरं हा विचार खोडून टाकायची. जगायची नवीन ऊर्मी यायची.कधी-कधी मन उदास व्हायचं. आपल्याला सर्वस्व असूनही आपण दु:खी का? असा प्रश्न पडायचा. चांगले पती, सोन्यासारखी दोन मुलं. सासू-सासरे, दीर-नणंद यांचा मानसिक आधार. मी माझ्या सुसाट पळणार्या मनाला सतत आवरत होते.
भवितव्याचा विचार केला तर, सुषमा लग्नाला आली होती. भावजींची नोकरी, त्यांचं लग्न, सासू-सासर्यांचं वृद्धपण, मुलांचं भवितव्य. या सर्वात काहीही म्हणा... मला माझ्या दोन मुलांच्या भवितव्याबद्दल जास्त आस्था वाटायची.
आजकाल यांची प्रकृती नेहमीच बिघडत होती. थोडेसे खराबही दिसत होते. अनेक वेळा सांगितलं चांगल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन दाखवा पण ते नेहमीच्या डॉक्टरांकडेच जाऊन गोळ्या-औषध घेत होते.
असेच एके दिवशी नेहमीप्रमाणे हे थकून भागून आले. चेहरा नेहमीसारखा पडलेला होता.
‘‘उद्या मी रजा काढली आहे, आपण डॉ.भावेेकडे दाखवू या.‘‘ मी बोलले.
‘'काही गरज नाही, थोडासा तर ताप आहे. आणि जेवण जत नाही इतकेच...‘‘
‘‘तुम्ही ऐकणार नाही. मी तुम्हाला उद्या डॉ.भावेंकडे नेणारच ‘‘ मी जिद्दीला पेटले.
‘‘बरं ठीक आहे. तुझ्या समाधानासाठी. तुझ्याकडे पेैसाच जास्त झालाय. त्याला वाटा नकोत का?‘‘
बरे झाले. नाराजीने का होईना तयार झाले. दुसर्या दिवशी मुलांना शाळेत सोडून डॉ.भावेची अपॉइंटमेंट घेतली. त्यांनी दिलेल्या वेळेत आम्ही त्यांच्या भव्य हॉस्पिटलमध्ये गेलो. त्यांनी रक्ताच्या चाचण्या व एक्स रे, सी.टी.स्कॅन, सोनोग्राफी वगैरे चाचण्या घेतल्या. दुसर्या दिवशी रिपोर्ट घेऊन बोलावले.
आम्ही दोघेही दुसर्या दिवशी रिपोर्ट घेऊन डॉक्टरांना भेटलो. सर्व रिपोर्टवरून त्यांनी नजर ङ्गिरवली. एका रिपोर्टजवळ मात्र ते थांबले व त्यांनी ह्यांच्या चेहर्याकडे काहीशा विचित्र नजरेने पाहिले. पुन्हा दुसरे रिपोर्ट पाहण्यास सुरुवात केली.
‘‘हे पहा, सर्व रिपोर्ट नॉर्मल आहे. ङ्गक्त एका रिपोर्टमध्ये दोष आहे. आपण असं करू या गोळ्यांचा कोर्स घ्या.‘‘ असं म्हणून एक स्क्रिप्ट आमच्यापुढे दिली.
‘‘सकाळ-दुपार-संध्याकाळ प्रत्येकी एकेक. दुसरी गोळी सकाळ-संध्याकाळ, तिसरी गोळी रात्री झोपताना, चौथी गोळी फक्त सकाळी. आणि पातळ ओैषध एकेक चमचा तीन वेळा आणि मिसेस कल्याणी तुम्ही थोडं थांबा, मिस्टर कल्याणी आपण थोडं बाहेर थांबा.’‘
बरं म्हणत हे उठून बाहेर गेले. यांच्या परस्पर काही सूचना द्यावयाच्या आहेत हे मी ओळखलं. हे बाहेर गेल्याची खात्री होताच डॉ. भावेंनी चष्मा काढला नि म्हणाले,
‘‘हे पहा मिसेस कल्याणी, आपल्या मिस्टरांचा एच.आय.व्ही. रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे. ही गोष्ट आपणांस सांगणे अत्यंत आवश्यक आहे. आपण त्यांच्याशी शारीरिक संबंधापासून दूर रहा. ते फारतर एक वर्ष किंवा कदाचित दोन-तीन महिनेही जगू शकतील‘‘
डॉक्टर बोलत होते. त्यांचा एकेक शब्द माझ्या काळजावर जखम करत होता. मी हे काय ऐकतेय याचं भानही मला राहिलं नव्हतं. एच.आय.व्ही. यांना कसा झाला. याचे कोडे मला उलगडेना. कारण मी त्यांना पंधरा वर्षापासून ओळखत होते. ते बाहेरख्याली प्रवृत्तीचे नव्हते. केवळ मित्रमंडळीबरेाबर पार्ट्या करणे एवढाच त्यांना छंद होता. अन् ही एड्सची बाधा माझ्या घरापर्यंत पोहचलीच कशी ?
‘‘डॉक्टर, यावर काय उपाय?‘‘
‘‘काहीही नाही, नो... नेव्हर‘‘
‘‘आपण दुबार चाचणी घेऊ या का ? कदाचित दुसरे रक्त...‘‘
‘'असे आमच्या हॉस्पिटलमध्ये घडत नाही. घडणारही नाही.‘‘
‘‘नेक्स्ट‘‘ म्हणून डॉक्टरांनी बेल वाजवली व मला डॉक्टरांजवळून उठावे लागले. सर्व रिपोर्टचा गठ्ठा घेऊन मी बाहेर आले. ते माझी वाटच पहात होते.
‘‘काय सांगितलं डॉक्टरांनी?‘‘
‘‘काही नाही.... गोळ्या वेळेवर घेण्याविषयी सूचना देत होते.‘‘
‘‘ठीक आहे चल.‘‘
त्यांनी बाईक काढली व मी बसले. डॉक्टरांनी लिहून दिलेल्या गोळ्या घेतल्या व आम्ही घराकडे निघालो. माझं मन थार्यावर नव्हतं. का बरं देवानं ही शिक्षा द्यावी? असं सारखं वाटत होतं .
एड्ससारखा महाभयंकर रोग यांना व्हावा? माझ्यासारखी दुर्दैवी स्त्री या जगात नसावी. आता हे जाणार या कल्पनेने मी पार कोसळले.
सतत दवाखान्यात जाण्या-येण्याने सासूबाई-मामंजी विचारू लागले. मी सुरुवातीला सांगायचे टाळले. आहे थोडासा ताप, थोडासा खोकला. पण मी लपवून तरी किती दिवस ठेवणार? एकदा धाडस करून सासूबाईंना सांगून टाकलं.
‘‘काय? माझ्या अमरला एड्स? तुझे डोके-बिके फिरले काय?‘‘ सासूबाई म्हणाल्या.
‘‘अहो मी नाही, डॉक्टर आणि हे रिपोर्ट सांगतात.‘‘ मी.
मी सर्व रिपोर्टस् सासूबाई, मामंजी यांना दाखवले. सुषमा व भावजींनीही पाहिले. सर्वांचे चेहरे पडले. रात्री हे बँकेतून आले. त्यांच्याशी कोणी बोलले नाही. घरातले वातावरणच बदलून गेले. त्यांचे कपडे बाजूला पडू लागले. ते येण्याअगोदरच जेवणं होऊ लागली. त्यांच्याशी बोलण्याचे टाळले जाऊ लागले. प्रत्येकजण आपापला बिछाना स्वतंत्र ठेवू लागले. त्यांनी पाणी पिलेल्या तांब्याला, ग्लासला कोणी हात लावेना. त्यांची चहाची कपबशी कोणी उचलेना.
नेहमीप्रमाणे मी ऑफिसमधून आले. तर घरात तीन-चार पोती बांधून ठेवली होती. मी म्हणाले,
‘‘हे काय? कसली बांधाबांध?‘‘
‘‘आम्ही दुसरीकडे राहायला चाललो आहोत. भागवत चाळीत भाड्याने खोली घेतली आहे. तुझ्या नवर्याला एड्स झाला आहे. त्याच्याबरोबर राहणे योग्य नाही.‘‘ सासूबाई.
‘माझा अमर‘ असलेला ‘तुझा नवरा ‘ कसा झाला हे कळलं नाही. शिवाय स्वत:चं हक्काचं घर सोडून भाड्याच्या खोलीत राहण्याचा कसला हा मूर्खपणा? माणूस संकटात सापडला म्हणजे, इतर माणसं कशी वागतात हे मला कळून चुकलं.
‘‘अहो, झाला म्हणून काय झालं? औषधं चालू आहेत? होईल ना आज ना उद्या बरा ‘‘
‘‘एड्सला औषध नाही हे लहान मुलगा सुद्धा सांगू शकेल.‘‘ भाऊजी.
‘‘अहो त्यांनी किती केले तुमच्यासाठी? आणि तुम्ही असे त्यांच्या संकटाच्या वेळी निघून जाता...’‘
‘‘माझी एक मुलगी लग्नाची आहे. मुलाचे लग्न व्हायचे आहे. या एड्सग्रस्त घरात राहून मला त्यांचे भवितव्य बरबाद करायचे नाही.‘‘ मामंजी.
‘‘माझी मुलंही आहेतच की...‘‘ मी.
‘‘तू, तुझी मुलं, तुझा नवरा पाहून घ्या. आम्ही निघालो, गाडी आली.‘‘ मामंजी.
एक टेम्पो दारात येऊन उभा राहिला. त्यात हमालाच्या साहाय्यानं पॅक केलेले एकेक सामन टाकलं जात होतं. तेवढ्यात आरती बाहेरून आली.
‘‘आजोबा, कुठे चाललात?‘‘ आरती.
‘‘आम्ही दुसरीकडे राहायला चाललो.‘‘ मामंजी.
‘‘मीही येऊ? ‘‘‘‘...........‘‘
‘‘आई, सांग ना! आजी-आजोबा, आत्या, काका कुठं चाललेत?‘‘
‘‘ मला माहीत नाही. गप्प बैस.‘'
सामान भरताच गाडी हालली. माणसं किती कृतघ्न असतात याची प्रचिती आली. स्वत:चा जीव वाचविण्यासाठी माकडही आपल्या पिलाला पायाशी घालते. या कथेचे स्मरण झाले. घरात शिरताच भकास शांतता पाहिल्यावर माझ्यासमोर उभे राहिलेले मोेठे प्रश्नचिन्ह आणखीनच कणखर झाले.
पुढच्या वेळी डॉ. भावेंची पुन्हा अपॉइंटमेंट होती. आम्ही दोघंही दवाखान्यात गेलो. दवाखान्यात नेहमीप्रमाणे गर्दी होती . एक महिना झाल्याने पुन्हा रक्त तपासणी केली. रिपोर्ट घेऊन आम्ही पुन्हा डॉ.भावेंच्या केबिनमध्ये गेलो. डॉक्टरांनी रक्ताचा रिपोर्ट पाहिला व चष्मा काढून चमत्कारिक नजरेने ह्यांच्याकडे पाहिले. बेल वाजविली. एक पोरसवदा मुलगा आत आला.
‘‘अरे, त्या लॅबमध्ये जाऊन डॉ. जोग यांना ताबडतोब बोलावून आण. महत्त्वाची चर्चा करायची आहे ‘‘
‘‘यस सर ‘‘ पोराने दार लोटले.
डॉक्टर गंभीरपणे माझ्याकडे पाहात म्हणाले,
‘‘हे पहा मिसेस् कल्याणी! हा माझ्या हातातला रिपोर्ट तर सांगतो आहे की आपल्या मिस्टरांना एच.आय.व्ही. नाही. नसेल तर चांगलीच गोष्ट आहे. लॅबोरेटरियन डॉक्टरांना चर्चेसाठी बोलावले आहे. खात्री करुया, रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेे की निगेटिव्ह? याची आपण खातरजमा करूया. काविळीची मात्र त्यांना लागण झाली आहे, हे नक्की’’
तेवढ्यात डॉ. जोग आत आले.
‘‘गुड इव्हिनिंग सर.’’
'' गुड इव्हिनिंग. प्लीज सीट डाऊ न’’ डॉ. भावे.‘‘आज ३२३५० नंबरचा पेशंट अमर कल्याणी यांची एच.आय.व्ही. टेस्ट निगेटिव्ह आहे. मात्र महिन्यापूर्वी त्यांच्या रक्ताची एच.आय.व्ही. टेस्ट घेतली. त्या वळी एच.आय.व्ही चे जिवाणू दिसून आले. हा प्रकार मला समजला नाही.’’
‘‘पाहू ते दोन्ही रिपोर्टस् सर... ‘‘ म्हणून डॉ. जोगांनी दोन्ही रिपोर्टस् हातात घेतल.
‘‘गेल्या महिन्यात बारा व तेरा तारखेला मी दोन दिवस रजेवर होतो सर आणि सदर दोन्ही दिवशी आपल्या सूचनेवरून पदभार मी असिस्टंट काळे यांना दिला होता. या दोन्ही दिवशी त्यांनीच काम पाहिले. परंतु आजचा हा रिपोर्ट मी स्वत: केला आहे. आय एम रिअली करेक्ट. नो मिस्टेक ऍट ऑल... यांना एच आय व्ही नाही हे मी ठामपणे सांगू शकतो. हंड्रेड परसेंट शूअर सर...‘‘ डॉ. भावेनी पुन्हा बेल वाजवली. मुलगा आत आला.
'' सर? ''
'' ताबडतोब त्या लॅबमध्ये जाऊन काळेंना बोलावून आण. व्हेरी अर्जंट!‘‘ डॉ. भावे कडाडले.
‘‘मे आय कम इन सर?‘‘ काळे.
‘‘प्लीज कम.‘‘
‘‘हे पहा, मागच्या महिन्यात अमर कल्याणी यांची ब्लड टेस्ट केली होती. त्या वेळी एच. आय. व्ही. पॉझिटिव्ह आले होते. आज डॉ. जोगांनी रक्ताची तपासणी होती त्यावेळी एच.आय.व्ही. रिपोर्ट निगेटिव्ह आढळून येतोय. काय आहे हा प्रकार?‘‘
‘‘आय ऍम सॉरी, रक्ताच्या अनेक बाटल्या तपासणीस असल्यामुळे चुकून अमर शेख यांच्या बाटलीचे लेबल अमर कल्याणी यांच्या बाटलीला व अमर कल्याणी यांचे लेबल अमर शेख यांच्या बाटलीला लागले. यामुळे परस्परांचे रिपोर्ट बदलले गेले. कामाच्या व्यापात ही चूक माझ्या हातून घडली. आणि ती माझ्या दोन दिवसांनी लक्षात आली. परंतु आपण रागवाल म्हणून मी ती आपल्या निदर्शनास आणली नाही. आय. एम. सॉरी सर....‘‘
‘‘एक चूक लपविण्यासाठी तुम्ही दुसरी चूक केलीत काळे. झालेली चूक लपवून ठेवलीत. ती चूक वेळीच निर्दशनास आणली असती तर... ठीक आहे. आणखीही काही बिघडलेलं नाही. तुम्ही माफी मागताच आहात तर अमर कल्याणी अन् त्यांच्या मिसेसची मागा. काय वाटले असेल त्यांना?''
‘‘ऑय एम व्हेरी सॉरी सर... मॅडम..‘‘ काळे हात जोडून आमची माफी मागत होते.
मन आनंदाने भरून आले होते. आम्हा दोघांनाही नवजीवन मिळाल्यासारखे वाटत होते.
‘‘असू द्या. असू द्या...‘‘
‘‘आणि काळे, आपण हॉस्पिटल स्थापनेपासून येथे काम करीत आहात. थोडं लक्ष देऊ न काम करीत जा. त्या एड्सग्रस्त अमर शेखना तातडीने बोलावून घ्या व त्यांच्या रक्ताचा नमुना घेऊ न पुन्हा रक्ततपासणी करा. त्यांच्यावर पुढील उपचार करावे लागतील. अच्छा. यू मे गो.‘‘ असे म्हणताच काळे गेले व डॉक्टरांनी डॉ. जोग यांच्याशी चर्चा सुरू केली.
‘‘हे पहा डॉ. जोग, आपल्या कामाचा व्याप खूप वाढला आहे. रक्त, युरीन तपासण्याही प्रमाणापेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे अशा अपवादात्मक चुका होणे साहजिकच आहे. मी तुमच्या मदतीला आणखी एक डॉक्टर व एक लॅब असिस्टंट देतो. त्याची जाहिरात उद्याच्या पेपरला द्या. ओके?‘‘
‘‘ओके सर‘‘ म्हणत डॉ. जोग खुर्चीवरून उठले.
‘‘हे पहा मि. कल्याणी व मिसेस कल्याणी, आपण सर्व प्रकार पाहिलाच आहे. एच.आय.व्ही. टेस्ट निगेटिव्ह निघाली. ही आपणासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. तुमच्या आनंदात मीही सहभागी आहे. परंतु मीही आपली माफी मागणे कर्तव्य समजतो. झाल्या प्रकाराबद्दल मला वाईट वाटतं....‘‘
‘‘तसं नाही सर...‘‘ मला काय बोलावे हे सुचेना.
‘‘हे पहा,त्यांना काविळीची लागण झालेली आहे. मी या गोळ्या लिहून देतो. त्या तीन वेळ घ्या. तिखट तेलकट आंबट, खाऊ नका. पाणी उकळून प्या. पंधरा दिवसांनी मला पुन्हा दाखवा. ठीक आहे?‘‘
‘‘थँक्यू सर‘‘ अमर.
‘‘डोंट वरी माय फ्रेंड.‘‘
डॉक्टरांनी बेल दाबली. तसा मुलगा आत आला. ‘नेक्स्ट पेशंट ‘ म्हणून डॉक्टरांनी ऑर्डर दिली.
आम्ही बाहेर पडलो. दवाखान्याबाहेरचं शहर लाइटच्या झगमगाटानं चमकत होतं ते आम्हांला नव्यानं जगण्याची प्रेरणा देत खुणावत होतं.
निघून गेलेल्या सासरे, सासूबाई, दीर, नणंद यांचा विषय काढावा वाटत होता. पण धाडस होत नव्हतं. माझा हात हातात घेत सदगदित होत हे म्हणाले,
‘‘खरंच तू सांगत आलीस तेच खरं ठरलं. मी सर्वांना आपलं मानलं, पण त्या आपल्याच माणसांनी मला धोका दिला. तू जे काही सांगत होतीस ते मी गांभीर्याने कधी घेतलेच नाही. खरंच सुधा! मी तुझा अपराधी आहे.‘‘
‘‘चला घरी, मुले आपली वाट पाहत बसली असतील‘‘ आनंदाश्रू पुसत पुसत म्हणाालेे.
***
लेखक - राजेंद्र भोसले
पत्ता- ब-९३, 'आनंदयात्री',
राजस्वनगर, विजापूर रोड,
सोलापूर - ४१३००४
मो. - ९८८१७८६४६६
-- माध्यमांवर भेटूया --
![]() |
|||
![]() |
![]() |
![]() |
![]() |